मराठवाड्यात संमिश्र पावूस; नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात शेतीचे नुकसान
बीड,लातुर, उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या पावसाची गरज


संपुर्ण मराठवाड्यात समाधान कारक पाऊस पडला असला तरी अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या पैठण येथील नाथसागर, नांदेड येथील विष्णुपुरी आणि पैनगंगा धरण भरली असली तरी बीड, लातुर, उस्मानाबाद जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा अजूनही ४० टक्क्यांपेक्षा कमीच आहे. मराठवाड्यात एकुण ११ मोठी धरणे असून त्यापैकी मांजरा, सिनाकाळेगाव, माजलगाव आणि सिध्देश्वर धरणे ४० टक्के पाणी साठ्याच्या खालीच आहेत.
मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण पैठण येथील नाथसागर असून या धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाला नसला तरी नाशिक येथील मध्यमेश्वर धरणातील पाण्याचा मोठा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला असल्यामुळे हे धरण भरण्याच्या प्रतिक्षेत आहे. नांदेड, हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पाऊस जास्त झाला असल्यामुळे विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडावे लागले आहेत. तर या दोन्ही जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील छोट्या-मोठ्या प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विभागातील प्रमुख ११ मोठ्या धरणातील पाणीसाठा ६५ टक्क्यांवर पोहचला आहे. तर देशातील सर्वात मोठं मातीच धरण असलेल्या जायकवाडी धरण भरण्याच्या अंतीम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे यावर्षी पिकांना समाधानकारक पाऊस पडला असला तरी बीड, लातुर, उस्मानाबाद जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
मराठवाड्यातील प्रमुख ११ धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी पहाता आज सर्वाधिक पाणीसाठी पैठण येथील जायकवाडी धरणात आहे. नाशिक येथील मध्यमेश्वर धरणातील विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले असल्यामुळे यि विभागात समाधानकारक पाऊस झालेला नसतांनाही हे धरण भरण्यासाठीच्या अंतीम टप्प्यात पोहोचले आहे. त्या पाठोपाठ मनात धरण हे १०० टक्के क्षमतेने भरले आहे. त्या पाठोपाठ नांदेड येथील विष्णुपुरी धरण ही पुर्ण क्षमतेने भरले आहे. पैनगंगा धरण हे ७२.५० टक्के भरले आहे तर निम्न दुधना प्रकल्पात ६७.८८ टक्के तर येलदरी धरणात ६१.६७ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. सिध्देश्वर, माजलगाव आणि मांजरा धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. सिध्देश्वर धरणात सध्या ३४.८८ टक्के, माजलगाव धरणात ३८.६५ टक्के तर मांजरा धरणात फक्त ३३.२० टक्के पाणी साठा जमा झाला आहे. सर्वात कमी पाणीसाठा सिनाकाळेगाव धरणात आहे. या धरणात फक्त १९.१९ टक्के पाणी साठा जमा झाला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा १०० टक्के पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा पाणीसाठा फक्त ३५.४८ टक्क्यांवर होता.
गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. विभागातील जवळपास ३ लाख ३८ हजार ८८ हेक्टरचे नुकसान झाले असून, याचा ३ लाख ५१ हजार ४९९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरु केली आहेत.
‘या’ जिल्ह्यात नुकसान
मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाला असून, ३ लाख ३० हजार ३५७ शेतकऱ्यांचे अंदाजे ३ लाख २० हजार ८७९ हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर २६१ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. हिंगोली जिल्ह्यात १९ हजार १९७ शेतकऱ्यांचे १५ हजार ९४४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यात १५०० शेतकऱ्यांचे १२०० हेक्टर नुकसान झाले. जालना जिल्ह्यात ३७७ शेतकऱ्यांचे ५० हेक्टरचे नुकसान झाले असून, २०५ हेक्टर खरडून गेली आहेत.