मंदिरांचे गावं

दासोदिगंबर आणि एकमुखी दत्तमुर्ती!

दत्तजयंती विशेष!!

७ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्वज्ञ दत्तात्रय यांना आपले गुरु माणून आयुष्यभर त्यांची सेवा करणारे त्यांचे निस्सीम भक्त संत दासोपंत यांचे अंबाजोगाई येथे अधिष्ठान आहे. दत्त भक्तांसाठी दासोपंतांनी निर्माण केलेली दोन स्वतंत्र देवघरे ही येथे आहेत. थोरले देवघर आणि धाकटे देवघर या नावाने ती ओळखली जातात. थोरल्या देवघरात दासोपंतांना ज्या विविध सोळा रुपात दत्तात्रेयांनी दर्शन दिले त्यांच्या मुर्ती आहेत तर धाकट्या देवघरात दासोपंतांना गाणगापुर येथे मिळालेल्या दत्ताच्या पादुका आहेत. थोरल्या देवघरात दासोपंतांनी आपल्या शेवटच्या कालावधीत निर्माण केलेली एकमुखी दत्ताची मुर्ती आणि दत्ताच्या सोळा रुपातील मुर्तीची नित्यनेमाने आजही पुजा केली जाते. थोरले आणि धाकटे देवघर हे अनेक दत्तभक्तांचे आजही श्रध्दास्थान आहे. तेंव्हा सर्वज्ञ दासोपंत आणि सर्वज्ञ दत्तात्रय यांच्या बद्दलची माहिती आपण या लेखात जाणून घेवून या.

थोर संत श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी ज्यांनी संपुर्ण आयुष्य श्री दत्तसेवा करून अखंड ज्ञानसाधना केली व त्या ज्ञानसाधनेच्या चिंतनातून सव्वा लक्ष पदार्णव, सव्वालक्ष गीतार्णव, गीतार्थबोध चंद्रिका, ग्रंथराज, पासोडी, श्रीदत्त महात्म्य ( मराठी व संस्कृत ) उपनिषदांवर लेखन आदि साहित्य भांडार निर्माण केले. आपल्या भक्तांसाठी ज्ञानामृत देऊन जीवनोद्धाराचा मार्ग दाखविला. त्यांच्या अनेक पदातून भक्तियोग ज्ञानयोग कर्मयोग सांगितला आहे. पदार्णवातून सांगितलेल्या ज्ञानाचा स्वीकार करून ते जर आचरणात आणले तर अन्य कोणती साधना करावयाची गरज नाही असेच सर्वज्ञ दासोपंत यांनी सांगितले आहे.
दासोपंतांचा जन्म शके १४७३ भाद्रपद वद्द ८, सोमवार रोजी बिदर परांगण्यातील नारायण पेठचे दिगांबरपंत देशपांडे आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या पोटी झाला. दिगांबरपंत यांच्या निवासी त्याकाळी साक्षात लक्ष्मींचे वास्तव्य होते. अतिशय सुखी आणि गडगंज संपती या देशपांडे कुटुंबियांकडे होती.
अशा या गडगंज श्रीमंत असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या दासोपंतांचा जीवनप्रवास अतिशय थक्क करुन सोडणारा आहे. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे वडील दिगांबरपंतांनी दासोपंतांचा उपनयनसंस्कार (मुंज) अतिशय थाटात केला. पाचव्यावर्षी मुंज, सोहळ्याव्या वर्षी गृहत्याग, त्यानंतर बारा ते तेरा वर्षे तपश्चर्या आणि ३५ ते ४० व्या वर्षादरम्यान अंबाजोगाईत येणे आणि वयाच्या ६४ व्या वर्षापर्यंत सतत प्रापंचिक स्वार्थावर पाणी सोडून समाज कल्याणासाठी आपली लेखणी अविरत झिजवत जगण्याचे अधिधारावृत्त दासोपंतांनी स्विकारले आणि ते आयुष्याच्या शेवटपर्यंत जपले. या काळात त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून हिंदुधर्माच्या वृध्दीसाठी सातत्याने प्रयत्न केले.
दासोपंतांना ६४ वर्षाचे आयुष्य मिळाले असले तरी प्राचीनकाळी त्यांच्या संबंधीची लेखन सामुग्री अशी विशेष पहावयास मिळत नाही. जुन्या चरीत्रांचा अभ्यास केला आसता दासोपंतांच्या जीवनचरित्राचे धागेदोरे सापडणे ही तशी अत्यंत कठीण बाब असल्याचे जाणवते. प्राचीन काळात महिपतीने लिहिलेल्या “भक्तविजय” या ग्रंथात दासोपंतांना नमन केल्याचा उल्लेख आहे तर “भक्तलिलामृत” या ग्रंथात दासोपंतांचा “दत्तअनुग्रही” असा उल्लेख केला आहे. समर्थ सांप्रदायातील “जयरामसुत” आणि “गिरीधर” या दोन ग्रंथात दासोपंतांची आणि ज्ञानेश्वर व संत एकनाथ यांची भेट पैठण मुक्कामी झाली आसल्याचा उल्लेख असून त्यांच्या गीतार्णवाचा ही उल्लेख केला असल्याचे सांगितल्या जाते.


१४ व्या शतकात वयाच्या पस्तीशी ते चाळीशीच्या दरम्यान दासोपंत अंबाजोगाई येथे आले असता त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. त्यांनी लिहिलेला “गीतार्णव” हा ग्रंथ बुटेदरडीच्या (बुटेनाथाच्या) गुहेत लिहिला असल्याचा उल्लेख आहे. तर अंबाजोगाई येथील वास्तव्यात दासोपंतांनी गीतार्णव, गीतार्थचंद्रिका, प्रबोधोदय, पदार्णव, ग्रंथराज, उपनिषदभाष्य (संस्कृत) आणि पासोडी पंचीकरण या ग्रंथांचे लिखाण केले. संस्कृत भाषेतील उपनिषदभाष्य हा ग्रंथ सोडला तर उर्वरीत ग्रंथात सुमारे पावणेदोन लाख ओव्यांची रचना दासोपंतांनी केली आहे.
सोळाव्या शतकात हिंदुधर्मातील लोकांना जबरदस्तीने मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याच्या कारवाया सुरु असतांना दासोपंतांनी हिंदु धर्मातील लोकांना मुस्लिम धर्मात प्रवेशापासून रोखण्यासाठी संत जनार्धन आणि संत एकनाथांना सोबत घेवून खुप मोठे काम केले होते.
मराठी साहित्यात विपुल लेखन करुन अलौकिक कामगिरी केलेल्या दासोपंतांच्या या तुरळक आठवणी अनेक जुन्या ग्रंथात आहेत. दासोपंत हे लहानपणापासूनच नृसिंह आणि दिगांबर (दत्तात्रय) यांचे निस्सीम भक्त होते. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी देह त्यागला तेंव्हा त्याची समाधी शहरालगत असलेल्या पुरातन नृसिंह मंदिर आणि महादेव मंदिराशेजारी बांधण्यात आली. सुरुवातीच्या काळात लहान असलेल्या या समाधीचा दासोपंतांच्या शिष्यांनी नंतर जीर्णोद्धार करुन मोठ्या समाधीत तीचे रुपांतर केले. याच काळात या परीसरातील दोन्ही नृसिंह तीर्थाशेजारी
ओव-या बांधण्यात आल्या. आणि दासोपंतांचा वार्षिक महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यास त्यांच्या शिष्यांनी सुरुवात केली.
