ठळक बातम्या

भारत जोडतो यात्रा ही जनतेच्या चिंतेची यात्रा; जयराम रमेश

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो’ (Bharat Jodo Yatra ) यात्रा सुरू असून महाराष्ट्रात यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे. ही यात्रा ‘मन की बात’ ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले. या यात्रेची महाराष्ट्रातील पहिली पत्रकार परिषद आज पार पडली. त्यावेळी जयराम रमेश बोलत होते. भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

आर्थिक विषमता, सामाजिक धृवीकरण विरोधात भारतजोडो पदयात्रा


जयराम रमेश पुढे म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत निघालेली ही पदयात्रा देशातील विदारक परिस्थिती जनतेला अवगत करण्यासाठी आहे. देशात सध्या असलेली आर्थिक विषमता, समाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाहीच्या विरोधात आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची घसरण यासाह सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा असल्याचे सांगितले. राहुल गांधी हे दररोज शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, छोटे व्यापारी यांच्या समस्या, व्यथा जाणून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रतील यात्रेबाबत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 63 दिवस, 6 राज्ये व 27 जिल्ह्यातून ही पदयात्रा मार्गक्रमण करत ‘भारत जोडो’ पदयात्रेचे अर्धे अंतर पार केलेले आहे. पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे समर्थकच नाही तर विरोधकही या पदयात्रेला पाठिंबा देत असल्याचा दावा करताना भारतीय जनता पक्ष- आरएसएसच्या विचारधारेच्या विरोधात देशभरात फक्त काँग्रेसच सामना करू शकत असल्याने जनतेचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

140 भारतयात्री मध्ये फक्त 9 महाराष्ट्रातील


देशभरातील 140 भारतयात्रींमध्ये या पदयात्रेत राहुल गांधी यांच्याबरोबर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सहभागी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 9 भारतयात्रींचा समावेश आहे. यामध्ये डॉ. मनोज उपाध्याय (नवी मुंबई), नंदा म्हात्रे (रायगड), आतिषा पैठणकर (नाशिक), रोशनलाल बिट्टू (चंद्रपूर), पिंकी राजपूत (नागपूर), प्रेरणा गौर (चंद्रपूर), श्रवण रपनवाड (नांदेड), महेंद्र बोहरा आणि वैष्णवी भारद्वाज (नागपूर) हे भारत यात्री सहभागी आहेत.

भाजपाच्या टीकेकडे दुर्लक्ष करा

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रा निघाल्यापासून भारतीय जनता पक्ष टीका करत गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे. पण त्याकडे फारसे लक्ष देण्याचे गरज नाही. ‘भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो’ असा प्रतिटोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. पदयात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून जनतेच्या भावना समजून घेत आहेत. ही मुव्हमेंट आहे इव्हेंट नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker