व्यापा-यांनी अनाधिकृत ताब्यात घेतलेल्या ७४ गाळ्यांचा ताबा घेऊन न.प. लावले सील
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केली कार्यवाही
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220802_145359.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220802_145359.jpg)
उच्च न्यायालयाचे आदेशानुसार नगरपरिषद अंबाजोगाई येथील सर्व्हे नं. ६१२ मधील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील अनाधिकृत कब्जातील २२ तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य कमानी समोरील ५२ गाळ्यांचा ताबा घेऊन गेली अनेक वर्षे दुकाने थाटून केलेली अतिक्रमणे काढून सदरील एकुण ७४ गाळ्यांचा ताबा नगर परीषदेने घेऊन आज सील लावले.
अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील २२ आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य कमानी समोरील व्यापारी संकुलातील ५२ गाळ्यांच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी अनाधिकृत ताबा घेऊन गेली अनेक वर्षांपासून आपली दुकाने थाटली होती. या संदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाचे आदेशान्वये तत्कालीन जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल आणि स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य कमानी समोरील व्यापारी संकुलामध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक यांची सुनावणी घेऊन त्याबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता.
सदर प्रकरणात मा. उच्च न्यायालयात ‘ अवमान याचिका दाखल झालेली आहे व त्यानुषंगाने उपरोक्त संदर्भीय आदेशानुसार मा. जिल्हाधिकारी, बीड यांच्या कार्यालयाने सविस्तर कारवाईचा लेखी आदेश नगरपरिषद कार्यालयाला दि. २८.७.२०२२ रोजी सायंकाळी दिले होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220802_145424.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220802_145424.jpg)
या आदेशानुसार ज्या व्यावसायिकांना नगर परीषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल मध्ये व्यवसाय करण्यास अपात्र ‘ ठरवण्यात आलेले आहे आणि ज्या व्यावसायिकांनी या व्यापारी संकुलातील गाळ्यामध्ये अनधिकृत कब्जा ‘ केला आहे.
त्यानुसार दि . १.८.२०२२ नंतर त्या गाळ्यातील साहित्यासह (साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात येईल ) सदर गाळा न.प.कडून ताब्यात घेण्यात येऊन संबंधित गाळेधारकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. अशी नोटीस चार दिवसापूर्वी संबंधित अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना देण्यात आली होती. यामध्ये कोणीही कसलाही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे आदेश ही देण्यात आले होते.
सदरील आदेशानुसार उपजिल्हाधिकारी शरद झाडके, मुख्याधिकारी अशोक साबळे, पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांनी स्वतः अतिक्रमण स्थळी थांबून महसुली, नगर परिषद आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह आज सकाळ पासून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील एकवीस अनाधिकृत कब्जातील अतिक्रमणीत दुकाने रिकामे करत त्यास सीलबंद कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी कारवाईत जेसीबी, ट्रॅक्टरसह नगरपालिकेचे कर्मचारी, महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा मोठा ताफा उपस्थित होता. सदरील कार्यवाही करण्यास सुरुवात होण्यापुर्वीच या अतिक्रमीत दुकानदारांनी आप आपले साहित्य काढून घेवून अतिक्रमण हटाव मोहीमेला सहकार्य केल्याचे दिसून येत होते.
शहरातील शिवाजी चौक परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील २२ गाळ्यांसोबत सोबतच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या ५२ पत्र्याच्या व्यापारी संकुलातील ही अनाधिकृत कब्जेदारांनी केलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई ही पुर्ण करण्यात आली . आज दिवसभरात ही अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरु असल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर दिवसभर बघ्यांनी गर्दी केली होती.