शिवसेनेचे धनुष्यबाण पेलण्यासाठी “तेजस” अस्त्रांचा वापर?


शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) वाचवण्यासाठी तहानभूक विसरून राज्यभर दौरे करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व प्रयत्नात आता तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा दोन दिवसांपासून होते आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण पेलण्यासाठी तेजस अस्त्रांचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशातच राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावे’ अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली आहे. युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातही आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आजवर जंगलात, दऱ्या खोऱ्यांमध्ये रमणारे तेजस ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकणार का?
हे पाहावं लागणार आहे.
ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणावरील चर्चा अपूर्ण राहणारी आहे. गेल्या 5 दशकांपासून ठाकरे कुटुंबाचा राज्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग आहे. गेली अनेक वर्षांपासून हे कुटुंब राजकारणाशी जोडले गेले आहे.
ठाकरे आणि पवार या दोन घरांची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच दशकांपासून सातत्याने होत आहे. गेली अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणाला या कुटुंबांकडून नवे चेहरे मिळत आले आहेत. आता तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत मिळत आहेत. तेजस हा शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे.
तेजस ठाकरे हे रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र आहेत. तेजस आजपर्यंत राजकारणापासून दूर राहिला आहे. त्याची आवड वन्यजीव छायाचित्रण आणि संशोधनात आहे. खेकड्यांच्या अकरा प्रजाती आणि सापाची एक प्रजाती शोधण्याचे श्रेय तेजसला जाते. तेजसने सामान्यपणे सार्वजनिक कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. भाऊ आदित्य ठाकरे यांच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यासाठी आदित्य यांच्यासोबत पहिल्यांदा तेजस दिसले होते. तेजस सहसा माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवतात.
शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या एकुणच राजकीय परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शिवसेनेचे वैभव जपण्यासाठी आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या सर्व प्रयत्नांना उभारी देण्यासाठी आजपर्यंत राजकारणापासून शेकडै कोस दुर असलेल्या तेजस यास शिवसेना युवा आघाडीचे नेतृत्व करण्याचा आग्रह युवा शिवसैनिकांनी सोशल माध्यमातून केला आहे. सध्या निर्माण झालेल्या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिवधनुष्य पेलण्यासाठी तेजस यांच्या राजकीय प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.