पांडुरंगाच्या पुजेचा मान बीड जिल्हयाच्या नवले दाम्पत्याला
मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता. गेवराई, जि. बीड येथील मुरली भगवान नवले (५२) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (४७) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/pandharpur.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/pandharpur.png)
पंढरपूर आषाढी एकादशी निमित्ताने पांडुरंगाच्या महापूजेचा मान यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई येथील नवले दाम्पत्याला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार पिढ्यांनी यावेळी महापूजा केली. बळीराजा सुखी अन संपन्न होऊ दे अशी प्रार्थना यावेळी शिंदे यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी, वडील, मुलगा आणि नातू या चार पिढ्यानी आषाढी एकादशीला महापूजा केली. पहाटे 3 वाजून दहा मिनिटांनी शिंदे यांनी पूजा केली. यावेळी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता. गेवराई, जि. बीडकेली. यावेळी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता. गेवराई, जि. बीड येथील मुरली भगवान नवले (५२) आणि सौ. जिजाबाई मुरली नवले (४७) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.गेल्या वीस वर्षांपासून नवले दाम्पत्य पायी वारी करत आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यासमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले.
आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते ‘रिंगण’ या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले.
दरम्यान कोव्हीडच्या संकटामुळे गेली दोन वर्षे आषाढी वारी होऊ शकली नव्हती पण या वर्षी आषाढी वारी पायी झाल्यामुळे वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. संपूर्ण आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांनी रिंगण, पालखी सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. यावर्षी १० लाखांपेक्षा जास्त वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले आहेत. विठुरायाच्या जयघोषात अवघी पंढरपूर नागरी दुमदुमून निघाली आहे.