पृथ्वीराज साठे समर्थकांना एकत्र आणण्यात आले यश; पण… “हु इज द मास्टरमाईंड” ?
केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यमान आ. नमिता मुंदडा आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या मध्ये सरळ होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. सुरुवातीच्या काळात पृथ्वीराज साठे हे तुल्यबळ उमेदवार ठरतील असे चित्र दिसून येत नव्हते मात्र आ. नमिता मुंदडा यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणण्यात यश आल्या नंतर आज पृथ्वीराज साठे हे तुल्यबळ लढत देऊ शकतील असे स्पष्ट चित्र आज निर्माण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आ. नमिता मुंदडा यांच्या विरोधातील सर्व उमेदवार आणि नेत्यांची एकत्र मोट बांधण्यात यशस्वी ठरलेला मास्टर माईंड कोण आहे याची चर्चा आता मतदार संघात होऊ लागली आहे.
अंबाजोगाई शहरातील मुंदडा कुटुंबियांचे प्रबळ राजकीय विरोधक माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी ७ नोव्हेंबर रोजी संवाद मेळावा घेत कार्यकर्त्यांची भुमिका एकुण घेत आपल्यासह आपले हजारो कार्यकर्ते पृथ्वीराज साठे यांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी होणार असल्याचे सांगितले, आणि ते प्रचाराला ही लागले.
विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराचे मागे एवढ्या सगळ्यांना एकत्र करून त्यांची शक्ती एका उमेदवाराचे मागे उभी करणे हे काही एका दिवसाचे व बिनडोक माणसाचे काम नाही. हे काम करण्यासाठी मतदारसंघात एखाद्या मास्टरमाईंड गेली अनेक दिवसांपासून निश्चित काम करीत असणार? कोण असेल हा चाणाक्ष मास्टरमाईंड याचा शोध घेण्यासाठी केज मतदार संघातील अनेक “चाणक्य” कामाला लागले आहेत.