केज येथील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या वर प्राणघातक हल्ला


केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक आज दुपारी घडली. या हल्ल्यातून त्या बालंबाल बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
नायब तहसीलदार आशा वाघ आज दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे मोपेडवरून येत होत्या. दरम्यान, एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला. मात्र, यातून त्या बालंबाल बचावल्या आहेत.
यापुर्वी भावानेच केला होता हल्ला
केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या आशा वाघ यांच्यावर यापुर्वी ६ जून २०२२ रोजी त्यांचा सख्ख्या भावानेच कार्यालयात घुसून जीवघेणा हल्ला केला होता. नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर केलेला हा हल्ला कौटुंबिक कलहातून केली असल्याचे यावेळी निष्पन्न झाले होते. या हल्ल्यात आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यात वार करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
त्यानंतर आज पुन्हा आशा वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. आशा वाघ या गेली अनेक वर्षांपासून केज येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळापासूनच आशा वाघ या वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिल्या आहेत. आज भर रस्त्यात त्यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.