दासोपंत समाधी परीसरातील नृसिंह तीर्थावर पिंडदानाचा विधी करणे यास पुरुषोत्तमपुरी येथील गंगाकाठावर हा विधी करणेस जेवढे महत्व आहे तेवढेच मोठे धार्मिक महत्त्व आहे. आज ही या तीर्थावर अनेक जण पिंडदानाचा विधी करतात. पुर्वी या नृसिंहतीर्थात अस्थीविसर्जन ही करण्यात येत असे. या तीर्थातील पाण्यात अस्थी विरघळण्याची क्षमता असल्याचे जुने लोक सांगतात. मात्र १९७२ च्या दुष्काळात या तीर्थातील पाण्याने तळ गाठल्यानंतर या तीर्थावर अस्थीविसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली.
खरं तर दासोपंत हा लिहिण्याचा विषयच नाही तर तो अनुभवण्याचा विषय आहे अशी माझी धारणा आहे.
दासोपंतां बध्दल विस्तृत माहिती लिहायची झाल्यास त्याची अनेक पुस्तके लिहावी लागतील एवढे मोठे काम दासोपंतांनी करुन ठेवले आहे. दासोपंतांचे वास्तव्य असलेले घर, त्यांची लिखाणाची जागा, कापडावर लिहिलेली जगातील एकमेव पासोडी, वाटण्यांमध्ये त्यांच्या दोन मुलांनी वाटून घेतलेली घरे यासर्व वास्तु अंबाजोगाईत दासोपंतांच्या आठवणी सतत जागृत ठेवतात. फक्त त्या आठवणी आपल्याला समजावून घेता आल्या पाहिजेत.
अंबाजोगाई शहरात दासोपंतांच्या समाधीकडे आज ही अनेक लोक जागृत देवस्थान म्हणूनच पहातात. या समाधीस्थळी आजही दोन वेळा पुजा अर्चा मोठ्या भक्ती भावाने केली जाते. आज ही दासोपंतांचे अनेक भक्तगण दररोज सायंकाळी आरतीला मोठ्या संख्येने समाधीस्थळी जमतात. दासोपंतांच्या शिष्य परंपरेतील डॉ. भाऊसाहेब देशपांडे यांच्या घराकडे समाधीस्थळाच्या पुजेअर्चेचा मान आहे. या समाधीस्थळी भक्तगणांच्या वतीने आज ही दासोपंतांचा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे संत दासोपंतांचे वंशज गोस्वामी परीवार गुरुस्थानी असून दासोपंतांनी दिलेली आनंद संप्रदायातील परंपरा व उत्सव आजही साजरे करतात.
महाराष्ट्रात मध्ययुगीन काळात होवून गेलेल्या थोर संत परंपरेत दासोपंतांचे नाव खुप महत्वाचे आहे. अनेक प्राचीन तत्वज्ञाने, वेद, उपनिषीदे इत्यादींचे परीशीलन करुन त्यावर भाष्य करणाऱ्या व सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अर्थबोध सांगणा-या दासोपंतांची अंबाजोगाई ही कर्मभूमी होती हे अंबाजोगाईकरांचे खुप मोठे भाग्यच आहे.

