महाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा आज होणार शानदार सुरुवात !

ऋषिकेश कांबळे उद्घाटक तर रविंद्र शोभणे करणार समारोप


यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ३९ वे वर्ष असून तीन दिवसीय कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन आज २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता प्रख्यात लेखक, तत्वज्ञ तथा उदगीर येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. उदघाटनीय कार्यक्रमानंतर याच व्यासपीठावर बहारदार कवी संमेलनाची सुरुवात होणार आहे.


यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे हे ३९ वेळ वर्षे असून या तीन दिवसीय महोत्सवात उद्घाटन, कवी संमेलन, शेतकरी परिषद, बाल आनंद मेळावा, सुगम संगीत, भाव-भक्ती आणि नाट्यगीतांची “भावरंग” मैफील व शास्त्रीय संगीत व गायनाची “संगीत मैफल” आणि समारोप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

तसेच ३८ वर्षांपासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने वैविध्यपुर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यकम आयोजित केले जातात.
अंबाजोगाई व मराठवाड्याचा सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वैचारिक वारसा जोपासण्याचा व दृढ करण्याचा प्रयत्न या स्मृती समारोहाचे माध्यमातून केला जातो. यावर्षी ३९ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह दि.२५, २६ व २७ नोव्हेंबर शनिवार, रविवार व सोमवार असा संपन्न होणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.

२५ नोव्हेंबर ला उद्घाटन व कवी संमेलन

या स्मृती समारोहाचे उद्घाटन आज शनिवार, २५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ .३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक, तत्वज्ञ व उदगीर येथे संपन्न झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
रात्रौ ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी नागपुर येथील ज्येष्ठ कवी, गझलकार बबन सराडकर – नागपूर हे राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अहमदपूर येथील सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम हे करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी सर्वश्री शिवाजी सातपुते (मंगळवेढा), सोभा रोकडे (अमरावती), डॉ. सप्नील चौधरी – पुणे (सोयगाव), विनय पाटील (जळगाव), शैलजा कारंडे (लातूर) व लतिफ शेख, (सारोळा – लातूर) यांचा सहभाग राहणार आहे.

२६ नोव्हेंबर ला बाल आनंद मेळावा व भावरंग संगीत मैफल

या स्मृती समारोहाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी चित्रकला स्पर्धा आणि सकाळी १० वा. बालआनंद मेळावा आयोजित केला असून राष्ट्र सेवा दल व सानेगुरुजी कथा मालेचे राजेंद्र बहाळकर, पुणे हे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व शालेय चित्रकला स्पर्धेचे विजेते यांना परितोषिके प्रदान करतील.
सायं. ८.०० वा. सुगम संगीत मैफिलीचा आयोजन केले आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध युवा गायक नागेश आडगाकर यांची निर्मिती असलेला ‘भावरंग” हा भावगीत, भक्तिगीत, गझल, नाट्यगीत आसलेला संगीतमय कार्यक्रम सादर होईल. त्यात त्यांना गायिका भाग्यश्री देशपांडे गायन साथ करतील तर स्वानंद कुलकर्णी – (संवादिनी), सागर पटोकार (तबला), आसाराम साबळे (पखवाज) व अनुप कुल्थे हे व्हायोलिनवर साथसंगत करतील.

२७ नोव्हेबर सोमवार रोजी सकाळी १०.३० वा. शेतकरी परिषदेचे आयोजन केले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील सोयाबीन पैदासकार तथा सहयोगी संचालक बियाणे डॉ. शिवाजीराव म्हेत्रे हे “सोयाबीन – सुधारित बीज (वाण), लागवड तंत्रज्ञान आणि बाजारपेठ” या विषयावर मार्गदर्शन करतील. शेती शेती जोडधंदा याबाबत स्वत: प्रयोग केलेले प्रगतशील शेतकरी व या वर्षाचा यशवंतराव चव्हाण स्मृती कृषी पुरस्कार प्राप्त असे नारायणराव गोरे, कळमनुरी हे अध्यक्षस्थानी असतील. ते स्वनुभव कथन करून मार्गदर्शन करतील.

२७ नोव्हेंबर ला समारोप !

याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता समारोप समारंभ होत असून सुप्रसिद्ध लेखक, तथा अमळनेर येथे नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ संपन्न होणार आहे.

यांचा होणार गौरव!

या समारंभात मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा (धावपटू ) या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सन्मान करण्यात येणार असून त्यात कळमनुरी येथील प्रयोगशील शेतकरी व शेती उद्योजक नारायणराव गोरे यांना (कृषी), अहमदपूर येथील ज्येष्ठ लेखिका प्रा.ललिता गादगे यांना (साहित्य), छत्रपती संभाजीनगर येथील पं. विजय देशमुख यांना (संगीत) तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्ण पदके प्राप्त केलेला सुप्रसिद्ध धावपटू युवकांचे प्रेरणा असणारा आष्टी येथील युवा अविनाश साबळे याला (युवागौरव) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह,रोख पाच हजार रूपये,शाल, पुष्पगुच्छ असे आहे.

पखवाज वादन व शास्त्रीय गायन मैफल

रात्रौ ठिक ८.०० वा. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत माजलगाव येथील हल्ली पुण्यात वास्तव्याला असलेला व नैनीताल येथे शिक्षण घेतलेला प्रतिभावान पखवाज वादक मनोज सोळंके यांचे पखवाज वादन होईल. त्याला यश खडके यांची संवादिनीवर साथ होईल. त्यानंतर जमशेदपूर येथील सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका रोंकिनी गुप्ता यांचे गायन होईल. त्यांना संवादिनीवर तन्मय मेस्त्री हे तर आशिष रगवाणी तबला साथ करतील.

कला व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ग्रंथ प्रदर्शन व विक्री, चित्र व फोटो प्रदर्शन आयोजित केले आहे. लातूर येथील कलावंत, चित्रकार प्रकाश घादगिने यांच्या विविध छ्टा असलेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. वरील सर्व प्रदर्शने सर्वांसाठी खुली आहेत व ते रसिक व प्रेक्षकांना पाहता येतील.
हे सर्व कार्यक्रम वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात संपन्न होणार आहेत अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.
वरील सर्व कार्यक्रमांना रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा. सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतीश लोमटे व समितीचे सर्व सदस्य तसेच भगवानराव शिंदे, राजपाल लोमटे यांनी केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker