नवजिवन व्यसनमुक्ती केंद्राच्या बीड, अंबाजोगाई, वाघाळा येथील केंद्रे सील
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230311_171935-297x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230311_171935-297x300.jpg)
व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीर पणे रुग्णांची छळवणूक, महिलांचे लैंगिक शोषण, बेकायदा औषध उपचार करणाऱ्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा भांडाफोड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी पोलिसांच्या मदतीने केला. नवजीवन चे केज, मोरेवाडी, वाघाळा आणि बीड येथील केंद्र सील करून पोलीस आणि आरोग्य प्रशासनाने येथील रुग्णांची सुटका केली आहे. डॉ साबळे यांच्या या धडाकेबाज कारवाईची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातील एका महिला डॉक्टर कडे शरीरसुखाची मागणी करून त्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अंजली पाटील, संचालक डॉ राजकुमार गवळे आणि ओम डोलारे यांच्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधिक्षक ठाकुर यांच्या आदेशानुसार पथकाने केली कारवाई
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230311_170209-809x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230311_170209-809x1024.jpg)
यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, कविता नेरकर, पंकज कुमावत यांच्या पथकाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांना सोबत घेत वाघाला, मोरेवाडी, केज आणि बीड शहरातील जिजामाता चौक भागात असलेल्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रावर छापे घातले.
विविध केंद्रातील १२८ रुग्ण शासकीय रुग्णालयात हलवले
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230311_170336-300x164.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230311_170336-300x164.jpg)
बीड येथील केंद्रातून 28 रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवले तर केज, मोरेवाडी आणि वाघाला येथील तब्बल शंभर पेक्षा अधिक रुग्णांना त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीर कारभार सुरू होता.
खोटी कागदपत्रे, एक्सपायरी औषधांचा साठा जप्त
या सर्व केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी झालेली औषधें, बेकायदेशीर स्टाफ,खोटी कागदपत्रे, गोळ्या औषधे आढळून आली. हे चारही केंद्र सील करण्यात आले आहेत तसेच या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली राजरोसपणे बेकायदेशीर कामे केली जात होती, मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी औषधे या ठिकाणी वापरली जात होती, ही सर्व केंद्र सील करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.