पू.स्वामी रामानंदतीर्थ व मराठवाडा मुक्ती संग्राम स्थळाचे १७ सप्टेंबर ला उद्घाटन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/image_editor_output_image1979065418-1694791359452-236x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/image_editor_output_image1979065418-1694791359452-236x300.jpg)
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुक्ती संग्रामाच्या अग्रस्थानी असलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेत १६ आणि १७ सप्टेंबर अशी सलग दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने उभारण्यात पू. स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्ती संग्राम स्मृती स्थळाचे उद्घाटन व हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कृतज्ञता समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १७ सप्टेंबर रोजी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने सुमारे एक कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या भव्यदिव्य अशा पू. स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्ती संग्राम स्मृती स्थळाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मणराव मालोजीराव बोंदर, सौ. पार्वतीबाई बोंदर, श्रीमती महानंदा बाई गंगाधरअप्पा बुरांडे, श्रीमती प्रतिभाताई वामनराव ठाकुर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत राज्यसभेचे माजी सदस्य प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. प्रभाकर देव व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रशांत देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे लिखीत “हैद्राबाद स्वातंत्र्य लढ्याचे अंतरंग”, डॉ. प्रभाकर देव लिखीत “हैद्राबाद मुक्ती संग्राम संघर्ष शेवटच्या राज्यसत्ता विरुद्धचा” आणि डॉ. प्रशांत देशमुख लिखीत “हैद्राबाद मुक्ती संग्रामातील मराठी वृत्तपत्रांची भुमिका” या तीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
स्मृती स्थळाची भव्यता
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उभारण्यात आलेले पू. स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्ती संग्राम स्थळाची उभारणी खुप चांगल्या पध्दतीने करण्यात आली आहे. या स्मृती स्थळाचे क्षेत्रफळ ५६४० चौरस
फूटावर असून दुमजली वास्तू उभारण्यात आली आहे. पू. स्वामी रामानंद तीर्थ व मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृति स्थळाचे उद्घाटन रविवारी दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
दुर्मिळ साहित्य, ग्रंथालय व स्वतंत्र बैठक दालनाचा समावेश
या स्मारकात पू. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांच्या सह मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे अनुभव, योगदानाबाबत माहिती संकलित करुन ती भिंतीपत्रकाच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने लावण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मुक्तिलढ्यासंबंधी काही दुर्मिळ घटना, प्रसंग, छायाचित्रे, पुस्तके, स्मरणिका, शोधनिबंध, बुलेटिन, वृत्तपत्र संग्रह, महिलांचे योगदान, हुतात्म्यांची आठवण संग्रहित करून त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/image_editor_output_image-1160309751-1694791541822-251x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/image_editor_output_image-1160309751-1694791541822-251x300.jpg)
तीस फूट ऊंचीच्या हुतात्मा स्मारकाची निर्मिती
या स्मृतीस्थळ परिसरात तीस फूट उंचीचे भव्य हुतात्मा स्मारक उभारण्यात आले असून स्तंभावर एकूण २३७ हुतात्म्यांची नावे लिहिण्यात आली आहेत. स्वतंत्र ग्रंथालय व बैठक व्यवस्था या पू. स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्ती संग्राम स्मृती स्थळावरील वरच्या मजल्यावर स्वतंत्र अद्दायावत ग्रंथालयात मुक्ती संग्रा
म लढ्यातील काही दुर्मिळ असे साहित्य व दस्तावेज, स्वतंत्र बैठक दालन आणि अभ्यासिका तयार करण्यात आल्या आहेत. वरच्या मजल्यावरील काम अद्दाप अपुर्ण असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
कल्पक व सुंदर मांडणी!
पू. स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्ती संग्राम स्थळाचे संपुर्ण डिझाईन व बांधकाम येथील तरुण आर्किटेक्ट, वास्तुशास्त्र तज्ञ व बांधकाम व्यावसायिक आकाश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले व बांधकाम विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश वैद्द यांनी स्मृती स्थळाच्या संपुर्ण कामावर बारीक नजर ठेवून अहोरात्र मेहनत घेतली आहे.