महाराष्ट्र

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील लोमटे यांचे निधन!

भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनील लोमटे यांचे आज दुपारी निधन झाल्याची बातमी अचानक धडकली आणि बीड जिल्ह्यातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.


भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष पदावर काम करीत असलेले सुनील लोमटे यांचे जीवन महाविद्यालयीन शिक्षणापासून सतत चर्चेत राहीले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन निवडणुकामध्ये सक्रीय असणारे सुनील लोमटे महाविद्यालयीन शिक्षणानंतर आपले वडील माजी नगराध्यक्ष बालासाहेब लोमटे यांच्या पावलावर पावूल ठेवून शहराच्या सक्रीय राजकारण आणि समाजकारणात सहभागी झाले. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आपले स्थान निर्माण करु पाहणारे सुनील लोमटे भाजपाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर सुनील लोमटे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रितम मुंडे, आ. नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये आपले काम चालूच ठेवले.

भाजपा कार्यकर्ते ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष या जबाबदारीच्या पदापर्यंत ते स्वकर्तृत्वाने पोहोचले. मध्यंतरी अंबाजोगाई नगर परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटांसाठी आरक्षीत झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ऍड. शोभा सुनील लोमटे यांना भाजपाने उमेदवारी दिली. या निवडणुकीत सुनील लोमटे यांनी आपली ताकद पणाला लावली पण निसटत्या मतांनी ऍड. शोभा लोमटे यांचा पराभव झाला.

सुनील लोमटे हे राजकारणासोबतच सतत सामाजिक कार्यात ही हिरहिरीने सहभाग घेत असत. समाजात अडचणित सापडलेल्या गरीब लोकांना सतत मदतीचा हात देण्यात ते आघाडीवर असत. राजकीय आणि सामाजिक कार्यासोबतच शहरात शिवजयंती उत्सवाला सार्वजनिक स्वरुप देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बीड जिल्ह्यात सर्वसमावेशक स्वरुपातील मोठी शिवजयंती काढण्याचा मान त्यांनी अनेक वर्षे मिळवला होता. आता ही परंपरा त्यांचे लहानबंधु रणजित लोमटे हे सांभाळत आहेत.


राजकीय, सामाजिक जीवनात ऐश्वर्य उपभोगत आहेत असे वाटणारे सुनील लोमटे हे सर्वसामान्य लोकांना कायम मदतीचा हात देत असत म्हणून ते समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपलेच वाटत असत. आज दुपारी अचानक समाज माध्यमांवर सुनील लोमटे यांच्या निधनाची बातमी धडकली आणि शहरातील सर्वसामान्य लोकांसह जिल्ह्यातील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. आपले नेतृत्व उभारी घेत असताना सुनील लोमटे यांच्या निधनाची आलेल्या बातमीमुळे शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुनील लोमटे हे माजी उपनगराध्यक्ष बबन भैय्या लोमटे, दिनेश लोमटे, महेश लोमटे, रणजित लोमटे हे चार भाऊ एक बहीण अशा मोठा परीवारातुन होते. सुनील लोमटे यांच्या पश्चात पत्नी ऍड. शोभा लोमटे, मुलगा कृष्णा आणि मुलगी श्री असा परीवार आहे. उद्या ६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुनील लोमटे यांच्या पार्थिवावर बोरुळा तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker