

बीड जिल्ह्यातील केज ते कळंब रस्त्यावरील मांजरा नदीचा नवीन पूल होईपर्यंत जुण्या पूलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता व पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी आ नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील केज ते कळंब रस्त्यावर मांजरा नदीचा जुना पूल आहे. सदर ठिकाणी नवीन पुलाचे काम जवळपास मागील तीन ते चार वर्षापासून सुरु आहे. परंतु अद्यापही सदर नवीन पुलाचे व पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्त्याचे काम झालेले नाही. त्याठिकाणी असलेल्या जुण्या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मुलाचे कडेही तुटले आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असून सदर जुना पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे नवीन पुलाचे काम होऊपर्यंत जुन्या पुलावरील रस्ता व पुलाचे दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. केज ते कळंब हा रस्ता पूर्वी राज्य रस्ता होता त्यानंतर सदर रस्ता हा राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता व्यवस्थित करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असतानाही सदर अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर अधिकारी व संबंधित कंत्राटदार हे दुरुस्ती बाबत दुर्लक्ष करत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे.
तरी बीड जिल्ह्यातील केज ते कळंब रस्त्यावरील मांजरा नदीचा नवीन पूल होऊपर्यंत जुना पूलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता व पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी आ नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.