दर्जेदार राजमा निर्मितीसाठी कापणी, मळणी करताना काळजी घ्यावी
कृषी समन्वयक शिवप्रसाद येळकर यांचे आवाहन
दर्जेदार राजमा निर्मितीसाठी कापणी मळणी करताना काळजी घ्यावी असे आवाहन कृषी तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी केले.
राजमा हे पीक शेतकऱ्यांना नवीन असल्याकारणाने राजमा पिकाची काढणी मळणी करताना होणारे नुकसान टाळण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी कोदरी येथे शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना राजमा झाडांची निरीक्षणे दाखवली शेंगांमधील हिरव्या व सुरकुत्या पडलेले बियाणे चांगल्या राजमामध्ये मिसळल्यामुळे भाव कमी मिळेल याकरिता राजमा काढणी करताना योग्य झाडांची निवड करणे, इतर जातीचे वाण अलग करणे, दोन जातींचे ढीग वेगवेगळे करणे, शेंगा पूर्णपणे वाळून पिवळ्या झाल्याच्यानंतर व पानांची गळ झाल्याच्यानंतर राजमा पिकाची कापणी सकाळी लवकर करावी जेणेकरून दुपारी उन्हामुळे शेंगा फुटणार नाहीत, ज्या झाडांच्या शेंगा हिरव्या आहेत ती झाडे कापून शेतामध्ये उन्हात वाळत घालावीत लगेच ढीगामध्ये मिसळू नयेत, अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन कापणी केलेली रोपे दोन-तीन दिवस उन्हात ठेवून व्यवस्थित वाळल्यानंतर ढीग तयार करावा, ट्रॅक्टरचलित मळणी यंत्राने राजमा पिकाची मळणी करण्यासाठी मका किंवा काबुली चना मळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या चाळणीचा वापर करावा, बियाणे फुटू नये याकरिता मळणी यंत्राच्या पंख्याची गती ७२० फेरे प्रति मिनिट आणि कटरची गती ३५० फेरे प्रति मिनिट ठेवावी, चाळणी व कटर ड्रम मध्ये सहा इंच अंतर ठेवावे, चाळणीवर बियाणे आदळू नये यासाठी चाळणीची गती मध्यम ठेवून मळणी करावी, मळणी झाल्याच्यानंतर बियाण्यातील ओलाव्याचे १५ टक्के पेक्षा कमी करण्यासाठी राजमा सावलीमध्ये वाळवावा, उन्हामध्ये राजमा बियाणे वाळवल्याने बियाण्याचा रंग बदलून दर कमी मिळतो त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये राजमा उन्हामध्ये वाळवू नये याची माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.