शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिक्षक पदावर आता फक्त अ वर्गातील प्राध्यापकांचीच नियुक्ती!


वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आदेश
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागाचे अधिक्षकांचे पद प्राध्यापक गटातील आ संवर्गातुन भरण्यात यावे, हे पद करण्यापुर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त यांची मान्यता घेण्यात यावी अशा प्रकारचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे अव्वल सचीव मनोहर बंदपट्टे यांनी काढले आहेत.
पुणे येथील घटनेनंतर शासन सतर्क
पुणे येथील ससुन वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय विभागातील अधिक्षकांच्या बेजबाबदार वर्तनानंतर इतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात असे प्रकार घडू नयेत या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले आहेत.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे अव्वल सचीव यांनी सदरील आदेश ३१ मे २०२४ रोजी पत्र क्र. संवैशावसं/वैद्यकीय अधिक्षक/पदभरणे/ आस्था/१/१०२९६/२०२४ अन्वये सदरील आदेश काढले आहेत. या आदेशात पुढे असे म्हटले आहे की, उपरोक्त संदर्भीय शासन पत्रान्वये वैद्यकीय अधिक्षक हे पद राष्ट्रीय वैद्यक आयोगाच्या दि.१४.०२.२०२२ च्या अधिसुचनेमधील नियम ३.७ येथे नमुद केल्याप्रमाणे नियुक्ती करणे आवश्यक आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांची परवानगी आवश्यक!
वैद्यकीय अधिक्षक हे पद संस्था स्तरावरुन राष्ट्रीय वैद्यक आयोगाच्या नियमाप्रमाणे भरले जात नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने वैद्यकीय अधिक्षक हे पद नियमाप्रमाणे प्राध्यापक या संवर्गातून भरणे अपेक्षित असल्याने व प्राध्यापक हे गट-अ चे पद असून त्यापदाचे”नियुक्ती प्राधिकारी” हे शासन असल्यामुळे त्या पदाचे नियुक्ती किंवा अतिरिक्त कार्यभारचा आदेश शासन स्तरावरून काढणे अपेक्षित असल्याने यापुढे आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या मार्फत प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी सदर शासन परिपत्रकाची अमंलबजावणी करण्यात यावी असे म्हटले आहे.
सहयोगी प्राध्यापकाकडील अतिरिक्त कार्यभार येणार संपुष्टात
सदरील आदेशामुळे राज्यातील ज्या ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अधिक्षक पदावर प्राध्यापक (अ वर्ग) पदाव्यतिरीक्त सहाय्यक प्राध्यापकांकडे अधिक्षक म्हणून दिलेला अतिरिक्त कार्यभार आता संपुष्टात येणार आहे.