गोगलगायींच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर!


अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गोगलगायींनी उच्छाद मांडला असून ज्या गावात जास्त प्रमाणात गोगलगायी आढळून येत आहेत त्या गावात कृषी विभाग गोगलयींच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोंचला आहेत.
सद्यस्थितीत मागील आठवड्यामध्ये पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीस प्रारंभ केला आहे. मागील वर्षी काही भागांमध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती यावर्षी गोगलगायीचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीने गोगलगाय व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्यावतीने व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री सूर्यकांत वडखेलकर, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत सूर्यवंशी यांनी नुकतेच मौजे चोपनवाडी, घाटनांदुर ,हातोला, कुंबेफळ, राडी इत्यादी ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन केले.


दिनांक ८ जुलै रोजी मौजे कुंबेफळ येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र डिघोळ आंबा येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप सांगळे यांनी एकात्मिक पद्धतीने गोगलगायीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात विस्तृतपणे माहिती दिली, त्यामध्ये सकाळी लवकर शेतामध्ये जाऊन गोगलगायी वेचाव्यात, शेतामध्ये गुळाच्या पाण्यात भिजवलेले कलतानी पोते ठेवून त्याखाली जमा झालेल्या गोगलगायी वेचून मिठाच्या पाण्यामध्ये नष्ट कराव्यात, रासायनिक पद्धतीने गोगलगायचे व्यवस्थापन करण्यासाठी मेटाल्डिहाईड २.५ टक्के गोळ्यांचा वापर करावा याची माहिती दिली.
उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले गोगलगाय वेचणी करताना हातमोजे वापरावेत तसेच गोगलगाईच्या व्यवस्थापनासाठी सामूहिक प्रयत्न करून उपाययोजना करण्याचे आवाहन केले.


कृषी सहाय्यक पंडित काकडे यांनी शेतकऱ्यांना रुंद वरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करून पेरणी करण्याचे आवाहन केले.
उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी सोयाबीन पिकामधील खोडमाशी व्यवस्थापनासाठी अझॉक्सिस्ट्रोबिन २.५% अधिक थायोफिनेट मिथाईल ११.२५% अधिक थायामेथोक्सम २५% एफएस या संयुक्त बुरशीनाशक व कीटकनाशकाची ५ मिली प्रति १ किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करण्याची माहिती दिली. प्रगतिशील शेतकरी गोविंद जाधव यांनी मागील वर्षी गोगलगाय व्यवस्थापनासाठी केलेल्या उपायोजनांचे अनुभव उपस्थित शेतकऱ्यांसमोर कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी सतीश नारायणकर यांनी तर नियोजन कृषी सहाय्यक किशोर आडागळे यांनी केले. यावेळी कृषी विभागाचे संबंधित गावातील अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.