महाराष्ट्र

टीईटी घोटाळ्यातील मुलींच्या समावेशामुळे मंत्रीमंडळातील यादीतून अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट?

गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यात दोन मुलींच्या नावाच्या समावेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी प्रकरणातील सेनापती माजी राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांचा एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील समावेशाचा पत्ता कट झाला असल्याची चर्चा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्यानंतर होवू लागली आहे.


शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. ईडीकडून देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आरोग्य सेवक भरती प्रकरणचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू असतानाच दुसरीकडे टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.

परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल ७ हजार ८७४ विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेकडून गैरव्यवहार प्रकरणात विद्यार्थ्यांच्या नावाची जी यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत ‘सामना’ या वृत्तपत्राने सविस्तर बातमी ही प्रसिद्ध केली आहे. तर समाज माध्यमांवर ही या संदर्भात चर्चा सुरु आहे. या प्रकरणात हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या परीक्षार्थींची प्रमाणपत्र रद्द केलेल्यांची यादीत नावे आहेत.  यासर्व प्रकरणानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्राधान्य क्रमाने घेतले जाणारे माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे नांव एकदम मागे पडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्याचे मंत्रीच असतील असे जाहीर करण्यात आल्यामुळे आणि उद्या ९ ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे समर्थक मंत्रांच्या संभाव्य नावाची प्रसिद्ध झालेल्या यादीतून अब्दुल सत्तार यांचे नांव अचानक गायब झाले असल्यामुळे अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चेवर शिक्का मोर्तब झाल्याचे निश्चित समजले जात आहे.

 

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker