महाराष्ट्र

डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या “कागदावर ची माणसं” या पुस्तकाचे थाटात प्रकाशन

डॉ वृषाली किन्हाळकर ह्या उत्तम, संवेदनाक्षम कवयित्री; भारत सासणे

कागदावरची माणसं या पुस्तकातील माणसे ही खरी आहेत, त्यांची जीवनपद्धती वास्तव आहे. इतिहासातून साहित्यात आलेली जिवंत पात्रे या पुस्तकात आलेली आहेत व ही सर्व पात्रे लेखिकेचा पाठलाग करतात. लेखिका या तरल मनोवृत्तीच्या कवयित्री असल्यामुळे आपल्या अवतीभवती असणारी पात्रे त्यांनी निराकार मनोज्ञ अवस्थेत शोधलेली आहेत. त्या उत्तम, संवेदनाक्षम कवयित्री असल्यामुळे त्यांनी सहकंप टिपले आहेत. डॉ वृषाली किन्हाळकर यांनी आधुनिक मराठी साहित्याचा शोध घेतलेला आहे. यापुढे जाऊन त्यांनी वैश्विक पातळीवर वेगवेगळ्या पात्रांचा शोध घेऊन साहित्य निर्माण करावे असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांनी व्यक्त केले.
नांदेड येथील प्रख्यात लेखिका डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या ‘ कागदावरची माणसं ‘ या पुस्तकाचे बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
अनुबंध प्रकाशन पुणे व मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ कवयित्री, कथाकार नीरजा व नांदेड येथील महात्मा गांधी मिशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर, लेखिका डॉ.सौ. वृषाली किन्हाळकर, अनुबंध प्रकाशनच्या प्रमुख अस्मिता कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. डॉ. माधवराव किन्हाळकर, डॉ.वृषाली किन्हाळकर अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी, देविदास फुलारी, प्रा.महेश मोरे, संजीव कुळकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पं. संजय जोशी यांनी सरस्वती स्तवन व पसायदान सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाशिका अस्मिता कुलकर्णी यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ.वृषाली किन्हाळकर म्हणाल्या, सकस वाचनाची आवड, अक्षरांचे प्रेम, शब्दांची ताकद आईकडून मिळाली. त्यामुळे आयुष्य श्रीमंत झाले. पुस्तकातील व कादंबऱ्यातील वेगवेगळी पात्रे अस्वस्थ करतात, पाठलाग करतात, बोलतात, रडवतातं, आश्वस्थ करतात. नव्या पिढीने या कादंबऱ्याकडे, पुस्तकांकडे वळायला हवे.

डॉ.गीता लाठकर म्हणाल्या,” डॉ.वृषाली किन्हाळकर ह्या स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळे रूग्णांच्या शरीराच्या व्यथा समजून घेण्याबरोबरच मनाच्या वेदनाही उमजून घेतात. लेखकाच्या मनात ही पात्रे जिवंत असतात, सतत हाॅंटिंग करत असतात, झपाटून टाकत असतात. त्या उत्तम वाचक आहेत. पुस्तकातील पात्रांच्या वागणुकीचा त्या अन्वयार्थ लावतात, भावनांचे विश्लेषण करतात. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा पुस्तके आनंद व साथसंगत जास्त देतात. समृद्ध आयुष्य म्हणजे साहित्य, कला यांचा सहवास असणे.
यावेळी बोलताना नीरजा म्हणाल्या,
‘ डॉ वृषाली किन्हाळकर यांचे ‘ कागदावरची माणसं ‘ हे समिक्षात्मक पुस्तक वेगळ्या धाटणीचे असून सर्जनशीलतेचा समृद्ध आविष्कार आहे. कादंबरीतील कथानक, पात्रे, त्यांची मांडणी, मनात अध्यक्ष कायमची रूंजी घालतात. त्यांना पात्रांविषयी वेगवेगळे प्रश्न पडतात . राजकीय, सामाजिक, प्रेम,युद्ध या विषयांना स्पर्श करणारे त्यांचे लिखाण आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सध्या युवा पिढीचे वाचन थांबले असल्यामुळे आपल्या मनाचे व समाजाचे सांस्कृतीक उन्नयन कसे होणार ? हा खरा प्रश्न आहे. आपण अवतीभवती काय चालले आहे हे समजून घेत नसल्यामुळे व माध्यमे या गोष्टी दाखवत नसल्यामुळे वैचारिक दिवाळखोरीकडे आपला महाराष्ट्र जातो की काय अशी भीती वाटत आहे. आपल्याला वेगळ्या युद्धाकडे ओढले जात आहे व आपली संस्कृती नामशेष होण्याची भीती वाटते. संकुचितपणा वाढत असल्यामुळे आपली वैचारिक, बौद्धिक व मानसिक वाढ कशी होणार आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.’

पुढे बोलताना भारत सासणे म्हणाले की,
कथा, कादंबरी, नाटकेतर कलाकृतींमधील पात्रांबद्दल लक्षवेधी व मार्मिक लिखाण अभावानेच आढळून येते. निर्माण झालेली व कलाकृतीच्या पर्यावरणात विखरून अस्तित्वात असलेली पात्रं लेखकाला झपाटून टाकतात. हाॅंटिंग करतात, पाठलाग करतात. अशा संस्मरणीय पात्राबद्दल लेखिकेने ‘ कागदावरची माणसं ‘ या पुस्तकात मनोज्ञ पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात ज्ञान निर्माण होत नसेल तर जगण्याचे भान कसे निर्माण ‌होणार ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुजाता जोशी- पाटोदेकर, आभार प्रदर्शन बालाजी इबितदार यांनी केले.प्रकाशनाच्या या कार्यक्रमास वाचन प्रेमी व साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker