महाराष्ट्र

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जयवंती नदीच्या स्वच्छतेसाठी सरसावली अंबाजोगाई नगर परिषद

सुओ-मोटु याचिकेनंतर दिले आदेश!

अंबाजोगाई शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या जयवंती नदीच्या बचावासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ सरसावले असून यासंदर्भातील सुओ-मोटो याचिका खंडपीठाने दाखल करुन घेतल्यानंतर आता नगर परीषदेच्या हद्दीत येणारे जयंती नदीच्या पात्राची तातडीने स्वच्छता करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सदरील आदेशानुसार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी स्वच्छता निरीक्षकास दिलेल्या आदेशानुसार जयवंती नदीच्या पात्राची स्वच्छता युध्दपातळीवर हाती घेण्यात आली आहे.


जयवंती नदीच्या स्वच्छतेसंबंधी वढाय व एकुण तिच्या अस्तित्वा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २०२१ साली सुओ-मोटु याचिका (९९९ सुओ-मोटु पीआयएल) क्र. २ ऑफ २०२१ दाखल करुन घेतली होती. या याचिके संदर्भात न्यायालयाने २४ जानेवारी २०२३ आदेश पारीत केले आहेत. या आदेशाचा संदर्भाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना ३१ जानेवारी २०२३ रोजी कार्यालयीन पत्र देवून नगर परिषदेच्या हद्दीतील जयवंती नदीचे पात्र करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

मुख्याधिकारी यांनी दीले आदेश


संदर्भीय आदेशात मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, “मा. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार नगर परिषदेच्या हद्दीतील जयवंती नदीच्या पात्राची स्वच्छता करणेचे काम तातडीने सुरु करण्यात यावे. अंबाजोगाई नगर परिषद हदीतून जो जयवंती प्रवाह वाहत जातो त्याच्याशी संबंधित SUO MOTO (PIL) NO.2 OF 2021 याचिका मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सुरु आहे. सदर प्रकरणात दि. २४ जानेवारी २०१३ रोजी मा. न्यायालयाने नगर परिषद कार्यालयाला आदेश पारित केलेले आहेत. सदरील आदेशात नगर परीषद हद्दीतील जयवंती प्रवाहाचा जो मार्ग आहे तो सर्व मार्ग नगर परिषद कार्यालयाकडून स्वच्छ करण्यात यावा. तसेच केलेल्या कामाचे फोटो पुढील सुनावणीच्या वेळी मा. न्यायालयात सादर करण्यात यावेत.”


मा न्यायालयाने दिलेल्या वरील निर्देशाच्या अनुषंगाने आपणाला या कार्यालयीन आदेशाद्वारे सूचित करण्यात येते की, नगर परीषद हद्दीतील जयवंती नदीच्या प्रवाहाच्या मार्गात जी अस्वच्छता आहे ती सर्व तात्काळ स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात यावे. यासाठी आपण आपल्या विभागाकडील सर्व यंत्रणा त्यासाठी वापरावी. त्याव्यतिरिक्त आपणाला काही यंत्रणा आवश्यक असल्यास आपण त्याचा देखील वापर करावा आणि या कार्यालयीन आदेशाचे दिनांका पासून जयवंती नदीच्या प्रवाहाच्या स्वच्छतेचे कामकाज सुरु करावे. काम करत असताना काम सुरु करण्यापूर्वीचे GPS फोटो आणि काम केल्यानंतरचे GPS फोटो घेण्यात यावेत. काम समाप्त झाल्यावर केलेल्या कामाच्या अहवालासोबत सर्व फोटो कार्यालयाला सादर करण्यात यावेत जेणेकरून सदर सर्व दस्ताऐवज मा.न्यायालयाला सादर करता येईल. असे म्हटले आहे. या कार्यालयीन आदेशावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांची स्वाक्षरी आहे.

स्वच्छतेला भिमकुंडापासुन झाली सुरुवात!

औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १ फेब्रुवारी पासून स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी आपल्या विभागामार्फत जयवंती नदीचे उगमस्थान असलेल्या भीमकुंडापासुन स्वच्छतेस सुरुवात केली आहे. आज दुपारपर्यंत हे काम शहरातील मुख्य रस्त्यावरील पुलापर्यंत आले होते. नगर परीषदेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने जयवंती नदीच्यि स्वच्छतेचे काम करतांना जेसीबीच्या सहाय्याने फक्त नदीपात्रातील कचरा, व साचलेली घाण तात्पुरत्या स्वरूपात नदीपात्रात संरक्षण भिंतींच्या बाजूला गोळा करून ठेवण्यात येत आहे. हे काम नगर परीषदेची हद्द संपणा-या राजस्थानी स्मशानभूमीपर्यंत करण्यात येणार असल्याचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी सांगितले.

जयवंती काठावर उभी अनेक ऐतिहासिक मंदिरे!

अंबाजोगाई शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे वेगवेगळे संदर्भ आणि ऐतिहासिक महत्व या शहराला प्राप्त झाले आहे. अंबाजोगाई शहराच्या मध्यभागातुन खळखळत वाहत जाणारी जयवंती नदी ही एक ऐतिहासिक संदर्भातील महत्वाचा भाग आहे. याच नदीच्या तीरावर माता योगेश्वरी आई, जैन व वैष्णव गुहा, हत्ती खाना, माता रेणुका आई, मराठीचे आद्दकवी स्वामी मुकुंदराज आणि पुढे जडीबुटी चे जनक बुट्टेनाथ यांची भव्य मंदीरे आज ही दिमाखात उभी आहेत.

नदी नव्हे सांडपाणी वाहून नेणारा नाला?

पुर्वी विस्तीर्ण नदी पात्र असलेली ही नदी शहर विकासाच्या रेट्यात जमिनीला जसजसे महत्व येत गेले, तसतशी ही नदी अरुंद होत गेली. एवढी अरुंद झाली की शहरात विस्तीर्ण पात्र असलेल्या या नदीचा नालाच झाला. शहरातील विविध वस्त्यांचे घाण पाणी, हेअर सलुन मधील केस, हॉटेल मधील घाण, शहरातील खाजगी हॉस्पिटल मधली घाण जयवंती नदीच्या पात्रात टाकण्यात येत असल्यामुळे ही नदी न रहाता सांडपाणी वाहून नेणारे एक गटार असे स्वरुप या नदीला मिळाले आहे.

जयवंदी नदी ही जनता आणि प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा बळी; न्यायालयाचा निष्कर्ष

जयवंती नदीचा जीव घोटत, गुदमरत जात असतांनाही या नदीला वाचवण्यासाठी शहरातील नागरीक, नगर परीषद प्रशासन, तहसील प्रशासन एवढेच काय पर्यावरण आणि प्रदुषण मंडळाचे अधिकारी कर्मचारी पुढे सरसावत नाहीत हे लक्षात येताच औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने या नदीच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे.
औरंगाबाद उच्च न्यायालयाचे खंडपीठ या जयवंती नदी संवर्धनासाठी पुढे सरसावले असून खंडपीठाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. जयवंती नदी ही जनता आणि प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा बळी ठरल्याचा ठपका याचिकेत ठेवण्यात आला आहे. याचिकेत राज्य शासन, सचीव, पर्यावरण व हवामान बदल खाते, सचीव नगर विकास आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, बीड जिल्हाधिकारी, अंबाजोगाई तहसीलदार आणि अंबाजोगाई नगर परीषदेचे मुख्याधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

जयवंती नदीचे संभाव्य उगमस्थान भिमकुंड


जयवंती नदी संदर्भात दाखल करून घेण्यात आलेल्या या सुओ-मोटो याचिकेत नदीचे संवर्धन करण्यासाठी या यंत्रणेचा हलगर्जीपणा दिसुन आला असून सदरील नदीला विळखा घालणारी अतिक्रमणे ही काढण्यात हलगर्जीपणा केल्याचे दिसून आला असल्याचे म्हटले आहे.
अगोदरच मराठवाड्यातील बीड, लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्हृयातील हा विभाग अवर्षण ग्रस्त म्हणून ओळखल्या जातो, त्यात या नदीपात्रातील अतिक्रमणांनी नदीचे पात्र अरुंद झाले आहे. नदी पात्रात गाळ साचल्याने पाणी ही साचल्या जात नाही. जयवंती नदी ही अंबाजोगाई शहराची संजीवनी असून या नदीला नवसंजीवनी देण्याची गरज असल्याचे या सुओ-मोटो याचिकेत म्हटले आहे. ऍड. सचीन देशमुख हे या याचिकेत न्यायालयाचे मित्र म्हणून काम पहात आहेत.

काय आहे “सुओ-मोटु” ?
——————————-
सुओ मोटो म्हणजे सरकारी एजन्सी न्यायालयाव्दारे किंवा केंद्रीय प्राधिकरणाने इतर केलेल्या आरोपावरुन केलेली कारवाई. माध्यमांद्वारे अथवा तृतीय पक्षाच्या सुचनाव्दारे अधिकारांच अथवा कर्तव्याच उल्लंघन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कायदेशीर प्रकरणासाठी न्यायालय सुमोटो दाखल करुन घेत असतात. जनतेच्या हितासाठी अशी प्रकरणे दाखल करुन घेणे आणि निर्णय देणे यांचा विशेष अधिकार राज्य घटनेने न्यायालयांना दिला आहे. यामुळे अशा याचिकांना विशेष महत्त्व आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker