आयर्न लेडी… शांता कौर!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_171812.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_171812.jpg)
रजाकाराच्या जमान्यात ती दहा वर्षांची कोवळी पोर होती. घरात चालणारे पिढीजात लोखंडी पत्र्याचे काम ती शिकत होती. नावा प्रमाणेच ती शांता होती…शांताकौर. परळीत तिचा जन्म झाला. लहानाची मोठी तिथेच झाली. वयात येताच तिचे लग्न लातूरच्या तारासिंग टाकशी झाले.तारासिंग पण लोखंडी पत्र्यापासून गृह उपयोगी वस्तू बनवाचे. दोघे मेहेनती. भरपूर कष्ट करायचे. काही दिवसात चांगलीच बरकत आली. सोन्या चांदीचे दागिने पण शांताकौरला तारासिंग यांनी घेतले. शेवटी ती त्यांची राणी साहिबा होती. दोघांचे शिक्षण फारसे झालेले नव्हतेच. त्यामुळे एका नंतर एक अपत्य जन्माला येत होती. शांताकौरचे नऊ बाळंतपणं झाली. त्यातील सात मुलं जिवंत राहिली.
तो दिवस मात्र शांताकौरच्या आयुष्यातील काळा दिवस होता. होत्याचं नव्हतं त्याच दिवशी झाले. तिचे तीन मुलं पोहण्यासाठी म्हणून खदानीत गेली. काय झालं कळलेच नाही. ती पाण्यात उतरली ती परत वर काही आली नाही. तारासिंगला याचा प्रचंड मानसिक धक्का बसला त्यांनी सरळ खदानीच्या पाण्यात उडी घेवून स्वतःला संपवले. शांताकौर च्या आयुष्यात काळाकुट्ट अंधार सोबत चार छोटी मुलं.सगेसोयरे काही दिवसाचे सोबती. पाहता पाहता दूर निघून गेले. घरात होते नव्हते ते विकून जीवन जगणे चालू होते. एकटीला लातुरात जगणे पण मुश्कील. काय कोण जाणे पण तिची श्रद्धा होती अंबाजोगाईच्या जोगाईवर. ती थेट मुलांना घेवून नेसत्या कपड्या निशी अंबाजोगाईला आली जोगाईची जोगीन बनून. सदरबाजारात मोकळ्या जागेवर ती आपले अश्रू आणि बारकी मुलं घेवून कुडकुडत होती. बाजूच्या घरातील लोकांना दया आली त्यांनी तिला झोपायला पोतं दिले. आपल्या छोट्यांना उराशी धरून आभाळाचे पांघरून घेवून ती झोपी गेली.
भिक मागून जगण्याशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. दोन वर्षे ती भिक मागून जगत होती. त्याच भागातील एका कैकाडी बांधवानी तिला निवारा दिला. साधा निवारा दिला तर लोक अनेक वावड्या उठवू लागले. शांताच्या आयुष्यात अशांतता भिनू लागली. ती मुलखाची चिडखोर बनली. तिचा संघर्ष मात्र चालूच होता.तिने हार मात्र मानली नाही. ईश्वरावर आणि नानक देवांच्यावर तिची नितांत श्रद्धा होती. थोडे दिवसात तिने स्वतःच्या मध्ये अंगीभूत असणाऱ्या पत्राच्या वस्तू बनवण्याचे काम सुरु केले. ती त्यात तरबेज होती. कोणत्याही वस्तूचे नुसते चित्र काढून द्या ती वस्तू तयार झाली म्हणूनच समजा.भिक मागण्या पेक्षा आता ती ताठ मानेने व्यवसाय करून जगत होती. मुलांना पण तिने त्यात पारंगत केलं. मोठा पूनमसिंग व त्याची छोटी दोन भाऊ तोरणसिंग आणि दीपक सिंग व मुलगी दयाकौर. काही दिवसात दया कौरचे लग्न पण झाले. तिच्या नशिबी काही विचित्रच लिहिलेलं होतं पहिली मुलगी होताच तिचा नवरा लापता झाला. त्याचा अजूनही काही पत्ता नाही. अनाथ दया आणि तिची तान्ही पोर आईच्या घरी परतली.
यासर्वात शांताकौरचा लढा चालूच होता. तिला तिचा निवारा सोडावा लागला. स्वतःचे घर नसल्याने ती फिरत होती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. शेवटी पोलिस स्टेशन मधील जमादाराला तिची दया आली. त्यांनी तिला पोलिस कॉलनी समोरील मोकळ्या जागेत राहायला सांगितले. तशी ती साप आणि विचवांची जागा. परिस्थिती मुळे आधीच मेलेल्या गरिबांना दंश करून मुक्त करण्यास अजूनही तेथील साप तयार नाहीत. दोघे पण एकमेकांना जगू देतात गेल्या दहा वर्षांच्या पासून. शांताकौर आता आजी झाली आहे. बरीच थकली आहे. किती तरी आजार तिचे सोबती आहेत पण तिच्यातील बाणा मात्र अजून कमी झालेला नाही. सर्व मुलांचे व नातवांचे आधारकार्ड पासून ते बँक खाते काढण्यापर्यंत तिने सगळी कामं केली आहेत. त्या सर्व कागद पत्रांचे लॉकर म्हणजे आजीची पिशवी. एवढेच नाही तर तिने तिच्या नवऱ्याच्या अनाथ बहिणीला पण सहारा दिला.
शिकलकरी समाजातील ही आजी आपली एक पोरगी मुलगी आणि नात,दोन अपंग मुलं व त्यांच्या दोन अपंग बायका व त्याची पाच मुलं यांचा सांभाळ करत खंबीरपणे जगत आहे.लोखंडाचे कामं करत करत शांताकौर वस्तीतील आयर्न लेडी बनली !!!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_172142.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_172142.jpg)
लेखक : प्रसाद चिक्षे
प्रसाद चिक्षे हे ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाई या केंद्राचे संचालक आहेत. समाजातील तळागाळातील लोकांशी सतत संपर्क ठेवून ज्ञानप्रबोधिनी शी जोडल्या गेलेल्या मित्रांच्या सहकार्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. विविध नाविन्यपूर्ण विषयावर लिहीते हा छंद ते सातत्याने जोपासतात.