आद्य कवी मुकुंदराज समाधी स्थळांच्या जतन व दुरुस्तीसाठी ८१.४९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर!
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश


मराठी भाषेतील आद्यकवी तथा थोर संत मुकुंदराज महाराज यांच्या समाधी स्थळाचे जतन व दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचनालयाच्या वतीने ८१ लक्ष ५८ हजार ३४९ रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली असल्याची माहिती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली आहे. सदरील निधी मंजूर करण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
मराठी भाषेतील आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी महाराज यांच्या अंबाजोगाई येथील समाधी स्मारकाचे जतन आणि दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ८१ लक्ष ५८ हजार ३४९ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.


या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक यांनी सदरील कामासाठीची इ निविदा सुचना आदेश जा.क्र.स्मारके जतन२०२४/१६०, दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी काढली आहे. सदरील स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचनालयाच्या अधिपत्याखालील सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग संभाजी नगर यांनी जतन दुरुस्ती कामाकरीता आवश्यक अनुभव व आवश्यक त्या वर्गात नोंदणीकृत असलेल्या कंत्राटदारांकडून लीनीटेड टेंडर व १ प्रारुपातील टक्केवारी दर ई-निविदा मागवली आहे.
या कामाच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात झाली असून लवकरच संवर्धनाचे काम सुरु होईल अशी माहिती केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी दिली आहे.


श्री मुकुंदराज स्वामी हे मराठी भाषेतील आद्यकवी होते. मुकुंदराज स्वामींचा समृद्ध कार्यकाल हा अंबाजोगाईच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. त्यांनी शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन करणारा ‘विवेक सिंधु’ हा मराठी भाषेतील आद्यग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी श्री मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. त्यांची समाधी अंबाजोगाई शहरा लगतच आहे. या स्थानाचे महत्व लक्षात घेत राज्य शासनाने समाधीस्थळास संरक्षित स्मारकांच्या सूचित समाविष्ट केलेले आहे.


वर्षभर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो श्रद्धाळू नागरिक समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. कालौघात काही प्रमाणात दुरावस्था झालेल्या समाधी स्मारकाचे जतन व दुरुस्तीसाठी आ. नमिता मुंदडा यांनी पुढाकार घेत राज्य सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून श्री मुकुंदराज स्वामी महाराज समाधी स्मारकाचे जतन आणि दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ८१ लक्ष ५८ हजार ३४९ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाची निविदा देखील प्रकाशित झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली.
दरम्यान, अंबाजोगाईचा समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.


▪️आ. नमिता मुंदडा यांचा पाठपुरावा
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शासन निर्णय क्र. टीडीएस २०२३/३/प्र.क्र. ११५०/पर्यटन दि. ३१ मार्च२०२३ अन्वये पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत सन २०२२-२०२३ मध्ये अंबाजोगाई येथील श्री. मुकुंदराज स्वामी संस्थान येथे भाविकांसाठी मुलभूत सोयी सुविधा निर्माण करणे व परिसर सुशोभिकरण करणे यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश निगर्मित केले होते. सदरील निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचनालयाकडे ११ ऑगस्ट २०२३ व १७ नोव्हेंबर २०२३ रोजी लेखी मागणी करुन व अनेक वेळा वारंवार विनंती करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सदरील मागणीची दखल घेत अखेर पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचनालयाच्या वतीने हा निधी उपलब्ध करून देत थेट प्रत्यक्ष काम सुरु करण्यासंदर्भाची निविदा काढली आहे.
आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी याबाबत पुढाकार घेऊन आद्यकवी व हजारो भाविकांनी, वारकरी संप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या मुकुंदराज समाधी स्थळांच्या जतन व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.