चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष; आशीष शेलार मुंबई अध्यक्ष!
Chandrasekhar Bawankule BJP's new state president; Ashish Shelar Mumbai President!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/chandrashekhar-bawankule-1.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/chandrashekhar-bawankule-1.png)
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी झाल्यानंतर त्यांच्या जागी आता चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियुक्तीमुळे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला हा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या सोबतच मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आ. आशीष शेलार यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपा घ्या “एक व्यक्ती एक पद” या कार्यपध्दती मुळे त्यांच्या रीक्त जागी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार हे गृहीत धरले जात होते. आज अखेर भाजपचे महासचीव अरुण सिंह यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती केली आहे.
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी हंसराज अहिर यांची निवड होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली फिल्डींग लावली होती. हंसराज अहिर यांचे नांव जवळपास निश्चित होईल असे वाटत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू समर्थक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गळ्यात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे. भाजपच्या या नियुक्त्यांमुळे राज्यात फडणवीसांच्या गटाला धक्का बसला असून, पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या समर्थकांना मोठ्या जबाबदारी देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची कारकीर्द ?
चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. २६ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. भाजपकडून त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००४, २००९ आणि २०१४ पासून विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा हा तिसरा कार्यकाळ होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट नाकारले होते. त्यांच्या पत्नी ज्योती यांनाही तिकीट देण्यात आले नाही. आणि त्यांच्या मतदारसंघ असलेल्या कामठीत त्यांच्याऐवजी भाजपचे जुने कार्यकर्ते टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली गेली. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाच्या कार्यापासून ही दूर ठेवण्यात आले होते. मात्र विधान परिषदेवर संधी देत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. आता त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देत त्यांना मोठी संधी देण्यात आली आहे. जातीय समीकरणच्या दृष्टीने मराठा मुख्यमंत्री, ब्राह्मण उपमुख्यमंत्री, आणि ओबीसी प्रदेशाध्यक्ष देत सामाजीक समतोल जपण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.
आशिष शेलार यांची कारकीर्द?
भाजपमध्ये अगदी तळागाळातून येऊन ज्यांनी आपली मुद्रा उमटविली, अशांमध्ये आशीष शेलार एक आहेत. मूळ गिरणगावच्या चाळ संस्कृतीतले. नंतर वांद्र्यासारख्या कॉस्मो परिसरात वाढले – रुजलेले. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नंतर अभाविप, त्यानंतर भाजयुमो आणि मग भाजप असा रीतसर प्रवास आशिष शेलार यांनी केला आहे. त्यानंतर काही काळ ते मंत्रिमंडळातही पोहचले होते, शिवसेनेशी उघड संघर्षाची भूमिका घेणारे जे मोजके भाजप नेते झाले, त्यात शेलार अग्रभागी राहिले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून २६ हजार ९११ मताधिक्याने विजयी तर सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा २६,५५० मताधिक्य राखून विजयी झाले आहेत. आशीष शेलार यांनी आजपर्यंत पक्षांमध्ये मुख्य प्रतोद, विधानसभा, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्री, दोन टर्म मुंबई भाजपा अध्यक्ष, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातुन आमदार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.