बीड

बीडची ऐश्वर्या बायस हिची स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी निवड

नवी दिल्ली येथील कार्यक्रमात सादर होणार ठसकेबाज लावणी

बीड /  स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त (75th Azadi Ka Amrit Mahotsav) दिल्लीत एक ते पाच ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात बीडची कन्या प्रतिनिधित्व करणार असून सांस्कृतिक मंत्रालयाकडून तिची निवड करण्यात आली आहे. मराठमोळ्या ठसकेबाज लावणीवर (Lavani) दिल्लीकर ठेका धरणार आहेत. ऐश्वर्या बायस (Aishwarya Bayas) असे या तरुणीचे नाव असून या निवडीमुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

लावणीवर ठेका धरत नृत्याविष्कार करणारी ऐश्वर्या बायस ही बीड शहरातील पिंगळे गल्लीत राहते. ऐश्वर्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तिच्या मेहनतीचं अखेर चीज झालं आहे. लावणी, भरतनाट्यम हे महाराष्ट्र राज्याच्या महत्त्वाच्या कलांमध्ये मोडले जाते. या कला काळाच्या ओघात गडप होऊ लागल्याचे चित्र आहे. मात्र, ऐश्वर्याने याच कलेमध्ये करिअर करत ती आता दिल्ली दरबारी पोहोचली आहे. देशभरातील विविध ठिकाणचे कलाकार दिल्लीत आपली कला दाखवणार आहेत. यात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांचे पदाधिकारी देखील कलाकारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील लावणीचा आवाज आता दिल्लीकरांच्या कानावर पडणार आहे.

ऐश्वर्याची कौटुंबिक परिस्थिती ही जेमतेम. वडील संतोष बायस ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणीआहे. भाऊ आयटी इंजिनिअर आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून ऐश्वर्याला नृत्याची आवड होती. ऐश्वर्याने आपली कला जोपासत आतापर्यंत विविध झालेल्या स्पर्धेत ५०० हून अधिक पारितोषिक पटकावले आहेत. ऐश्वर्या नृत्य कलेसह सेमी क्लासिक, वेस्टर्न, कथ्थक, नाटक, भरतनाट्यम, गायन, योगा यातही अव्वल आहे. मुंबईत बालरंगभूमी परिषदेच्या स्पर्धेतील फॅण्टसी जग या नाटकाला पुरस्कार देखील मिळाला आहे.

ऐश्वर्याला केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे स्कॉलरशिप देखील मिळाली आहे. या स्कॉलरशिपचे ऐश्वर्याला वर्षाला 12 हजार २०० रुपये मिळतात. ही स्कॉलरशिप कलागुणांना वाव मिळावा यासाठी देण्यात येते. दिल्लीत होणाऱ्या भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून केवळ ऐश्वर्याची निवड करण्यातआलेली आहे. राज्य सांस्कृतिक मंत्रालयाने पत्रव्यवहार करून ऐश्वर्याला ही माहिती दिली.

आतापर्यंत १० शासकीय पुरस्काराने गौरव

आतापर्यंत ऐश्वर्याला १० शासकीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारत सरकारने आयोजित केलेल्या सोलापूर येथील नेहरू युवा केंद्रातील कार्यक्रमात ऐश्वर्याने द्वितीय पारितोषिक पटकावले होते. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे येथे देखील राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली होती. सर्वाधिक लोकप्रिय असणारा सह्याद्री वाहिनीवरील दम दमा दम कार्यक्रमात तिने २०११ रोजी विजयाची मुहूर्तमेढ रोवली होती. ऐश्वर्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धा सिंगापूर, हाँगकाँग येथे होणार होत्या. मात्र, आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिला या स्पर्धेत सहभाग घेतला नाही.

आमची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असताना देखील तिने जिद्दीच्या मेहनतीवर आपलं स्वप्न पूर्ण केलंय. लोककला, लोकनृत्य, लोकनाट्य यातून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ऐश्वर्याची सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे दिल्लीत निवड झाली आहे. या निवडीनंतर मला आनंद अश्रू अनावर होत असल्याचे ऐश्वर्याचे वडील संतोष बायस यांनी सांगितले.

दिल्लीतील संधीचं सोनं करणार

मला दिल्लीत संधी मिळाली आहे, मी या संधीचं सोनं करणार आहे. ग्रामीण भागात अनेकांमध्ये कला गुण असतात. मात्र त्याला व्यासपीठ मिळत नाही. मात्र परिस्थितीला न जुमानता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच यश मिळते असे ऐश्वर्याने सांगितले.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker