

गेल्या वर्षभरापासून सारी पर्यटन स्थळाची द्वारे बंद होती. यंदा ती उघडली गेलेली आहेत. पावसाने श्रावण मासाची सुरुवात छान केलेली आहे त्यामुळे औरंगाबाद परिसरातील सर्व पर्यटन स्थळे श्रावणात बहरुन आलेली आहेत. औरंगाबाद मध्ये नित्यनेमाने हजारो पर्यटक येतात. मराठवाड्याचं थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखलं जाणार म्हैसमाळ… खुलताबादचा प्रसिध्द किल्ला….. वेरूळच्या लेण्या आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर.. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची गडी.. २१ गणेश पीठांपैकी १७ पीठ श्री लक्षविनायक गणपती.. म्हैसमाळची गिरीजादेवी.. जवळचेच बालाजीचे खूप सुंदर मंदिर.. बीबी का मकबरा.. पानचक्की.. अशी एक ना दोन औरंगाबाद जवळील अगणित पर्यटन स्थळांचे श्रावण महिन्यामध्ये याठिकाणचे निसर्ग सौंदर्य बहरुन आलेलं आहे….
औरंगाबाद शहरापासून १०५ किलोमीटर अंतरावर असणारे हे अजिंठा गाव आणि त्या ठिकाणी असणारी संपूर्ण जगातील प्रसिद्ध असली अजिंठ्याची लेणी वाघुर नदीच्या काठावर ही वसलेली आहे. या नदीच्या काठावर अजंठा लेणीचा आकार बघितला तर एखाद्या घोड्याच्या नालाच्या सारखा असावा अशा आकारात ही लेणी वसलेली आहे ..
श्रावणमासात अजिंठा लेणीच्या परिसराला तर निसर्ग देवतेचा परिसस्पर्श झालेला आहे. साऱ्या डोंगरांच्यावर जणू हिरवेगार गालिचे पसरलेले आहेत. डोंगरावरुन खळखळतं येणारे झरे…. पाहून असे वाटतं जणू त्या डोंगरावरुन दूधाच्या काड्याच ओतलेल्या आहेत की काय.. अशा हिरव्यागार बहरलेल्या डोंगरातून फिरताना होणारा आनंद विलक्षणच असतो. मध्येच पक्षांचा किलबिलाट तर कधी कोकिळेचा स्वर कानावर येतो नी मनं सुखावून जाते. टपटप करत पानावरुन ओघळणारे पाण्याचे थेंब… वाऱ्यांच्या झुळके बरोबर अंगावर येणारे पाण्याचे थंडगार तुषार … अजिंठा लेण्या जवळील सप्तकुंडाचा तो धबधबा तर डोळ्यांचे पारणे फिटेल इतका मनमोहक.. विलोभनीय असाच आहे… सारंच आनंददायी नी सुखावून टाकणारं. समोरच्याडोंगरावर इंद्रधनुषानी आकाशात बांधलेलं ते तोरण पाहून मनं आनंदून गेल्यास नवल ते काय… असं अलौकिक निसर्ग सौंदर्य न्याहाळत येतो तो पिंपळदरी जवळील व्हू पॉइंटवर आपणं येतो.. या ठिकाणी तुरळक गर्दी पर्यटकांची असते. घोड्याच्या नालाच्या आकाराचे हे अजिंठा लेणी चे दर्शन किती विलोभनीयं असते हे शब्दांमधून सांगता येत नाही. या व्ह्यू पॉइंट वरुन खाली पायवाटेवरून उतरताना श्रावणातील बहरलेले निसर्ग सौंदर्य पाहून मनं सुखावून जातं… तृप्त होऊन जाते….
