काड्यांच्या सहाय्याने चित्र काढून स्वतः ची कला विकसित करणारा अवलिया चित्रकार; त्रिंबक पोखरकर
Artist who develops drawing by small sticks; Trimbak Pokharkar
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220905_151438-1.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220905_151438-1.jpg)
५ सप्टेंबर ; शिक्षकदिन विशेष…
गव्हाच्या काड्यांना हलक्या ज्वालेवर भाजून त्यापासून चित्र बनवण्याची कला स्वतः अवगत करुन त्या काड्याच्या चित्रावरच आपली कला विकसीत करणारे प्रख्यात चित्रकार त्रिंबक पोखरकर हे जिल्हा परिषद शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
चित्रकार त्रिंबक पोखरकर यांनी आपला जीवन प्रवास उलगडतांना दहावी नंतर चित्रकलेचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर १९७६ मध्ये आपण अंबाजोगाई येथील जिल्हा परीषदेच्या कन्या शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून नौकरी मिळवली आणि याच शाळेत वयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत सेवा बजावली आहे सांगत आपला चित्रकलेतील प्रवास सांगण्यास सुरुवात केली.
चित्रकला शिक्षक म्हणून काम करीत असतांना आपण वाँटर कलर, आँइलपेंट, विविध धान्य, फुलांपासून आणि पानांपासून, केळीच्या पानापासून चित्र बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र या चित्रांना फार आयुष्य नाही हे लक्षात आल्यावर नवीन पध्दतीने चित्र बनवण्याचा माझा प्रवास सुरु झाला. हा प्रवास सुरु असतांनाच मला गव्हाच्या आणि तांदळाच्या काड्या हाती लागल्या आणि त्यापासून चित्र बनवण्याचा माझा प्रवास सुरु झाला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220905_151506-1.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220905_151506-1.jpg)
सुरुवातीला या काड्यापासून एकाच रंगात बनत चाललेल्या चित्रांनी माझे समाधान होत नसल्यामुळे मी या काड्यापासून बनवण्यात आलेल्या चित्रात रंग भरण्याचा शोध करीत असतानाच मला घरातील चुली समोर अर्धवट जळालेल्या या काड्यात विविध रंग सापडले आणि मी या काड्यांना हलकेच भाजून विविध रंग तयार करुन काड्यापासून रंगीत चित्र बनवण्यास सुरुवात केली.
या प्रयोगात मी सर्वप्रथम या विभागातील लोकनेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे चित्र काढले आणि ते परळी येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात व्यासपीठासमोरील दर्शनी भागात ठेवले. हे चित्र या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. मा. मिरासदार यांच्या दृष्टीस पडले आणि त्यांनी गोपीनाथरावांकडे हे चित्र काढणा-या चित्रकाराची भेट घालून द्दा असा आग्रह धरला. यावेळी राज्यभरातुन आलेल्या अनेक साहित्यिकांनी मी काढलेल्या या चित्राची प्रशंसा केली. आणि अशी व्यक्ती चित्र काढण्याचा माझा प्रवास सुरु झाला.
या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, गोपीनाथराव मुंडे, मनोहर जोशी, मिल्खा सिंह, नाना पाटेकर, यांच्या सह अनेक मान्यवरांची चित्रे काढली. अनेकांनी माझ्याकडून चित्रे काढून घेतली आणि मी काड्याच्या चित्रावर माडी बांधली.
आपल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत चित्रकला उपजतच पाहिजे फक्त ती विकसित करण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे सांगत आपली कला विकसित करण्यासाठी अंबाजोगाई शहरातील व शहरालगत असलेल्या खोलेश्वर, आम्लेश्वर, बाराखांबी, हत्तीखाना या मंदिरातील आणि धर्मापुरी किल्ल्यातील आकर्षण शिल्पांचा मोठा वाटा असल्याचे ही चित्रकार त्रिंबक पोखरकर यांनी सांगितले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220905_151523-1.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220905_151523-1.jpg)
काढल्याच्या सहाय्याने चित्र काढुनी आपली चित्रकला विकसीत करणारा हा ध्येयवेड्या कलाकाराने आपली साधी राहणी, उच्च विचार जोपासत आपल्या स्वत:च्या नावासोबतच अंबाजोगाई शहराचे नांव उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.