महाराष्ट्र

राज्यातील चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ बंद होणार?

शिक्षणाच्या आईचा घो सुरू असतांना राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी इयत्ता चौथीपर्यंन्तच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या शैक्षणिक धोरणांवर देश पातळीवर चर्चा होत असतांना चौथी पर्यंन्तच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार स्वागतार्ह म्हणावा लागेल काय?

या आठवड्यात दोन मंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रासंदर्भात दोन निर्णय घोषित केले. त्यावर कुठेही चर्चा होतांना दिसत नाही. या घोषणांवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया यायला हव्या होत्या, लेख लिहिले जायला हवे होते परंतू तसे घडले नाही. याचे आश्चर्य वाटते. शिंदे मंत्रीमंडळातील अतंत्य संयमी समजले जाणारे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी चौथी पर्यंन्तच्या विद्यार्थांची गृहपाठातून सुटका करण्याचा निर्णय घोषित केला आहे. शिक्षणतज्ञ व मानसिक आरोग्य तज्ञांशी चर्चा करून यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेचे शैक्षणिक विश्लेषक म्हणून अनेकांनी स्वागत केले आहे.

जी मंडळी आज साठीत आहेत त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आठवून पहावे आपल्या पाठीवर असलेल्या दप्तर कम पिशवीत केवळ पाटी आणि उजळीणचे पुस्तक असायचे. इयत्ता चौर्थीच्या वर्गात बालभारतीचे पुस्तक आणि दुरेघी वही असायची. उजळणी, बाराखडी आणि पाढे पाठ असणे इयत्ता 1 ते चार पर्यंन्त शिक्षणाचे उद्दीष्ट असायचे. एखादी कविता पाठ करून आणा किंवा पाढा पाठ करून आणायचा अशा प्रकारचा गृहपाठ त्याकाळी दिला जायचा. परंतू आठ दहा विषयांचे आठ दहा गृहपाठ करून आणायचा प्रकार त्याकाळी नव्हता. शिवाय गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षकांची भिती देखील नव्हती. त्यामुळे शाळा संपली की खेळण्यावर मुलांचा भर असायचा. परंतू अभ्यास आणि गृहपाठ यांची मानसिक भिती नसायची.

1 ते 4 चे विद्यार्थी म्हणजे 10 वर्षाच्या आतील विद्यार्थी असतात. या वयात ‘च्यापेक्षा’ जास्त शारिरीक, मानसिक, बौद्धीक जबाबदारी लहान मुलांवर असू नये परंतू 2॥ ते 3 वय वर्ष असतांना प्लेग्रूपमध्ये अ‍ॅडमिशन घेण्याची घाई गतिमान युगातील ‘अधिर’ पालकांना झालेली दिसते. बाळ सहा वर्षाचे होते तो पर्यंत त्याचे प्ले ग्रूपमध्ये दोन वर्षाचे शिक्षण झालेले असते. यात लहान मुले जी पोपटपंची करतात त्यावर आई-वडील जाम खुश होतात. आणि आपले अपत्य किती हुषार आहे या आनंदात झोपी जातात. परंतू लहान मुलांचा सर्वांगिण विकास थांबवून आम्ही त्यांना शिक्षण देतो आहे, त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या मनावर, शरीरावर होतो आहे. याचे भान पालकांना नसते. खुप खेळणे, चारवेळा जेवण करणे आणि खुप झोपण्याचे वयात प्लेग्रूप सोबत पून्हा ट्युशन लावण्याची बुद्धीमानी पालक मंडळी जेंव्हा करतता तेव्हा त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. मुलांचा शारिरीक, मानसिक विकास, मेंदूचा विकास झालेला नसतांना त्यांचेवर अभ्यासाचे ओझे टाकून त्यांचे बालपण हिरावण्याचे काम आजचे पालक करीत आहेत. जे पूर्णतः चुकीचे आहे. परंतू अशीच पद्धत सुरू झाल्याने त्यावर गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता कुणाला वाटत नाही.

दुसरा निर्णय राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आहे. इयत्ता पाचवी ते 12 वी पर्यंन्तच्या शिक्षणात कृषी हा विषय समाविष्ठ करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. अर्थात कृषी पदविका, कृषी प्रमाणपत्र, कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम स्वतंत्रपणे कृषी महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. असे असतांना पून्हा पाचवी पासूनच्या अभ्यासक्रमात कृषी हा विषय कशासाठी ? असा प्रश्न कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला पडू शकतो. परंतू पाचवी पासून कृषी क्षेत्राचा एक विषय असल्यास विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. उलट आपल्या देशातील अर्थव्यवस्था ज्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे त्या कृषी क्षेत्राचा एक विषय अभ्यासक्रमात असणे चुकीचे ठरणार नाही.

या देशाचे भविष्य येणार्‍या काळात कृषी क्षेत्रावरच अवलंबून असणार आहे, हे नाकारून चालणार नाही. अतिशय आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे तंत्र इयत्ता पाचवी पासून विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास या देशात पुढील काळात आत्महत्या करणारा शेतकरी निर्माण होणार नाही. आत्मविश्वासाने शेती करणारा आधुनिक शेतकरी तयार होईल यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे या विषयावर देखील सरकारने योग्य तो अभ्यासकम तयार करून लागू करण्याची आवश्यकता आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतलेले शिक्षण क्षेत्राशी निगडत विषय हे चिंतनिय आणि अभिनंदनीय आहेत. यावर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker