मैं बीज हुं, आदत है मेरी, बार बार उग जाने की! या कवितेच्या ओळी अनुषंगिक वाटत असल्या तरी त्या तंतोतंत लागू पडणाऱ्या आहेत. त्याचं कारण असं आहे की, धनंजय मुंडे हे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न होण्याची ही काही पहिली वेळ नाही! तसं यावेळी जरा अतीच झालं म्हणावं लागेल मात्र अशा प्रकारचे आघात हे या व्यक्तीसाठी काही नवीन नाहीत.
आयुष्यात लढविलेली पहिली जिल्हा परिषद निवडणूक ही त्या सुप्त संघर्षाची सुरुवात होती, सोप्या आणि जवळच्या जागा सोडून त्या काळी म्हणजे २००२ साली बीड जिल्ह्याची गडचिरोली म्हणवल्या जाणाऱ्या पट्टीवडगाव सर्कल मधून लढावे लागले. कदाचित संघर्ष हा यांच्या पाचवीला पुजलेला असावा, त्यामुळे आजवर जे मिळाले त्यातले सहज हाती लागले असे काहीच नाही.
कधी नियतीने तर कधी व्यक्ती द्वेषाने धनंजय मुंडे यांना अनेक हल्ले सहन करून प्रतिहल्ला न करता संयमाने परतवून लावावे लागले; याची शेकड्याने उदाहरणे देता येतील. पण त्या प्रत्येक आघातातून कुणालाही न दुखावता किंवा फारसे डॅमेज न होऊ देता अत्यंत धीरोदात्त पणे लढून धनंजय मुंडे इथपर्यंत पोचले. त्यात सगळ्यात मोठा वाटा प्रभू वैद्यनाथ नगरी अर्थात परळीतील जनतेचा आहे. आजवर परळीची ही माय बाप जनता प्रत्येक वेळी, प्रत्येक संघर्षात धनंजय नावाभोवती एक अभेद्य तटबंदी बनून उभी राहिली आहे.
म्हणूनच नेहमी म्हटले जाते की एखादे नेतृत्व घडायला अनेक दशके लागतात, अनेक प्रकारचा त्याग, बलिदान, उपासना आणि संघर्ष त्यामागे दडलेला असतो. ज्याने या सर्व गोष्टी सहन केल्यात त्याला संपवण्याची सुपारी तितकी सोपी नाही!
लोकसभा निवडणुकीतील धनंजय मुंडे यांचे समर्पण सर्वांनी डोळ्यांनी पाहिले. निसटता पराभव झाला तो स्वीकारून पुन्हा ते कामाला लागले. विधानसभा निवडणुकीत इतर मतदारसंघात ३२ पेक्षा अधिक सभा घेतल्या. इतकेच नाही तर स्वतः उमेदवार असून सुध्दा अगदी मतदानाच्या आदल्या रात्री अगदी पहाटेच्या दोन वाजेपर्यंत आपल्या गेवराई च्या बंधूंच्या प्रचारार्थ बैठका घेत होते. परळीच्या अभेद्य किल्ल्याने धनंजय मुंडे या नावाभोवती महाराष्ट्रातील क्रमांक दोनची लीड उभी केली. त्यादिवशी अनेकांनी बांगड्या फोडल्या… अनेक आरोप केले त्या सर्वांच्या तोंडावर स्वतः निवडणूक आयोगाने क्लीनचीट चिटकवली, तरीही बदनामी सुरूच! पण खवळलेला विरोध आणि संपवायची सुपारी परळी पासून शेकडो किलोमीटर वरती शिजत होती; त्यांना हवी होती फक्त एक संधी!
जिल्ह्यात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या आडून अशी काही संधी साधवून घेतली की…. बापरे! १६५ दिवस एका सर्वसामान्य नेतृत्वाला संपवण्यासाठी मीडिया ट्रायल? देशात कधी आजवर झाली नसेल; किती मोठमोठे आहेर कुणाकुणाला देण्यात आले, याची अनेकांना कल्पना आहे. खाजगीत विरोधक सुध्दा आता ते बोलून दाखवतात. किंबहुना आता सर्वसामान्य जनतेला सुध्दा ते कळून चुकलं आहे.
जातीयवादाचा ठपका ठेवून बदनामी, घोटाळ्यांचे आरोप ध चा म करून बातम्यांची पेरणी तर इतकी की अगदी पिंपळाचे पान गळाले अशी वस्तुस्थिती असताना धनंजय मुंडे यांच्या मुळे पिंपळगाव जळले, अशा बातम्या दाखवून त्यावर डिबेट घडवून आणल्या गेल्या… अगदी, आई, भाऊ, मुली – बाळी यांच्या पर्यंत बदनामी? कशासाठी? उत्तर आहे केवळ सुपारी! या व्यक्तीला राजकारणातून संपवायचे याची सुपारी!
धनंजय मुंडे या माणसाला मुळात कधी जात शिवलेली नाही, महापुरुषांच्या जयंती मध्ये भाषणे करताना ते आवर्जून सांगतात की महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घ्या, त्यांना जातीत वाटून घेऊ नका. इतकेच काय तर राजकारणात संधी देताना सोशल इंजिनिअरिंग साधावी ती धनंजय मुंडे यांनीच! त्याचीही शेकडो उदाहरणे सांगता येतील. पण नाव सांगितले की त्याची जात शोधायची ही पद्धत सध्या सुरू आहे, त्यामुळे नाव टाळलेले बरे. विरोधीपक्षनेते, आमदार, मंत्री अशा विविध पदांवर काम करताना, त्यांच्या सभोवती सर्वाधिक अधिकारी कर्मचारी हे मराठा समाजाचे राहिले आहेत. त्यामुळे जातीचे लेबल लावून त्यांची बदनामी करणे म्हणजे अत्यंत “छोटी सोच” ठरेल.
मीडिया ट्रायल, व्यक्तिगत आरोप, बदनामी हे सगळे इतक्या टोकाला पोचवले गेले की त्यांचा परिणाम स्वतःच्या तब्येतीवर सुध्दा झाला. ज्या माणसाच्या जिभेवर माता सरस्वती वास करते, त्या व्यक्तीला एका आजारामुळे जवळ जवळ तीन महिने बोलता येईना, सतत माणसात राहणे, बोलणे, भाषणे, संवाद अशी आयुष्याची शिदोरी असलेल्या व्यक्तीला तीन महिने बोलता येत नाही, तेव्हा त्यांच्या मनाला त्याच्या किती वेदना होत असतील? पण दुसरीकडे राजीनामा आणि दीर्घकाळ मुंडेंचे मौन याचा अर्थ सुपारी बहाद्दर गँग ने काढला की आता धनंजय मुंडे संपले!
राज्यात स्वकर्तृत्वावर मोठे झालेले व आपल्या पक्षासह मित्रपक्षात देखील तितकेच वजन असणारे धनंजय मुंडे हे नाव गप्प बसणाऱ्या किंवा सहज सर्वकाही मागे सोडून देणाऱ्यापैकी नाही. याची प्रचिती आगामी निवडणुकांच्या काळात येईलच! निष्ठावंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी, बेरजेचे राजकारण, मोकळे व मोठे मन आणि फर्डे वक्तृत्व कौशल्य ही राजकारणात कायमच त्यांची जमेची बाजू राहिलेली आहे. त्यामुळे मुंडे यांचे मौन आता अल्पकालीन आहे, हे स्पष्ट आहे आणि त्याची प्रचिती सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात दिसून आली.
आजवर झालेले घात – आघात सहन करून त्यातून वाट काढत धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा सुपारी देणाऱ्या आणि घेणाऱ्यांचे दात घशात घालून नवी उसळी घेणार आणि पूर्वीपेक्षा अधिक जोमाने, अधिक उत्साहाने राजकारणातील राजहंस बनण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करणार हे निश्चित आहे.
मागील वर्षी एका भाषणात ते म्हणले होते,
” कई लोगों ने कोशिश की, मुझे मिट्टी मे दबाने की,
मैं बीज हुं, आदत है मेरी, बार बार उग जाने की! ”
या काव्यपंक्ती प्रमाणे निश्चितच जितक्या वेळा धनंजय मुंडेंना दाबण्याचे, संपवण्याचे प्रयत्न होतील, तितक्याच ताकदीने ते पुन्हा उसळणार आणि एक लोकमान्य लोकनेतृत्व होण्याच्या दिशेने गतिमान वाटचाल करणार… हे नक्की आहे!
सन्माननीय श्री. धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शब्दरूपी शुभेच्छा!
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.