बनसारोळा येथील पारधीवस्तीतील एकाचा पोलीस तपासात संशयास्पद मृत्यू
संशयीत मृत्यू प्रकरणातील आरोपींचे पुन्हा तपासणी करा, मयताच्या नातेवाईकांचा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/jai-bheem.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/jai-bheem.png)
बनसारोळा येथील पारधी वस्तीत राहणा-या आणि संशयास्पद मृत अवस्थेत आढळून आलेल्या मयत देविदास बन्सी काळे (वय ३९) यांचा औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्रिसदस्यीय समिती अंतर्गत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी आज दिवसभर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज ९ जुलै रोजी दिवसभर ठिय्या दिला.
यासंदर्भातील अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील बनसारोळा येथील पारधी वस्तीत राहणा-या ३९ वर्षीय देविदास बन्सी काळे या इसमास एका प्रकरणात युसुफ वडगाव पोलीसांनी ३ जुलै रोजी अटक करुन ४ जुलै रोजी न्यायालया समोर उभे केले होते. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी देविदास यास जामीन मंजुर केल्यानंतर त्यास पुन्हा चौकशीसाठी युसुफ वडगाव पोलीसांनी पोलीस स्टेशनला आणले. आरोपी देविदास यास पोलीस आपल्याला पुन्हा दुसऱ्या प्रकरणात अडकवतील अशी शंका आल्यामुळे देविदास बन्सी काळे याने पोलीस स्टेशन मधुन पळुन गेला. पोलीसांनी पाठलाग करुन त्याला पकडुन पुन्हा पोलीस स्टेशनला आणले. यानंतर आरोपी देविदास याचा ५ जुलै रोजी मृत्यू झाला. देविदास मयत झाल्याची खबर पोलीसांनी नातेवाईकांना न देता त्यांचे ७ जुलै रोजी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आणि यानंतर नातेवाईकांना निरोप मिळाला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. सदरील घटनेनंतर देविदास बन्सी काळे यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला असा संशय मयताची पत्नी व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
![मयत देविदास बन्सी काळे](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/dead-person-240x300.jpeg)
![मयत देविदास बन्सी काळे](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/dead-person-240x300.jpeg)
या संदर्भात बहुजन वंचित आघाडीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, आम्ही निवेदक खालील प्रमाणे सह्या करणारे असून देविदास बन्सी काळे रा. बनसारोळा ता. केज, जि.बीड याचा मृत्यु हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे. परंतु स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवुन त्याला नैसर्गिक मृत्युचे रूप देण्याचे प्रयत्नापोटी सिरसाळा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी यांनी मयत देविदास काळे याचे प्रेत एस. आर.टी.आर. रुग्णालयात आणून त्याचे नातेवाईकांच्या परस्पर शवविच्छेदन केलेले आहे. जे कायद्याला उपक्षित अभिप्रेत नाही. त्यामुळे नातेवाईकांच्या पश्चात केलेले शवविच्छेदन अनान्य असून त्यामुळे मयत देविदास काले याचे शवविच्छेदन पुन्हा नव्याने त्रिसदस्यी समिती ( इन कॅमेरा) अंतर्गत करण्यात यावे. अन्यथा लोकशाही मार्गाने अंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
या निवेदनावर मयत देविदास काळे यांची पत्नी सुनंदा देविदास काळे, शैलेश कांबळे (जिल्हाध्यक्ष) वंचित बहुजन आघाडी, परमेश्वर जोगदंड (जिल्हा संघटक), ऍड. व्ही. एस. लोखंडे (विधी सल्लागार), प्रविण शिंदेगोविंद मस्के (शहराध्यक्ष), दिलीप काळे, लखन बलाढ्ये (तालुका संघटक) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या प्रकरणात मयत देविदास यांच्या नातेवाईकांनी देविदास याचे औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्रिसदस्यीय समिती अंतर्गत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे व देविदास सोबत अटक केलेल्या विशाल बापु काळे व शंकर भिमा काळे यास सोडुन देण्यात यावे या मागणीसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले.