स्वामीजींच्या नेतृत्वाखालील हैद्राबादच्या मुक्तीसंग्राम समजावून घेणे आवश्यक; डॉ. निशिकांत भालेराव
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230122_165436-300x295.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230122_165436-300x295.jpg)
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्राम आजच्या पिढीला समजून घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ, मुक्त पत्रकार, संपादक निशिकांत भालेराव यांनी केले. येथील योगेश्वरी शिक्षण संस्था व स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर लोकशाहीचा आपणा सर्वांचा या कार्यक्रमांतर्गत दि.22 जानेवारी ते 30 जानेवारी 23 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे . स्वामी रामानंद तीर्थ पुण्यतिथी निमित्त स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. निशिकांत भालेराव यांनी गुंफले.त्यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील अनेक बाबींवर प्रकाश टाकला. स्वामी रामानंद तीर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाकांक्षी संधीसाधू, धर्मांध निजामा विरुद्ध संघर्ष करुन हैदराबादच्या स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त केला असे मत निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230122_165512-224x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230122_165512-224x300.jpg)
हैदराबादचा लढा एक तारेवरची कसरत होती. हैद्राबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेनंतर स्वामी रामानंद तीर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली निजामी राजवटीविरुद्ध, धर्मांध रझाकारांविरुध्द, मजलिस इत्तेहादूल मुसलमिन या धर्मांध संघटनेविरुध्द संघर्ष करुन हैद्राबाद संस्थानला स्वातंत्र्य मिळवून दिले. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने ऑपरेशन पोलो राबवून सातवा निजाम मीर उस्मान अली याला शरण येण्यास भाग पाडले असे मत निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप जेष्ठ संशोधक, इतिहास तज्ञ डॉ प्रभाकर देव यांनी केला. स्वामी रामानंद तीर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अतुलनीय कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. हैदराबादचा लढा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी होता असे नाही तर सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य, मध्ययुगीन परंपरेपासून मुक्ति मिळविण्यासाठीचा लढा होता असे मत त्यांनी व्यक्त केले. हा लढा पुरुषांप्रमाणे स्त्रीयांनी देखील लढला होता. दगडाबाई शेळके, आशाताई वाघमारे, गीताताई चारठाणकर,करुणाताई, ताराबाई परांजपे इ. अनेक स्त्रीयांच्या त्यागातून हे स्वातंत्र्य मिळाले. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील जंगल सत्याग्रह,उमरी बँक प्रकरण यावर प्रकाश टाकला व स्वातंत्र्यविरांच्या नि: स्वार्थ त्यागाची माहिती प्रभाकर देव यांनी करून दिली.
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.भारतीय स्वातंत्र्य लढा व हैद्राबादचा लढा हे एकाच स्वातंत्र्य लढ्याचे दोन भाग होते असे मत व्यक्त केले. राजकीय स्वातंत्र्य, संविधान निर्मिती व तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणे हे स्वामीजींना अभिप्रेत होते असे मत व्यक्त केले.स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य विरांचे उचित स्मारक उभा करण्यासाठी योगेश्वरी शिक्षण संस्था कार्य करीत आहे हे त्यांनी नमूद केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230122_170136-300x166.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230122_170136-300x166.jpg)
या कार्यक्रमाची सुरुवात स्वरांजलीच्या कार्यक्रमाने झाली. श्रीमती गो. कुं. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना परोपकारी, स्मिता धावडकर व त्यांच्या संचाने कांहीं भजने सादर केली. सूत्रसंचालन कार्यक्रमाच्या संयोजिका, महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या संयोजिका डॉ शैलजा बरुरे यांनी केले . या उपक्रमाची माहिती दिली. गेल्या दहा वर्षांपासून जागर लोकशाहीचा कार्यक्रम घेत आहोत हे नमूद केले. आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रमेश सोनटक्के यांनी केले.
या कार्यक्रमाला योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव कऱ्हाड, कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर, सचिव गणपत व्यास गुरुजी, कोषाध्यक्ष प्रा. माणिक लोमटे, सहसचिव डॉ साहेबराव गाठाळ, प्रा एस. के. जोगदंड,एन. के . गोळेगावकर शेटे, चंद्रशेखर बर्दापूरकर, राठोड मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर औसा येथील डॉ. सुनील पुरी, डॉ. व्यंकट कोलपुके ( लातूर) ,उदय आसरडोहकर, बाळकृष्ण रामपुरकर दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य शाळांचे मुख्याध्यापक , महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.