उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने अहिल्या गाठाळ सन्मानित
![Ahilya Gathal](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220804_205039.jpg)
![Ahilya Gathal](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220804_205039.jpg)
अंबाजोगाईच्या भूमिकन्या तथा कळंब (जि. उस्मानाबाद) येथील विद्यमान उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांचा उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १ ऑगस्ट रोजी महसूल दिनी उस्मानाबाद येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते त्यांचा महसूल सेवेतील उल्ल्खेनीय कार्याबद्दल सन्मान करुन गौरव करण्यात आला.
अहिल्या गाठाळ यांनी कळंब महसूल उपविभागीय पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामकाजात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जनतेच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याबद्दल त्यांची ख्याती आहे. शालेय विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले देण्यासाठी त्यांनी गतीमानता निर्माण केली. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या वेळेचा अपव्यय टळला. त्याचबरोबर जात प्रमाणपत्रासह अन्य प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांना वेळेत देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांनी आपली जबाबदारी निर्भीडपणे पार पाडली. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे यासाठी वेळप्रसंगी त्या रस्त्यावर उतरल्या. तसेच, त्यांनी ग्रामीण भागातील महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या कामावर बारीक लक्ष ठेवून सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, शेतमजूर यांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अहिल्या गाठाळ यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
उत्कृष्ट प्रशासानाबाद्ल ख्याती; राज्य शासनानेही केला आहे गौरव
आजवरच्या कारकिर्दीत अहिल्या गाठाळ यांनी प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट प्रशासनाची छाप सोडली आहे. प्रशासकीय कामकाज, निवडणुका, जलयुक्त शिवार आणि पाणी फौंडेशनच्या कार्यातील उत्कृष्ट योगदानासाठी त्यांचा वेळोवेळी सन्मान झाला आहे.यापूर्वी त्यांना राज्यशासनाच्या वतीने औरंगाबाद विभागातील ‘उत्कृष्ट तहसीलदार’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात भूम येथे कार्यरत असताना जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही त्यांचा उत्कृष्ट प्रशासनासाठी गौरव करण्यात आला होता. तसेच, औसा येथे तहसीलदार पदावर कार्यरत असताना माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्तेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.