शैक्षणिक अनुशेष दूर करण्यासाठी सरस्वती गणेश मंडळाने पुढाकार घ्यावा
Saraswati Ganesh Mandal should take the initiative to remove the educational backlog
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220904_192216.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/09/IMG_20220904_192216.jpg)
ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांचे आवाहन
सरस्वती गणेश मंडळाने गुरुवार पेठ विभागातील शैक्षणिक अनुशेष दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात बोलतांना केले. या शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले तर १०० जणांची रक्त तपासणी करण्यात आली.
गेली अनेक वर्षांची परंपरा असलेल्या अंबाजोगाई येथील गुरुवारपेठ विभागातील सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात सुदर्शन रापतवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, नगरसेवक वाजेद खतीब, अशोक मोदी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कान्हा भाऊ शर्मा, रविंद्र परदेशी, युवा नेते संकेत मोदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विस्ताराने बोलतांना सुदर्शन रापतवार पुढे म्हणाले की, सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याची पारंपरिक पद्धत आहे आता काळाच्या ओघात या पध्दतीत बदल करुन या प्रभागातील शैक्षणिक अनुशेष दुर करण्यासाठी जाणीवपूर्वक उपाय योजना आखून, प्रत्येक घराचा शैक्षणिक सर्व्हे करुन शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना परत शैक्षणिक प्रवाहात आणून शिक्षणसंपन्न प्रभाग बनवण्यासाठी या क्षेत्रात कनस्ट्रक्टीव्ह काम करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सरस्वती गणेश मंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंत या मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सरस्वती गणेश मंडळाच्या माध्यमातून यापुढेही सामाजिक उपक्रम राबवून जातीय सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करुन या प्रभागाच्या विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात युवानेते संकेत मोदी यांनी सरस्वती गणेश मंडळाच्या माध्यमातून या मंडळाची सामाजिक उपक्रम राबवण्याची व जातीय सलोखा अबाधित राहण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले.
या रक्तदान शिबीराचा समारोप करताना आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी सरस्वती गणेश मंडळाच्या माध्यमातून या विभागातील सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते त्याबद्दल कौतुक करुन सर्व पदाधिकारी व मंडळाच्या सदस्यांचे कौतुक केले. या मंडळाच्या सर्व सामाजिक उपक्रमांना आपला सतत पाठिंबा राहील असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मुथा यांनी केले तर आभार रचना परदेशी यांनी मानले.
सरस्वती गणेश मंडळाच्या या रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी कुलदीप परदेशी, जुनेद सिद्दिकी, अक्षय परदेशी, समीर लाटा, लग्न परदेशी, संतोष परदेशी,संजय अपुर्वा, शेख मुख्तार, निलेश मुथा यांच्या सह गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.