कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्य महोत्सवाचे नांदेड येथे आयोजन


नांदेड येथील तन्मय ग्रुप आणि लीला आर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, शाखा नांदेड यांच्या सहकार्याने दिनांक 10 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्यप्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे नाट्य शिबिर बारा दिवस घेण्यात येणार आहे.


१५ ते ३५ वयोगटातील युवक युवतीसाठी
हे नाट्यशिबिर 15 ते 35 वयोगटांतील युवक व युवतींसाठी असून ह्या नाट्य शिबिराचे संचालन व समन्वय महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. नाथा चितळे हे करणार आहेत. तसेच त्यांना सहकार्य डॉ माणिक जोशी, डॉ. प्रणव चौसाळकर आणि अमोल काळे हे करणार आहेत. प्रशिक्षण शिबिरात नाटकाच्या तंत्र व मंत्राची माहिती देण्यात येणार असून युवक, युवतींचा आवडता विषय, कॅमेऱ्यांसमोरील अभिनय, तसेच शॉर्ट फिल्म आणि चित्रपट निर्मितीच्या बद्दल माहिती देण्यात येणार आहे. सदरील नाट्यशिबिरात दूरदर्शन व सिने अभिनेत्री नुपुर चितळे तसेच सिने व दूरदर्शन अभिनेते शार्दुल सराफ आणि समीर खांडेकर हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत तसेच ऑडिशन कशा द्याव्यात याविषयी प्रसिद्ध सिने,नाट्यलेखक तसेच कास्टिंग डायरेक्टर युगंधर देशपांडे हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत.


नवोदित नाट्य कलावंतांना व्यावसायीक रंगभुमीशी जोडण्याचा प्रयत्न
या शिबिराच्या माध्यमातून मराठवाड्यातील नवोदित नाट्यकलावंतांना व्यावसायिक आणि सृजनशील रंगभूमीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार असून, त्यांना सशक्त, आधुनिक आणि व्यावसायिक अभिनयाची दिशा देण्याचा मानस आहे. अभिनय क्षेत्रातील नवी व्यावसायिक दारे उघडण्यासाठी हे शिबिर उत्तम संधी ठरणार आहे.


संधी गमावू नका!
नाट्यप्रेमी युवकांनी ही संधी गमावू नये. केवळ अभिनयच नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्ये आणि सर्जनशील अभिव्यक्तीचे नवीन क्षितिज उलगडणारे हे शिबिर एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे. मराठवाड्यातील प्रत्येक कलावंत, रंगकर्मी आणि नाटकवेड्या तरुणांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य महोत्सवाचे समन्वयक डॉ. नाथा चितळे यांनी केले आहे
शिबिराच्या नाव नोंदणीसाठी नीतीश देशपांडे भ्रमणध्वनी 9890914729, श्री नागेश रोकडे 7378917701 अभिजीत बारडकर 9021205754 यांच्याशी संपर्क साधावा असे संयोजकांनी कळविले आहे.