वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी यांची बदली


डी. टी. वाघमारे (भाप्रसे) नवे सचीव
महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांची राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने तडकाफडकी बदली केली असून त्यांचे जागी डी. टी. वाघमारे यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांची कारकीर्द वादळी ठरली होती. २००६ बॅचच्या आय ए एस अधिकारी असलेल्या डॉ. अश्विनी जोशी आपल्या स्टेट फॉरवर्ड कार्यपद्धती मुळे चर्चेत आल्या होत्या.


मागील सहा महिन्यांपूर्वी पॅरामेडिकल सायन्सेस विद्दार्थी भरती प्रक्रिया मध्ये अनियमितता आढळून आल्या मुळे विद्दमान केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे थेट लेखी तक्रार केली होती. तर अलिकडेच राज्यातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ७२ विभाग प्रमुखांच्या लॉंग स्टे चे कारण दाखवत बदल्यांचे आदेश काढल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वर्ग १ पदावर घ्या अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश एकाच दिवशी काढण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. या बदल्यांच्या आदेशात अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाच विभागप्रमुखांचा समावेश होता.


या सर्व पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर रोजी सामान्य प्रशासन विभागाने कार्यालयीन आदेश अ.शा.प्र.क्र. एईओ-११२३/१०/२०२३ अन्वये डॉ. अश्विनी जोशी यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई या पदावर तडकाफडकी बदली केली असून त्यांचे जागी डी. टी. वाघमारे (भाप्रसे) यांची नियुक्ती केली आहे. या आदेशात आपण आपला कार्यभार डी. टी. वाघमारे यांचेकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार तात्काळ स्विकारावा, असे म्हटले आहे. या आदेशावर सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांची स्वाक्षरी आहे.