आमच्या भटका तांडाचे सर्वेसर्वा श्रीकांत उमरीकर तसेच आमच्या धमाल ट्रेकर्सचे रविंद्र बिंदू यांनी आमच्या ग्रुपला बाजूला घेऊन अजिंठा लेणी विषयी माहिती देण्यास सुरुवात केली….. आमच्या सहलीचे सहल संयोजक आकाश ढुमणे हे तर सहलबस पासून नास्ता चहा कॉफी नी उत्तम भोजनाचीही व्यवस्था नेहमीच करतात. त्यामुळे श्रीकांत उमरीकर.. आकाश ढुमणे.. रविंद्र बिंदू यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझे शब्दही अपुरे आहेत असंच मला नेहमीच वाटतं हेच खरं…
या संपूर्ण डोंगरावर २६ गुफांमध्ये ही लेणी बांधली गेलेली आहे.संपूर्ण लेण्या प्रामुख्याने बौद्ध लेण्या आहेत. दोन टप्यात या लेण्या बांधल्या गेलेल्या आहेत. पहिल्या टप्यात सातवाहन राजवटीच्या काळात तर दुसऱ्या टप्प्यात वाकाटक राजवटीच्या काळात बांधलेल्या आहेत. युनेस्कोनी अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
अजिंठा लेण्यांना १८१९ साली घोडदळातील एक ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी जंगलात आलेला होता त्यावेळी अचानक त्याच्या नजरेला या अजिंठा गुंफां दिसल्या .त्यानंतर त्यांनी त्यांच्या सैनिकांना सांगून गुंफाकडे यासाठी रस्ता बनवून घेतला. अजिंठा लेण्यांमध्ये भगवान गौतम बुद्धांचे जीवन… गौतम बुद्धांची शिकवण अलौकिक पेंटिंग मधून त्याची उकल केलेली आहे. लेण्यातील नयनरम्य विलोभनीय पेंटिंग पाहून आपणं भारावून जातो.
त्या काळातही भारतीय संस्कृती किती विकसित होती हेच या प्रत्येक पेंटिंग मधून… प्रत्येक शिल्पातून दिसून येते.त्याकालखंडातील स्त्रियांनी परिधान केलेली आभुषणे.. त्यांची सुंदर वस्त्रप्रवरणे… मनमोहक केशरचना आजच्या आधुनिक काळातील महिलांनाही नक्कीच भुरळ पाडतील इतक्या मनमोहक आहेत. अजिंठा वेरुळ.. आणि जवळची सर्व पर्यटन स्थळे असंख्य वेळा पाहिलेली आहेत.
औरंगबाद मधिल एका मोठ्या दैनिकानी सिटी वॉकच्या प्रत्येक महिन्याला दाखविण्याचे आयोजन केले होते. औरंगाबादच्या इतिहास तज्ञ डॉ.प्रा.दुलारी कुरेशी नी त्यांचे मिस्टर सर्व इतिहास प्रेमींना प्रत्येक लेणीतिल दालनाचे महत्व खूप सुंदर विषद करुन सांगत असतं. मुगलं..मराठ्यांचा संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा करीत असतं. अजिंठा लेण्यांमधील स्त्रियांच्या विषयी विश्लेषण करून सांगतांना डॉ. दुलेरी कुरेशी म्हणाल्या. मुघल … मराठा काळातील स्त्रियां किती सुंदर.. संपन्न होत्या ते अजिंठ्याच्या पेंटिंग मधून लक्षात येते. त्या स्त्रियां किती नखरेल होत्या ते पहा… गळ्यातील दागदागिने.. कर्णफुले.. झुमके .. त्यांच्या हेअर स्टाईल तर पहा तुम्ही आज फॅशन म्हणून मिरवता…पणं कित्येक वर्षांपूर्वीच्या स्त्रियां किती फॅशनेबल होत्या ते या अजिंठा गुंफां मधिल पेंटिंग मधून लक्षात येते……
अजिंठा लेण्यांमध्ये एकूण ३० लेण्या आहेत. त्यामध्ये २४ बौद्ध विहार आहेत तर ५ हिंदूची मंदिरे आहेत. या गुंफामध्ये १, २, ४ ,१६, १७ या नंबरच्या गुंफा सर्वात सुंदर गुंफा आहेत. साधारणपणे इंग्रजी यु आकारातील मोठ्या खडकांवर या ३० गुंफा खोदण्यात आलेल्या आहेत. त्यांची उंची ही साधारणता ७६ मीटर इतकी उंच आहे. यावरुन त्यांची भव्यता आपणास सहजतेने लक्षात येते. अजिंठा लेण्यांचा इतिहास आपण समजुन घेतला तर त्या कालखंडात या संपूर्ण लेण्यांचा वापर बौद्ध मठ म्हणून केला जात असे.या गुंफा मध्ये एकांतात बौद्ध विद्यार्थी आणि बौद्ध भिक्षू यांना बौद्ध धर्माची दीक्षा.. शिकवण दिली जातं असे. निसर्गाच्या सान्निध्यात.. एकांतात बौद्ध विद्यार्थी.. भिक्षूआपल्या धर्मांच्या विषयीचे चिंतन मनन किती सुंदर रितीने करीत असतील हे या गुंफांच्या रचनेवरून दिसून येते.
