नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम स्थगित
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ट्रू व्होटर ॲप (TRUE VOTER)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/True-Voter.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/True-Voter.png)
राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम स्थगित झाला असून, सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता लागू राहणार नाही, असे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
संबंधित क्षेत्रातील आचारसंहिता मागे – राधाबिनोद शर्मा
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या दि. 08 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 दिला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र. 19756/2021 ची सुनावणी दि. 12 जुलै 2022 रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी दि. 19 जुलै 2022 रोजी ठेवलेली आहे. या पार्श्वभूमिवर आयोगाचे दि. 8 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 याव्दारे स्थगित करण्यात आला आहे. सदर निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता लागू राहणार नाही, असे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ट्रू व्होटर ॲप (TRUE VOTER)
नगरपरिषद/नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सदर मतदार यादीत आपले नाव शोधणे अधिक सुलभ व्हावे यासाठी या मतदार याद्या ट्रू व्होटर (TRUE VOTER) मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदानाच्या वेळी प्रभागनिहाय मतदार यादीत आपले नाव शोधताना मतदारांची धावपळ किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मतदार यादीत नाव शोधणे सोपे झाल्यास मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होईल. वरील पार्श्वभूमी लक्षात घेता आगामी काळात सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात (TRUE VOTER) मोबाईल ॲपव्दारे प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांमध्ये आपले नाव शोधण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ॲप प्ले स्टोर वरुन आपल्या मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करता येते व त्याचा वापर सुलभरित्या करता येतो.