

अंबाजोगाई, (प्रतिनिधी) दोन्ही डोळ्यांनी अंध असतानाही नवनाथ कांबळे रस्त्यावर फिरत सारंगी वादनाची कला सादर करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. अशा या कुटूंबाला जागा होती. परंतू पक्के घर नव्हते, मानवलोकसह इतर दानशूरांनी त्याच्या कुटुंबास घर बांधून देण्याचा निर्धार केला व तो पुर्णतत्वास नेला. पंधरा ऑगष्ट रोजी नव्या घरात कांबळे कुटूबांचा मान्यवरांच्या उपस्थित गृहप्रवेश होणार आहे.
काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष भूमीपूजन करून बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता.यावेळी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, डॉ. निलेश लोमटे, डॉ. रमेश लोमटे, डॉ. अमोल चव्हाण, युवा कार्यकर्ते मनोज कदम, भीमसेन लोमटे, अभिषेक दसगावकर, जनसहयोगचे श्याम सरवदे यांची उपस्थिती होती.


नवनाथ दगडु कांबळे व त्यांची पत्नी अविदा नवनाथ कांबळे हे दोघेही दिव्यांग आहेत. त्यांना दोन मुले आहेत. येथील साठे नगर भागात त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. हे दाम्पत्य अंध असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. तो नवनाथच्या कलेमुळे सुटला होता. नवनाथ कांबळे हे दररोज गावात रस्त्यावर फिरून आपली कला सादर करतात, काही वेळा चालून थकल्यावर रस्त्याच्या कडेला बसूनच सारंगी वादन करून आपली कला सादर करतात. यातून जे मिळेल त्यावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भगवितात, मानवलोक जनसहयोग मार्फत त्यांच्या कुटुंबाला दरमहा किराणाचे साहित्य पुरविले जाते. अनेकांनी त्याची कला व परिस्थिती पाहुन त्याला हातभार लावलेला आहे. त्याचे पोट भरत असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या डोक्यावर पक्के छत नव्हते. त्यासाठी नगर पालिकेकडे अर्ज केले, परंतू योजना मंजूर होण्यास जागा भोगवट्यात असल्याची अडचण होती. त्यामुळे मानवलोकसह काही दानशूरांनी लोकसहभागातून त्याचे घरकुल उभारण्याचे ठरविले. त्याचा मुहूर्त रविवारी येथे झाला.


या बांधकामास काही रक्कम कमी पडत असल्याचे अभिषेक दसगावकर यांनी सांगितले. लगेचच डॉ. निलेश व रमेश लोमटे, मनोज कदम व भीमसेन लोमटे, डॉ. अमोल चव्हाण यांनी आपला लोकसहभागाचा वाटा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे हा संकल्प पूर्णत्वाकडे जावून नवनाथला पक्के घर उपलब्ध झाले आहे. आपले हात नवनिर्माणासाठी आहेत, त्यामुळे अडचणीत असलेल्यांना आधार देण्यासाठी मानवलोक तत्पर असल्याचे अनिकेत लोहियांनी सांगितले. आपल्या सगळ्यांच्या हाताने माझे घर झाले आहे,याचा आनंद मला शब्दात बांधता येत नाही. अशा भावना नवनाथ कांबळे यांनी व्यक्त केल्या.