शेगाव मधील तळमळीच्या भाषणाने राहुल गांधी यांनी लोकांची मने जिंकली; हेमंत देसाई
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221118_211707.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221118_211707.jpg)
शेगावमधील आपल्या तळमळीच्या भाषणाने राहुल गांधी यांनी लोकांची मने जिंकली… अहिंसा, बंधुभाव, त्याग या मूल्यांबद्दलचा आदर आणि सामान्य जनतेबद्दलचे त्यांचे प्रेम… जनतेमध्ये भय निर्माण करून, मग एकमेकांबद्दल नफरत निर्माण केली जाते. म्हणून डरू नका, म्हणजे नफरत आपोआप निघून जाईल, हा ते वारंवार सोप्या शब्दात मांडत असलेला मुद्दा खूप चांगला आहे. लोकांना शिकवण्याची नाही, तर त्यांच्याकडून शिकून घेण्याची त्यांची वृत्ती, शोषित- वंचितांबद्दलची आत्मीयता हे सर्व राहुलजींच्या डोळ्यांत दिसत होते आणि भाषणातून व्यक्त होत होते. शेतकऱ्यांचे व बेरोजगारांचे प्रश्न सर्वात महत्त्वाचे आहेत याची जाण आणि मोजक्या उद्योगपतींना देश आंदण दिला जात आहे याचा वारंवार उल्लेख, हे राहुलजींच्या भाषणाचे वैशिष्ट्य. इतरांची भाषणे ते नीट ऐकून घेत होते. मी कोणाचे काहीही ऐकणार नाही, ‘ मन की बात बोलेन आणि निघून जाईन’ अशी त्यांची वृत्ती दिसली नाही. राहुल यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांचे हसणे, गंभीर होणे यात खरेपणा वाटत होता. बेकारी, महागाई, विषमता या मूळ प्रश्नांपासून समाजाला दूर नेणाऱ्या आंदोलकांपेक्षा, राहुल गांधी यांचे वेगळेपण ठसणारे होते. नाटकी अभिनय करणाऱ्या ‘जगविख्यात’ नटवर्याच्या तुलनेत तर राहुल गांधी हा सरळ साधा माणूस अधिक भिडला. कारण ते अभिनय करतच नव्हते, तर मनातले विचार प्रामाणिकपणे मांडत होते. त्यांना देशात व महाराष्ट्रात निवडणुकीत यश मिळेल किंवा न मिळेल, त्यांनी महाराष्ट्रात आज थरार उत्पन्न केला, हे नक्की!- हेमंत देसाई