ठळक बातम्या

अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे १९ ऑगस्टला होणार उदघाटन

प्रा.डॉ. दासू वैद्य, डॉ. दिलीप घारे, डॉ. वृषाली किन्हाळकर, माजी खा. जयसिंगराव गायकवाड व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

 

प्रा.डॉ. दासू वैद्य
प्रा.डॉ. दासू वैद्य


अंबाजोगाई येथे १९,२० आणि २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तीन दिवसीय अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी पुर्ण झाली असून या तीन दिवसीय साहित्य संमेलनात अध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य, ज्येष्ठ अभिनेते डॉ. दिलीप घारे, प्रख्यात कवयत्री डॉ. वृषाली किन्हाळकर, प्रतिथयश लेखक बालाजी सुतार, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवरांचा सहभाग असणार आहे.
मसाप अंबाजोगाई शाखेच्या वतीने घेण्यात येणा-या या साहित्य संमेलनाची थीम ही “अनिवासी अंबाजोगाईकर” असून या संमेलनात साहित्य, कवीता, संगीत, शिक्षण, पत्रकारिता, आरोग्य, सामाजिक आदि क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन अंबाजोगाई शहराचा इतर क्षेत्रात नावलौकिक वाढवणा-या अधिकाधीक अनिवासी अंबाजोगाईकरांचा सहभाग राहणार आहे.
शहरातील टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालय परीसरात या तीन दिवसीय साहित्य संमेलनात विविध विषयांवरील ९ सत्रांच्या आयोजनासोबतच जागर दिंडी, कला व ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन समारोह, पुरस्कार वितरण, कवी संमेलन, कथा संमेलन आणि समारोप समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय साहित्य संमेलनासाठी टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयात चित्रकार दिलीप बडे साहित्य नगरीतील सुर्यकांत गरुड विचारपीठाची निर्मिती करण्यात आली आहे.
या तीन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उदघाटना पुर्वी दुपारी ३ वाजता रमाई आंबेडकर चौकातुन जागर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील जागर दिंडीचा प्रारंभ ज्येष्ठ नागरिक सौ. कमल बरुरे आणि एस.बी. सैय्यद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदरील जागर दिंडी रमाई आंबेडकर चौक, यशवंतराव चव्हाण चौक, मोरेवाडी मार्गे अभियांत्रिकी महाविद्यालयात नेण्यात येणार आहे. या जागर दिंडीचे संयोजन डॉ. उध्दव शिंदे हे करणार आहेत.

डॉ. दिलीप घारे
डॉ. दिलीप घारे


सायंकाळी ४ वाजता संमेलन परीसरात उभारण्यात येणाऱ्या कला, प्रा. दिलीप बडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्राचार्या डॉ. अखिला गौस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. राहुल धाकडे हे करणार आहेत.
या तीन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी प्रा. डॉ. दासू वैद्य तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉ. दिलीप घारे हे उपस्थित राहणार असून व्यासपीठावर मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, स्वागताध्यक्ष डॉ. बी. आय. खडकभावी, मसाप चे अध्यक्ष दगडु लोमटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या उदघाटनीय कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा होणार असून ज्येष्ठ पत्रकार, लेखक अमर हबीब यांना
नंदा देशमुख स्मृती कथालेखक पुरस्कार, प्रा.डॉ. अलका वालचाळे
यांना प्रा. शैला लोहिया स्मृती लेखिका पुरस्कार, प्रा. डॉ. देविदास खोडेवाड यांना डॉ. संतोष मुळावकर स्मृती शिक्षक लेखक पुरस्कार देऊन गौरविण्यात करण्यात येणार आहे.
१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता या साहित्य संमेलनातील कथाकथन या पहिल्या सत्रास सुरुवात होणार असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक गोरख शेंद्रे हे राहणार असून या सत्रात
हरीश कस्पटे यांचा सहभाग असणार आहे. या सत्राचे संयोजक अर्चना स्वामी या राहणार आहेत.

डॉ. वृषाली किन्हाळकर
डॉ. वृषाली किन्हाळकर


सायंकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रात अनिवासी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर हे असतील तर सहभागी कवीमध्ये अलीम अजीम (मुंबई), डॉ. सिद्धोधन कांबळे (नांदेड), बलराज संघई (औरंगाबाद), अनुपमा मोटेगावकर (बीड), रचना स्वामी (अहमदनगर), अविनाश भारती (औरंगाबाद), अस्मिता जोगदंड-चांदणे (पुणे), उषा भालेराव (बुलढाणा). प्रज्ञा आपेगावकर (पुणे), रत्नदीप शिंदे (पुणे)) सत्र संयोजक प्रा. विष्णू कावळे यांचा सहभाग असणार आहे.
याच सत्रातील निवासी कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी गणपत व्यास हे राहणार असून सहभागी कवी म्हणून निशा चौसाळकर, अतहर हुसैन (उर्दू), संध्या सोळंके-शिंदे, रविंद्र पांडे, अर्चना मुंदडा (मारवाडी), तिलोत्तमा इंगोले, राजेश रेवले, अंजली भंडारी, अत्तम राठोड (गोरमाटी), रमेश मोटे, राज पठाण, गोविंद हाके, डॉ. राजेश्वर कुकुंदा यांचा सहभाग राहणार आहे. या सत्राच्या संयोजिका रेखा देशमुख या असणार आहेत.


संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार २० ऑगस्ट २०२२ सकाळी १० वाजता तिसऱ्या सत्रात
“संमेलनाध्यक्षांचे साहित्य” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बालाजी सुतार (वर्धा) हे राहणार असून कृष्णा किंबहुने (मुंबई) हे “दासू वैद्य यांचे मराठी साहित्यातील स्थान” या विषयावर तर डॉ. दिपक गरुड (पुणे) हे दृकश्राव्य साहित्य तर गोपाळ तिवारी (औरंगाबाद) हे गद्यलेखन या विषयावर आपली मते व्यक्त करणार आहेत. या सत्राचे संयोजक प्रा. डॉ. देविदास खोडेवाडहे करणार आहेत.
दुपारी १२ वाजता ४ थ्या “अंबाजोगाई चे अनिवासी पत्रकार” या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून
या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सचिन काटे (हैदराबाद) हे राहणार आहेत. या परीसंवादात “इतर शहरांच्या तुलनेत अंबाजोगाई” या विषयावर एबीपी माझा चे प्रतिनिधी गोविंद शेळके (बीड) हे तर, “स्थलांतर” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक कलीम अजीम (पुणे) हे तर, “अंबाजोगाईची बाहेर पोहोचलेली माणसं” या विषयावर नांदेड येथील जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार (नांदेड) हे आपली मनोगते व्यक्त करणार आहेत. या सत्राचे संयोजक अमर हबीब हे आहेत.
दुपारी २ ते ३ या कालावधीत वाजता निमंत्रितांच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.


दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या सत्रात “अंबाजोगाईच्या माहेरवाशीण” या परीसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी
शकुंतला लोमटे कवडे, औरंगाबाद या राहणार असून प्रा. मुमताज देशपांडे, बेंगलोर, श्रद्धा बेलसरे खारकर, पुणे न्या. कविता बिसेन, सोलापूर यांचा सहभाग राहणार आहे. या सत्राच्या संयोजिका ज्योती शिंदे या असणार आहेत.

सायं ५ वाजता “मुलाखती” या ६ व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून
या सत्रात डॉ. तात्याराव लहाने, मुंबई (वैद्यकीय), संतोष तावरे, पुणे (कृषी) प्रकाश महाजन, औरंगाबाद(राजकीय), भास्कर चंदनशीव, कळंब (साहित्य), रतीलाल कुंकूलोळ, पुणे (उद्योजक)
यांच्या मुक्त मुलिखती होणार आहेत.या सत्राचे संयोजन अमृत महाजन हे करणार आहेत.
रात्री ७ वाजता “त्या तिथे पलिकडे!” या विषयावरील ७ व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्रात “अनिवासी अंबाजोगाईकरांचे विविध कला गुणदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राचे संयोजन संतोष मोहिते हे करणार आहेत.


रविवार २१ ऑगस्ट २०२२ सकाळी १० वाजता “मनोगते” या ८व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी (स्वागताध्यक्ष) हे राहणार असून या सत्रात प्रातिनिधिक स्वरूपात अनिवासी अंबाजोगाईकरांना उत्स्फूर्त मनोगते व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. या सत्राचे संयोजक दगडू लोमटे हे असणार आहेत.

दुपारी १२ वाजता ” माझ्या सवे गंध अंबाजोगाईचा या विषयावरील ९ व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर, कोल्हापूर हे या राहणार असून या सत्रात डॉ. माधव किन्हाळकर, नांदेड (राजकारण),
रमेश गंगणे, मुंबई (चित्रपट), ऍड. विशाल जोगदंड, दिल्ली (विधी व न्याय) यांचा सहभाग राहणार आहे. या सत्राच्या संयोजिका प्रा. डॉ. शैलजा बरुरे या राहणार आहेत.
दुपारी २ वाजता या तीन दिवसीय साहित्य संमेलनाचा समारोप होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
अध्यक्ष डॉ. दासू वैद्य हे तर मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर, नांदेड या राहणार आहेत. या कार्यक्रमात पहिल्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी व अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे वाहक अमर हबीब यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवाय संमेलना निमित्ताने घेण्यात आलेल्या
निबंध स्पर्धाचे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे हे संकल्प जाहीर करणार आहेत. समारोपीय कार्यक्रमात डॉ. वृशाली किन्हाळकर यांच्या भाषणानंतर. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दासु वैद्य यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर संमेलनाचे सुप वाजणार आहे.
या तीन दिवसीय साहित्य संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहुन या संमेलनातील साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मसापचे अध्यक्ष दगडु लोमटे, सचीव गोरख शेंद्रे, मसापचे माजी अध्यक्ष तथा संमेलनाचे संयोजक अमर हबीब, स्वागताध्यक्ष की. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी व अंबाजोगाई मसापच्या वतीने करण्यात आले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker