वसंता… वसंत मुंडे ते वसंतराव मुंडे!
वसंता आणि माझी ओळख तशी वसंता पत्रकारीतेत येण्यापूर्वीच! मी पत्रकारीतेत स्थिरस्थावर होवू लागलो होतो आणि वसंता पत्रकारीतेत आपले नशीब आजमवण्यासाठी धडपडत अंबाजोगाईत आला होता, तेंव्हा पासुनची!
लहान मोठ्या वर्तमानपत्रात काम करुन लोकमत सारख्या तेंव्हा प्रचंड खप असलेल्या दैनिकात माझे ज्येष्ठ सहकारी कै. प्रा. भालचंद्र मोटेगावकर सरांच्या नंतर लोकमत मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी लोकमत मध्ये काम करणे ही तशी अवघड कामगिरी होती, आपल्या सर्वांच्या सहकार्याने सलग १७ वर्षे ती मला पार पाडता आली!
लोकमतचे सर्वेसर्वा आदरणीय राजेंद्र दर्डा यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी प्रभावीपणे यशस्वी करीत असतांना त्यांनी अंबाजोगाईत मराठवाड्यात पहीले लोकमतचे उपविभागीय कार्यालय सुरु केले आणि त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली.
याच काळात वसंता माझ्या संपर्कात आला. दहावीची परीक्षा पास होवून महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तो अंबाजोगाईत आला होता. वडिलांचे छत्र हरवलेले, कोरडवाहू अल्प भु धारक शेतकऱ्यांचा मुलगा. शिक्षण आणि उदरनिर्वाहा साठी लागणारे पैसे आपण स्वतः कमवावेत आणि आपले शिक्षण पुर्ण करावे ही उर्मी घेवून कामाच्या शोधात फिरणारा वसंता असाच एके दिवशी मला लोकमतच्या कार्यालयात येवून भेटला. काही काम आहे का हे विचारण्यासाठी!
वसंताचा चुनचुनीतपणा आणि त्याची कोणतीही करण्याची धडपड माझ्या लक्षात आली आणि माझे मित्र ज्येष्ठ पत्रकार कै. मुश्ताक हुसेन सर
यांची आणि वसंता ची मी भेट घालून दिली. मुश्ताक हुसेन सरांनी त्यावेळी मासिक शिक्षक पत्रिका सुरु केली होती. संपुर्ण मराठवाड्यात ही पत्रिका स्वतः वितरीत करणारा मुलगा त्यांना हवा होता. वसंता ने हे काम स्विकारले आणि लिलया ते सिद्ध करुन दाखवले.
वसंता ने हे काम करीत असताना वृत्तपत्र वितरणातील बारकाव्यांचा अभ्यास करीत पत्रकारितेचे आपले लक्ष केंद्रित केले.
पुढे दैनिक लोकपत्र मध्ये अंबाजोगाई येथील प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी बीड येथील एका वरीष्ठ पत्रकाराने माझ्याकडे विचारणा केली आणि लोकपत्र साठी मी वसंता चे सुचवले.
वसंता पत्रकार झाला! कॉलेज झाले की वसंता मग माझ्याकडे यायचा. त्याकाळी बातमी मिळवण्यासाठी तिची माहिती काढण्यासाठी सतत फिरावे लागायचे. घटनास्थळी भेटी देणे, अधिका-यांचे म्हणणे समजावून घेणे, त्यांच्या कडुन अधिकृत माहिती घेणे, वस्तुस्थिती तपासुन पहाणे, पोलीस स्टेशन, न्यायालय, रुग्णालयात घडलेल्या घटनांची माहिती कागदावर लिहून घेणे आणि नंतर कार्यालयात येवून बातमी तयार करुन बसने औरंगाबाद कार्यालया पाठवणे. या सर्व कामात वसंता माझ्या सोबत असायचा. माझ्या स्कुटरवर वसंता हा संपुर्ण तालुकाभर फिरायचा. विविध घटनांचे टीपण, गुन्हा रजिस्टर नंबर, आरोपींचे नावे, रुग्णालयात जखमीचे, मयताची नाव, एखाद्या कार्यक्रमात पाहुण्यांची नावे, भाषणांचे तपशील दिसुन घेणे ही सर्व जबाबदारीची कामे वसंता लिलया करायचा!
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या आंदोलनात वसंता पत्रकारांवर वाकडी नजर असलेल्या एका पोलीस निरीक्षकाच्या तावडीत सापडला, त्याने सोबतच्या एसआरपी कडुन वसंताला बेदम मारहाण केली. वसंताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जिल्हा निर्मिती आंदोलनात घायाळ झालेल्या वसंता चे नाव मग जिल्हाभर झाले.
वसंता ला पुढे पत्रकारीतेत करीयर करण्याची संधी बीड येथे मिळाली. लोकपत्र या दैनिकात तो जिल्हा प्रतिनिधी म्हणून रुजू झाला. या आनंदी क्षणी वसंताचा पहिला सत्कार मी लोकमतच्या कार्यालयात जिल्हा प्रतिनिधी जगदीश पिंगळे यांच्या हस्ते केला. वसंता बीड ला गेला, आणि तो बीड चाच झाला! बीड घ्या सुमित भक्कम पाय रोवून उभा राहिला. मग त्याने मागे वळुन पाहीलेच नाही. लोकपत्र मधून लोकसत्ता असा प्रवास करीत त्याने बीड जिल्हा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे संघटन आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. आज तो महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षांपासून काम पहात आहे. पत्रकारिता, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात वसंता ने केलेली प्रगती थक्क करुन सोडणारी आहे.
वृत्तपत्र वितरण व्यवसायात पदार्पण करुन स्वतः चे भविष्य आजमावणारा वसंता आज पत्रकारीतेतील एक ब्रॅण्ड झाला आहे. वसंता आणि माझे गेली अनेक वर्षांपासून चे संबंध आता अधिक दृढ करण्यासाठी माझा मुलगा आशुतोष ही वसंताचा मित्र झाला आहे.
आज वसंता चा वाढदिवस! वसंता तुझी पत्रकरीता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तुझी प्रगती यापुढेही सतत अशीच झळाळत रहावो, हीच या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा! जुग जुग जियो मेरे यार!
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मित्रा!!
🌹