अजिंठा लेण्यांमध्ये चैत्य गृहात सुंदर चित्रे रेखाटली आहेत तसेच या लेण्यांमध्ये अतीशय सुंदर छतांवरुनही अलौकिक नक्षीका कलाकुसर केलेली आहे. तर या चैत्य गृहात मोठ्या खिडक्या देखील आपणांस दिसून येतात. पहिल्या उत्खननात सापडलेल्या लेण्या दख्खन, कोंडदेव, पितळखोरा, या सर्व लेण्या नाशिक येथे सापडलेल्या लेण्या सारख्या आहेत. या लेण्या बनविण्याचा दुसरा टप्पा हा चौथ्या शतकात सुरू झालेला होता जो वाकाटकांच्या राजवटीत बांधला गेला. दुसऱ्या टप्यात बांधल्या गेलेल्या गुंफा सर्वात सुंदर नी अत्यंत कलात्मक कौशल्यपूर्ण आहेत. शिवाय या गुफांमध्ये अतिशय सुंदर अलौकिक सौंदर्याची • अनुभूती देणारी चित्रे रेखाटली गेलेली आहेत. जी आजच्या चित्रकारांना ही भुरळ पाडतील इतकी अप्रतिम आहेत हे बाकी खरं…
अजिंठा लेण्यांचे इतकं विलोभनीय सौंदर्य पाहून आपणं नक्कीच भारावून जातो..मग आपल्या मनात देखील आपणास पहावयास कधी यायचं असा विचार नक्कीच आला असेल तर…. साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा कालावधी अजिंठा लेण्यांमध्ये येण्यासाठी चांगला आहे बरका… कारण औरंगाबाद शहरातील तापमान त्याकाळातील थंड असते. अजिंठ्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतं असतो नी उन्हाळ्यात ४० डिग्रीपेक्षा तपमान असते.
वर्षभर खुल्या असणाऱ्या या अजिंठा गुंफां प्रत्येक सोमवारी बंद असतात हे लक्षात घेऊन येण्याची आखणी करायला हवी. अजिंठा लेण्यांना आपण सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भेट देऊ शकता. अजिंठा लेण्यांना भेट देण्याकरता आपण औरंगाबादहून १०५ किलोमीटर अंतरावरील अजिंठ्याला बसनी.. कारनीअजिंठालेणी पर्यंत जाऊ शकता.. किवां जळगाव मधूनही रोड मार्गे अजिंठ्याला येऊ शकता. मग काय कधी येताय अजिंठा वेरुळ पाहण्यासाठी. आज श्रावणमासात लेण्यांजवळील निसर्ग सौंदर्य नयनरम्य असं बहरलेलं आहे… हाच निसर्ग आपणांस सारख्या रसिकांची आतूरतेनी वाट पाहत आहे.
ajintha leni contact number, +91-22-22044040