राष्ट्रीय

गुलाम नबी आझाद यांची कॉंग्रेस ला सोडचिठ्ठी; नवा पक्ष स्थापन करणार!

काँग्रेस पक्षाचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण या सर्व चर्चांना गुलाम नबी आझाद यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे. आपण जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचं आझाद यांनी जाहीर केलं आहे. याबाबतचं वृत इंडिया टुडेनं दिलं आहे. याबाबत अधिक माहिती देताना आझाद यांनी सांगितलं की, “मी जम्मू-काश्मीरला जाणार आहे. मी राज्यात माझा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. त्यानंतर संबंधित पक्ष राष्ट्रीय स्तरावर आणण्याबाबत चाचपणी करू.” आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. अलीकडच्या काही महिन्यांत अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे हा काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला असून, प्राथमिक सदस्यत्वही सोडलं आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली नाराजी जाहीर केली. या पत्रात त्यांनी राहुल गांधींवरील आपली नाराजी बोलून दाखवली असून, काही गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींमध्ये अपरिपक्वता असून त्यांना पक्षातील सल्लागार यंत्रणा उद्धवस्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जाणून घ्या गुलाम नबी आझाद यांच्या पत्रातील सहा महत्त्वाचे मुद्दे –


१) राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर दुर्दैवाने, याआधी अस्तित्वात असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली.
२) पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचं कामकाज चालवू लागले.
३) राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे त्यांच्या अपरिपक्वतेचं उदाहरण होतं.
४) राहुल गांधींच्या या बालिश वर्तवणुकीने पंतप्रधान आणि केंद्र सरकारचे सर्व अधिकार झुगारले. २०१४ मध्ये झालेल्या युपीए सरकारच्या पराभवात या कृतीचा सर्वात मोठा वाटा होता.
५) २०१४ मध्ये तुमच्या आणि खासकरुन राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचा अत्यंत अपमानास्पदरित्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. २०१४ ते २०२२ दरम्यान झालेल्या ४९ पैकी ३९ विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाला. पक्षाने फक्त चार विधानसभा निवडणुका जिंकल्या असून, सहा ठिकाणी युतीमध्ये होतो. दुर्दैवाने, आज काँग्रेस आज फक्त दोन राज्यांमध्ये सत्तेत असून, इतर दोन राज्यांमध्ये युतीमधील अत्यंत किरकोळ भागीदार आहे.
६) कार्यसमितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी संतापाच्या भरात पायउतार होताना आणि पक्षासाठी आपल्या आयुष्य समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केल्यानंतर तुम्ही हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. हे पद गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही कायम राखलं आहे. सर्वात वाईट म्हणजे, युपीए सरकारची संस्थात्मक अखंडता नष्ट कऱण्यासाठी कारणीभूत ठरलेलं ‘रिमोट कंट्रोल मॉडेल’ आता काँग्रेसमध्ये अवलंबलं जात आहे. तुम्ही केवळ नाममात्र व्यक्ती असताना सर्व महत्त्वाचे निर्णय राहुल गांधी किंवा त्याहून वाईट म्हणजे त्यांचे सुरक्षा रक्षक आणि खासगी सहाय्यक घेत होते.

कॉंग्रेसची प्रतिक्रिया


गुलाम नबी आझाद यांच्या पत्राची वेळ आणि त्यातील निष्कर्ष चुकीचा आहे, अशी प्रतिक्रिया आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे. ७३ वर्षीय गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देताना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी भाजपाविरोधात काँग्रेस देशव्यापी संघटन करण्याच्या तयारीत असताना पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने राजीनामा देणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे रमेश यांनी म्हटले आहे.


आत्मपरीक्षणाची गरज!


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आझाद यांनी पक्ष सोडणं दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करावं, असं म्हणत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसचा अध्यक्ष कळसूत्री बाहुली नसावा. या पदावरील व्यक्ती सर्वमान्य असावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना काँग्रेस अध्यक्षांवर चव्हाण यांनी अप्रत्यक्ष निशाणा देखील साधला आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker