आझादी का अमृत महोत्सव… ज्ञानप्रबोधिनी चा छोटा प्रयत्न
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220731_205825.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220731_205825.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220731_205825.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/IMG_20220731_205825.jpg)
कोविडची महामारी सुरू झाली आणि ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या बांधवांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था करण्यास सुरुवात झाली.
जोगाईवाडीतील औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागेत कपड्याच्या पालकात राहणाऱ्या विविध समाज गटाच्या बांधवांशी ओळख झाली. यातील तीन झोपड्या फकीर समाजाच्या बांधवांच्या होत्या. आमचे मदत कार्य सुरू असताना आम्ही छोट्या मुलांसाठी काही शैक्षणिक उपक्रम घेत होतो. फकिरांची मुलं मात्र यात सहभागी होण्यास फारसे उत्सुक नव्हते. कमालीची अस्वच्छता. वेडेवाकडे वाढलेले केस. मळलेले आणि फाटके कपडे. सहजतेने वावरणे तर खूपच अवघड. अन्नाचा ‘ अ ‘ च त्यांच्यासाठी अवघड तर अभ्यासातील ‘ अ ‘ मध्ये त्यांची रुची निर्माण होणे तर दुरापास्तच. आधारकार्डचा आधार नसल्याने कुठलीच शासकीय मदत त्यांना मिळणे अवघड. आपल्या देशात असे अनेक बांधव अजूनही आहेत ज्यांचे आयुष्य कमालीचे दुःखद आहे. ज्ञान प्रबोधिनीचा विचार हा फक्त तात्पुरती मदत करण्याचा नसून देशप्रश्न समजून घेऊन त्यावर काम करण्याचा आहे.
पुढील दोन वर्षे सतत संपर्क होता. संपर्क,सहवास आणि सामूहिक कृती या त्रिसूत्रीच्या आधारे नागरी वस्त्यांमधील काम सुरू होते. संपर्कातुन मुलांशी नाते निर्माण झाले. त्यांच्यासाठी दररोज एक तासाचा उपक्रम सुरू झाला. एका जागी बसण्याची त्यांना सवय लागली. सहलीच्या निमित्याने हळूहळू स्वच्छ राहण्याची सवय लागली. जिल्हा परिषद शाळा,जोगाईवाडीच्या शिक्षकांच्या मदतीने त्यांना शाळेत प्रवेश मिळाला. वयानुसार त्यांना त्यांचे वर्ग पण मिळाले. मुलं शाळेत जाऊ लागले.
अशातच मला पुण्याला जावं लागलं. चांगलाच आठवडाभर मी पुण्यात होतो. इकडे वस्तीवरील फकिरांची मुलं शाळेत जाणे बंद झाले. परत आल्यावर मी वस्तीवर गेलो. त्यांना शाळेत जाण्याचे महत्व समजून सांगू लागलो. त्यांना ते समजणे अवघड जात होते. शेवटी एक वेगळा उपाय वापरायचे ठरवले.
“उद्या जर तुम्ही शाळेत गेला नाहीत तर मी वस्तीवर येऊन दिवसभर उपाशी बसेल.”
याचा परिणाम किती होईल हे सांगता येणार नव्हतं. मुलांशी खूप प्रेमाचे नाते निर्माण झालेले असल्याने ते माझ्यावरील प्रेमाखातर शाळेत गेली. मी शाळेत त्यांना भेटायला गेलो. शाळेतील शिक्षकांना भेटलो. त्यांना असणाऱ्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. मुलांना प्रवेश देण्यासाठी त्यांची पूर्ण नाव त्यांना समजणे गरजेचे होते. फकीर पालक तर भिक्षा मागण्यांसाठी सकाळीच बाहेर पडतात. त्यांच्या बायका शाळेत येणे अवघड होते. आम्ही परत प्रयत्न करण्याचे ठरवले. वस्तीवर जाऊन मुलांच्या आईंना विनंती केली. प्रेमाचा आग्रह केला. त्या चक्क दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन शिक्षकांना भेटल्या व मुलांची पूर्ण नाव सांगितली.
हे वर्ष ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा करत आहोत. गेल्या 75 वर्षात फकिरांची स्त्रिया आपल्या मुलांच्यासाठी शाळेत जाण्याची ही पहिलीच वेळ असावी.
मुलांना गणवेश मिळाला. मुलं अपार खुश झाली. ‘हर घर तिरंगा’ हा नारा आपण देतोय पण या बांधवांच्या ओठावर भारत माता की जय येणं पण अवघड.
शिकलकरी वस्तीवरील 24 मुलं शाळेत जातात. मुली तर अगदीच नियमितपणे. तिथे आपल्या उपक्रमात खूप सातत्य आहे.
मुलं शाळेत जातात म्हणून मी त्यांना बक्षीस देण्याचे मान्य केले. फकीरवस्तीतील मुलांना बक्षीस म्हणून माझ्या घरी यायचे होते आणि शिकलकरी वस्तीतील मुलांना 15 ऑगस्टसाठी त्यांना गणवेश हवा होता. आज दोन किलोमीटर चालत ते बाजारात आले. त्यांना सर्वांना त्यांच्या मापाचे गणवेश मिळाला. फकीर वस्तीतील मुलांची आज माझ्या घरी भेट पण आयोजित करण्यात आली. मुलं एकदम खुश होती. त्यांच्यात वेगळाच जोश होता. जोरजोरात ‘भारत माता की जय ‘ घोषणा देणे सुरू होते. मुलांच्या गणवेशाचे प्रायोजक देवदत्त चौसाळकर आणि देवयानी ताई होत्या.