शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी सिफा काम करणार


देश पातळीवर शरद जोशींच्या विचाराने काम करणाऱ्या शेतकरी संघटनाचे फेडरेशन म्हणजेच सिफा (consortium of Indian farmer associations) असून शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची सिफाची तयारी आहे असे प्रतिपादन रघुनाथदादा पाटील यांनी केले.शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेते ब.ल.तामसकर यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
'सिफा'च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या वतीने अंबाजोगाई जि बीड येथे किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या हस्ते आणि शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांच्या उपस्थितीत रघुनाथदादा पाटील यांचा सन्मान सोहळा 17 फेब्रुवारी 2023 रोजी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात पार पडला. यावेळी 'नव्या युगाची शेती' हा परिसंवाद झाला.डॉ.प्रशांत शिनगारे यांनी पवन,सौर ऊर्जा तसेच इथेनॉलमुळे शेतीक्षेत्रात होणारे बदल याविषयी माहिती दिली.
महिको सीड्सचे राहुल पाठक यांनी जनुकीय परावर्तित (GM seed) बियाणावरिल संशोधनाला बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे? याबद्दल सविस्तर माहिती दिली.
'शेतकरी आत्महत्या'ही राष्ट्रीय आपत्ती तयार झाली असून दरवर्षी प्रमाणे 19 मार्च या दिवशी देश विदेशातील किसान पुत्रांनी सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग करावा असे आवाहन केले. आगामी काळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचा असून सर्वांनी एकत्रितपणे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. रघुनाथदादा पाटील यांनी अमर हबीब यांच्या मताशी सहमती व्यक्त केली.
शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी रघुनाथदादा पाटील यांना दिलेल्या सन्मान पत्राचे वाचन केले. प्रास्ताविक बीडचे जिल्हाध्यक्ष अनुरथ काशीद यांनी केले तर सूत्रसंचालन युवा आघाडीचे हनुमंत चाटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजिमोद्दीन शेख, लखन होके,राधाकिसन गडदे,मच्छिंद्र जगताप,सुभाष मायकर,सतीश रिंगणे,परमेश्वर पिसुरे,प्रशांत होके, वैजनाथ होके,संजय आपेट, विनोद बुरांडे,मनोज इंगळे यांनी प्रयत्न केले
.