अंबाजोगाई येथील अभियंत्याचा नाशिकच्या धबधब्यात वाहुन गेल्याने मृत्यू


अंबाजोगाई (प्रतिनिधी) नाशिक येथील त्र्यंबकेश्वर दुगारवाडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेले अभियंता अविनाश हरिदास गड (वय ४०, रा. सेलू, ता. अंबाजोगाई) यांचा धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाला. दरम्यान, अविनाश गरड यांच्यासोबत धबधबा परिसरात अडकलेल्या अन्य २२ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
अविनाश गरड हे नोकरी निमित्त नाशिक येथे स्थायिक होते. काल रविवारची सुट्टी असल्याने त्यांच्यासह नाशिकहून २८ जण त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी येथे धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला गेले होते. अशात सांयकाळी पावसाचा जोर वाढला, मुसळधार पावसाने धबधबा ओलांडून गेलेल्यापैकी पाच जण कसे बसे आले. अशात धबधब्यावर पाण्याचा जोर वाढला. त्यामुळे उर्वरित २३ जण पलिकडच्या बाजूला अडकून राहिले होते. पावसाचा आणि पुराचा जोर कमी होईल, या आशेवर वाट पहात बसल्याचा रात्री धीर खचू लागला होता. यावेळी अविनाश गरड हे धबधब्यात पडले आणि पाण्यात वाहून गेले.


स्थानिक प्रशासन, अक्षय मुंदडा यांची मदत
या भागात मोबाईल रेंज नसल्याने हा सगळा प्रकार प्रशासनाच्या लक्षात यायला उशीर झाला. माहिती मिळाल्यानंतर त्रंबकेश्वर आणि नाशिक येथून तात्काळ पथक रवाना करण्यात आले. दरम्यान, गरड हे मोरेवाडी (त. अंबाजोगाई) येथील नवनीत मोरे यांच्या जावई होत. त्यामुळे याबाबत माहिती मिळताच युवा नेते अक्षय मुंदडा यांनी नाशिकचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा शक्य चिकित्सक अशोक थोरात यांच्याशी संपर्क केला. बेपत्ता झालेल्या गरड यांच्या शोधासाठी आणि उर्वरित पर्यटकांच्या सुटकेसाठी रात्रभर पोलिस, महसूल, वन क्लाइंबर अँड रेस्क्यू असोसिएशन व स्थानिक प्रशासनाचे संयुक्त मोहीम राबविली. अखेर मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास २२ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तर सोमवारी सकाळी अविनाश गरड यांचा मृतदेह हाती लागला. मयत अविनाश यांच्या पश्चात पणती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.