 

दासोपंत आणि एकमुखी दत्तमुर्ती


दासोपंत आणि दत्तमुर्ती विषयी एक रंजक आख्यायिका पुराणचरित्रात लिहिण्यात आली आहे. आपला समाधीकाळ जवळ येत चालला असल्याची जाणीव दासोपंतां झाल्यावर त्यांनी आपल्या भक्तांना बोलावून ही बातमी सांगितली. सर्व भक्त अस्वस्थ झाले आणि त्यांनी “आपले सानिध्य सतत जाणवत रहावे अशी कांही वस्तु आम्हा सर्वांना निरवून द्दावी आणि मग वियोग घडावा” अशी विनंती केली. भक्तांच्या मागणीप्रमाणे मग दासोपंतांनी नदीकाठातून शाडू आणायला सांगितला आणि स्वतः या शाडूच्या माध्यमातून दत्ताची सुरेख मुर्ती बनवली. मुर्ती बनवल्यानंतर त्यांनी ती मुर्ती धान्याच्या कणगीत स्वहस्ते पुरुन ठेवली आणि सर्वांना बोलावून सांगितले की, “आज पासून ही मुर्ती एक महिन्यांनी पितळेची होईल, दुसऱ्या महिन्याने पंचधातुची होईल, तिस-या महिन्याने चांदीची होईल, चौथ्या महिन्याने सोन्याची आणि पाचव्या महिन्याने रत्नखचित होईल. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि पाच महिन्यानंतरच ही मुर्ती बाहेर काढा.”
दोसोपंतांच्या या म्हणण्यावर भक्तांचे समाधान झाले. कांही दिवसातच दासोपंतांनी जीवनयात्रा संपवली. दोन महिने संपत आले असता भक्त गणांत चुळबूळ सुरु झाली. निष्ठावंत भक्तांनी आपल्या भावनांना आवर घातला मात्र यातील एका चंचल भक्ताला हा मोह आवरला नाही. त्याने दुसऱ्या महिन्यातच अत्यंत गुप्तपणे त्या कणगीपर्यंत जावून ही मुर्ती गपचुपपणे काढून पाहिली. तेंव्हा ती खरेच पंचधातुची झाली होती. ती मुर्ती त्या चंचल भक्ताने पुन्हा तशीच कणगीत पुरुन ठेवली आणि तेथून गपचुप पळ काढला. पुढे पाच महिन्यांनंतर सर्व भक्तगण एकत्रित आले आणि त्यांनी समारंभपुर्वक ती मुर्ती वर काढली तेंव्हा ती पंचधातुचीच निघाली. पुढे या चंचल भक्तांच्या कृतीचा भांडाफोड झाला. दासोपंतांनी बनवलेली ती मुर्ती अत्यंत सुरेख, कोरीव, मनमोहक, आखीव-रेखीव बनवलेली एकमुखी दत्तमुर्ती आजही थोरल्या देवघरातील देव्हाऱ्यात पहावयास मिळते.


◼️दासोपंत आणि दत्तमुर्ती
—————————-

दासोपंतांनी स्वहस्ते निर्माण केलेली एखमुखी दत्तात्रय मुर्ती आणि दत्तात्रयाच्या सोळा अवतरांच्या मुर्तीची माहिती खालील प्रमाणे आहे. दत्तात्रयाच्या सोळा अवतारांची नावे व उत्सवाची तिथी पुढील प्रमाणे आहे…
१)श्रीयोगीराज, (कार्तिक शु. १५)
२) श्रीआत्रिवरद, (कार्तिक व. १)
३) श्रीदत्तत्रय, (कार्तिक व. २)
४) श्रीकालाग्नीशमन,(मार्गशीर्ष शु.७)
५) श्रीयोगीजनवल्लभ,मार्गशीर्ष शु.१५
६) श्रीलीलाविश्वंभर, (पौष शु. १५)
७) श्रीसिध्दराज, (माघ शु.१५)
८) श्रीज्ञानसागर, (फाल्गुन शु. १०)
९) श्री विश्वंभरावधुत (चैत्र शु. १५)
१०) श्रीमायामुक्तावधुत,वैशाख शु.१५
११) श्रीमायामुक्त(ज्येष्ठ शु. १३)
१२) श्रीआदिगुरु (आषाढ शु.१५)
१३) श्रीशिवरुप (श्रावण शु. ८)
१४) श्रीदेवदेव (भाद्रपद शु.१४)
१५) श्रीदिगांबर (आश्विन शु.१५)
१६) श्री कृषँणशाम (कार्तिक शु. १५)
या सर्व मुर्ती दासोपंतांनी स्वहस्ते बनवल्याचा उल्लेख आहे. एवढेच नव्हे तर यांच्या उत्सवाच्या निरनिराळ्या तिथी आणि हा उत्सव साजरा करण्याची पध्दत ही आपल्या शिष्यगणांसाठी त्यांनी लिहून ठेवली आहे.

@सुदर्शन रापतवार/अंबाजोगाई
७२१८३०९३३३
Sudarshanrapatwar@gmail.com

सुदर्शन रापतवार

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker