बांबू लागवड करून पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक उन्नती साधा पाशा पटेल
बांबू लागवड विक्री व तंत्रज्ञान कार्यशाळेचे देवळा व अंबाजोगाई येथे आयोजन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)/ बांबू लागवड करुन पर्यावरण संवर्धनासोबतच आर्थिक उन्नती साधा असे आवाहन कृषी मुल्य आयोगाचे सदस्य माजी आमदार पाशा पटेल यांनी अंबाजोगाई व देवळा येथे आयोजित करण्यात आलेल्या बांबू लागवड, विक्री व तंत्रज्ञान कार्यशाळेत बोलतांना केले.
या कार्यशाळेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात पाशा पटेल पुढे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण धोकादायक झाले आहे. यामुळे भावी पिढीला शुद्ध हवा तसेच यातून उत्पादन मिळविण्यासाठी बांबू लावगड करणे आवश्यक बनले आहे. वृक्षतोडीमुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोचले आहे. आगामी काळात पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल, यासाठी ऑक्सिजन भरपूर उपलब्ध होऊन कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या बांबू लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे. बांबू लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू हे एक महत्त्वाचे घटक आहे. बांबूची शेती, लागवड कशी करावी, बांबू प्रजातीचे जीवनचक्र ४० ते १०० वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटामध्ये दरवर्षी ८ ते १० नवीन बांबू तयार होत असतात. बांबूपासून अनेक वस्तू बनविण्यात येत आहेत. तसेच इथेनॉल, सीएनजी बनविण्यात येणार आहे. यामुळे बांबूला दरही मिळेल, असे ते म्हणाले.
उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत बांबू लागवड घटकसाठी असलेल्या अनुदानाची माहिती देऊन बांधावर जर शंभर बांबूच्या झाडांची लागवड केली तर चौथ्या वर्षापासून दरवर्षी पन्नास हजार रुपये मिळू शकतात तसेच एक एकर वर बांबू झाडांच्या सलग लागवडीपासून दोन लाख रुपये एकरी मिळू शकतात असे सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी जिल्हाधिकारी परिसरात लागवड केलेल्या मियावाकी उपक्रमाची माहिती देऊन प्रतिकूल हवामानामध्ये अनुकूल शेती करण्याच्या दृष्टीने व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांबू लागवड करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
पोकरा प्रकल्पाचे मनुष्यबळ विशेषज्ञ जयशिव जगधने यांनी पोकरा डीबीटी ऍप्लीकेशनची माहिती देऊन बांबू लागवड अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत देवळावासीयांनी देवळा गावाच्या जवळून जाणाऱ्या मांजरा व होलणा नदी काठावर शेजारील सर्व तीन किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात बांबू लागवड करण्याचे ठरवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र देवरवाडे तर प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर आणि आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी आर डी बर्वे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामीण किसान शेतकरी गट सारसा व देवळा श्रमकरी गट, देवळाचे सदस्य बाबासाहेब यशवंत, अशोकराव खामकर, दीपक देशमुख, योगेश निळकंठ, जयदेव देशमुख, फुलचंद देशमुख, संदीपान साळुंके, श्रीकृष्ण शितोळे, विनोद शेळके, प्रकाश देवरवाडे, श्रीकृष्ण पवार, गणेश जाधव, श्रीकृष्ण गवळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अंबाजोगाई येथे कार्यशाळा
अंबाजोगाई येथे बांबू लागवडी संदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा आज दिनांक २५ जुलै रोजी मुकुंदराज सभागृह येथे पार पडली. कार्यशाळेला पाशा पटेल यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी श्रीमती मंजुषा मिसकर अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांनी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तसेच जिल्ह्यातील नदीकाठच्या गावाचे मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व तलाठी यांना उपस्थित राहणे बाबत सुचित केले होते.
सदर कार्यशाळेस उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना पाशा पटेल, सदस्य, कृषि मूल्य आयोग यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, जिल्ह्यातील वनक्षेत्राचा टक्का वाढविण्याबाबत बांबू लागवड करून आपण सर्वांनी वृक्ष लागवडीचे जिल्ह्याचा इश्टांक पूर्ण करावे असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना सामाजिक वनीकरण, कृषी विभाग व नरेगा अंतर्गत लाभ घेता येऊ शकतो, बांबूचे रोप वनीकरण विभागाकडे उपलब्ध आहेत.तसेच पाशा पटेल यांच्या लोदगा येथील संस्थेकडे देखील उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. बांबूचे जगात असणारे महत्त्व, त्यापासून १८०० प्रकारच्या तयार करण्यात येणाऱ्या वस्तू, पर्यावरणाच्या दृष्टीने बांबूचे अनन्य साधारण महत्व व महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभाग यांनी एकत्रित येऊन सर्व सामाजिक संस्था ,लोक सहभाग व शासनाच्या विविध योजना अंतर्गत बांबूची लागवड करणे किती महत्त्वाचे आहे व काळाची गरज असल्याची बाब सर्वांना पटवून सांगितली.
या प्रसंगी नदीकाठच्या गावामध्ये तसेच पोखरा अंतर्गत गावात बांबू रोपण करण्याचे तसेच शाळा महाविद्यालयाची विद्यार्थी, वृक्ष प्रेमी व स्वयंसेवी संस्था यांनी मोहीम स्वरूपात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिसकर यांनी केले.
या कार्यशाळेत उपविभागीय अधिकारी शरद झाडके, नीलम बाफना, नामदेव टिळेकर, श्रीराम भेंडे, तहसीलदार, विपीन पाटील, मनीषा मनाळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार उपस्थित होते. तसेच नायब तहसिलदार गणेश सरोदे, मंडळ अधिकारी गोविंद जाधव व इतर कर्मचारी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद टाकळकर यांनी केले