प्रबोधन

संत नामदेव: विवेकी प्रबोधन परंपरेचे नायक – हभप श्यामसुंदर सोन्नर

Saint Namdev: Hero of the Sage Enlightenment Tradition

महाराष्ट्रामध्ये विवेकी प्रबोधनाचा अखंड जागर वारकरी संतां केला. या वारकरी विचार परंपरेचे नायक म्हणून संत नामदेव महाराज यांच्याकडे पाहिले जाते. विविध जातीतील त्यांचे समकालीन २४ मराठी संत कवी होते आणि ते नामदेवांना आदर्श मानत होते. इतकेच नव्हे तर त्यांचे समकालीन कानडी संत पुरंदरदास आणि हिंदी कवी संत कबीर यांच्यावरही नामदेवांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. वारकरी परंपरेचे कळस म्हणून गौरविलेले तुकाराम महाराज हे तर नामदेव महाराज हे आपल्या अभंग रचनेची प्रेरणा असल्याचे सांगतात. यावरून संत नामदेव हे संत प्रबोधन परंपरेचे नायक आहेत, असे ठामपणे म्हणता येईल. (Saint Namdev: Hero of the Sage Enlightenment Tradition)

संत नामदेव यांनी विवेकी वारकरी प्रबोधनाच्या प्रचारासाठी संपूर्ण भारत भ्रमण केले. तसे संपूर्ण भारताचे भ्रमण करणारे ते पहिले मराठी संत होते. ते संत चरित्रकार आहेत, आत्मचरित्रकार आहेत, पहिले वारकरी कीर्तनकार आहेत अशा विविध भूमिकांमध्ये आपण नामदेव महाराज यांना पाहू शकतो.

जातीभेद आणि कर्मकांडाच्या अंधारात चाचपडणा-या समाजाला नामदेवांनी ज्ञानदीप दिला. त्यावेळच्या व्यवस्थेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवीत असतानाही त्यांच्या भाषेत आक्रोष नव्हता, तर विनम्र शितला होती. हजारो वर्षांच्या जातीभेदाच्या भिंतींना धडका देत असताना त्यांनी कुठेही क्रांतीची भाषा केली नाही. सामाजिक विषमतेच्या आजारावर उपचार करीत असताना त्यांनी वरून मलमपट्टी केली नाही. अंतगरंगात शिरून बदलाची प्रक्रिया सुरू केली. पोटात घेतलेले औषध जसे शरीरावरची जखम बरी करते, तसाच नामदेवांच्या विचाराने समाज आतून बदलत गेला आणि समाजातील उच्च-नीचतेच्या भिंतींना तडे गेले. पंढरीची वारी त्या विचाराचे विराट रूप आहे.

परकीय आक्रमकांनी भारतावर जवळपास कब्जा मिळविलेला होता, त्याच वेळी स्थानिक सर्व समाज मात्र कर्मकांडात अडकला होता. जातीभेद आणि उच्च-नीचतेच्या भोव-यात अडकलेला होता. उच्च वर्णीयांची अरेरावी आणि आक्रमकांची दादागिरी यात समाज भरडला जात होता. तेव्हा समाजाला कर्मकांडाच्या कचाट्यातून सोडवत असतानाच जातीभेदांना गाडून सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे नामदेवांनी केलेले काम ही त्या काळातली क्रांतीच म्हणावी लागेल. परिसा भागवतांसारख्या ब्राह्मणापासून ते समाजातल्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या चोखोबांपर्यंत सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे त्यांनी केलेले काम हे सहज साध्य झाले असेल असे म्हणे केवळ भाबडेपणा ठरेल. त्यासाठी त्यांना घणघोर संघर्ष करावा लागला असेल. त्याच्या पाऊलखुणा नामदेव आणि त्यांच्या समकालिन संतांच्या अभंग रचनेत पहायला मिळतात.

सामाजिक विषमतेचे चटके नामदेवांनाही मोठ्या प्रमाणात बसले असल्याचे त्यांच्या काही रचनांमधून दिसून येते. शिंप्याच्या कुळात जन्म घेतल्यामुळे आपल्याला सामाजिक विषमतेचे चटके सोसावे लागतात ही तक्रार थेट देवाकडेच करताना नामदेव म्हणतात

हिनदिन जात मोरी पंढरीके के राया।  किंवा
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी।
उपमा जातीची देऊ नये ।

त्यांच्या या रचनांवरूनच जातीव्यवस्थेच्या आगीत ते चांगलेच होरपळलेले दिसून येतात. म्हणून समाजातून बहिष्कृत केलेल्या ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई या भावंडांना सोबत घेऊन ही विषमतेची दरी दूर करण्यासाठी नामदेवांनी पुढकार घेऊन वारकरी विवेकी प्रबोधन चळवळ उभी केली. त्यावेळच्या सर्व समाज घटकातील जे जाणते लोक होते त्यांना नामदेवांनी केवळ एकत्र आणले नाही, तर त्यांना व्यक्त होण्यासाठी लिहिते केले. त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरातूनच केली. नामदेवांच्या घरामध्ये एकूण चौदा सदस्य असल्याचा उल्लेख जनाबाईच्या अभंगातून पहायला मिळतो. त्या सर्वांच्या नावाने काहीना काही अभंग आहेत. त्यांच्या घरात दासीचे काम करणा-या जनाबाईचे अभंग तर नामदेवांपेक्षाही अधिक बंडाची भाषा करतात. नामदेवांच्या चरित्राचा धांडोळा घेता त्यांच्या संगतीत एकंदर २४ संत कवी असल्याचे दिसून येते. ज्यात

कांदा मुळा भाजी |
अवघी विठाबाई माझी |
म्हणणारे सावता माळी
वारीक वारीक करू हजामत बारीक ।
म्हणणारे सेना महाराज
मनबुद्धीची कातरी।
रामनामे सोने चोरी।
म्हणणारे नरहरी सोनार
स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास म्हणारी जनाबाई
नको देवराया अंत आता पाहू।
असा टाहो फोडणारी कान्होपात्रा
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा

असे म्हणणारे चोखोबा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अशा समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना एका व्यासपीठावर आणत असतानाच त्यांना लिहिते केले. त्यातही नामदेवांचा सर्वाधिक लळा हा चोखोबांच्या घराण्याशी असल्याचे दिसते. म्हणूनच नामदेवांच्या घरातले जसे सगळे लोक अभंगातून व्यक्त होत होते, तसेच चोखोबांच्या घरातीलही बहुतेकांच्या नावे अभंग रचना आढळून येतात. चोखाबांच्या पत्नी सोयराबाई तर जनाबाई प्रमाणेच बंडखोर असल्याचे दिसून येते. जाती व्यवस्थेत आणि स्री म्हणून मिळणा-या हीन वागणुकीच्या आगीत भाजलेली सोयराबाई मासिक पाळीमध्ये विटाळ पाळण्याच्या प्रथेवर परखड शब्दांत भाष्य करतात. त्या लिहितात

देहासी विटाळ म्हणती सकळ।
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ॥
देहीचा विटाळ देहीच जन्मला ।
सोवळा तो झाला कवण धर्म ॥
विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान ।
कोण देह निर्माण नाही जगी ॥

मासिक पाळी बद्दल तेराव्या शतकातील भाषा केवढी धिटाईची आहे. चोखोबांचा मुलगा कर्ममेळा आपल्याला हीन जातीत जन्माला घातल्याबद्दल देवाची लाज काडतो.

आमुची केली हिन जाती।
तू न कळे श्रीपती ।
जन्म गेला उष्टे खाता ।
लाज नाही तुझ्या चित्ता ।
असा थेट सवाल देवाला करतो.

नामदेवांच्या संगतीत राहिल्यानेच कर्ममेळा यांच्यात हे कटू वास्तव मांडण्याचे धाडस आले असावे. अर्थात हे सर्व करीत असताना नामदेवांना त्या वेळच्या समाजधुरीणांकडून खूप त्रास सहन करावा लागणार असणार. नामदेवाने केलेली अभंग रचना आणि किर्तन परंपरा केवळ आध्यात्मिक उपचार नव्हता तर त्यामागे प्रचंड दूरदृष्टी होते. सामाजिक समतेची आस होती असे दिसते. मंगळवेढा येथे वेठबिगारी करताना भिंत कोसळून चोखोबांचा मृत्यू झाला तेव्हा नामदेवांनी त्यांचे प्रेत शोधून काढून त्यांची समाधी थेट पांडुरंगाच्या दारात बांधली. चोखाबांची समाधी पांडुरंगाच्या महाद्वारात बांधणे या घटनेकडे केवळ धार्मिक उपचार म्हणून पाहाता येणार नाही. चोखोबांची पांडुरंगावर श्रद्धा होती म्हणून नव्हे, किंवा नामदेवांचे चोखोबांवर प्रेम होते म्हणून ही समाधानी तिथे बांधली, असे म्हणता येणार नाही. तर त्यामागे सामाजिक बदलाची प्रक्रिया सुरू व्हावी, असा उद्देश दिसतो. समाजातील सर्वात तळाच्या माणसाच्या चरणावर लीन झाल्याशिवाय ब्रह्मांडांचा धनी असणा-या पांडुरंगाचे दर्शन होणारनाही, ही विचार धारा त्यांना बळकट करायची असावी. चोखोबांची समाधी तिथे बांधताना त्यावेळच्या लोकांनी कोणताच विरोध केला नसेल, असे म्हणता येणार नाही. परंतु तो सर्व विरोध मोडून काढून नामदेवांनी वेगळा संदेश देण्याचा केलेला प्रयत्न कोणत्याही क्रांतीपेक्षा कमी ठरत नाही.

महाराष्ट्रातील समाज सुधारणांचा हा विचार भारतात सर्वत्र जावा याच भावनेतून त्यांनी भारत भ्रमण केले. त्यात उत्तर भारतात त्यांना अनेक अनुयायी मिळाले. ते सर्वाधिक काळ पंजाबमध्ये रमले. त्यांनी पंजाबी शिकली. त्यांनी हिंदी आणि पंजाबी भाषेतही अभंग रचना केली. गुरुनानकांनी शिख धर्माची स्थापना करून पुढील शिष्यांसाठी कोणत्याही माणसाला गुरु करण्यापेक्षा ग्रंथालाच गुरू करा, असा संदेश दिला. त्या गुरुग्रंथसाहेबमध्ये नामदेवांचे 61 अभंग समाविष्ट केलेले आहेत. यावरून नामदेवांच्या कार्याचा आवाका आपल्या लक्षात येतो.
कोणत्याही क्रांतीचा घोष न करता, आक्रस्ताळेपणा न करता संत नामदेवाने जो समतेचा विचार रुजविला तो त्यांच्या नंतर सुधारणावादी संत एकनाथ यांनी पुढे नेला आणि त्याला खरी झळाळी जर कोणी दिली असेल तरी संत तुकाराम महाराजांनी दिली. नामदेवांनी साडेसातशे वर्षांपूर्वी जी समतेच्या विचाराची पेरणी केली त्याचे विराट रूप आता पंढरीच्या वारीच्या रूपाने पहायला मिळते.

नामदेवांनी सुरू केलेली ही विवेकी प्रबोधनाची परंपरा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात भक्कमपणे सुरू आहे. सध्या तिला भ्रष्ट करण्याचा उद्योग काही छुप्या व्यवस्थांकडून होत आहे. त रोखला पाहिजे. कारण आज महाष्ट्राच्या जवळपास प्रत्येक गावात हरीनाम सप्ताह सुरू आहेत. त्यात जर या परंपरेला भ्रष्ट करणारे घुसखोर रोखले नाहीत तर फार मोठी सामाजिक हानी होईल.

shyamsundar sonar maharaj
shyamsundar sonar maharaj

या सप्ताहाच्या माध्यमातून नामदेवांसह सर्व संतांनी दिलेला विवेकी प्रबोधनाचा वारसा पुढे गेला पाहिजे. त्यावर जाणत्या लोकांची नजर असली पाहिजे. त्यासाठी विवेकी निर्भेळ संत परंपरा पुढे नेणा-या कीर्तनकारांचे संघटन उभे राहणे गरजेचे आहे. त्या दृष्टीनेभविष्यात प्रयत्न व्हायला हवेत. तसे झाले तर ही विवेकी प्रबोधनाची परंपरा अधिक भक्कम होईल.

ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker