संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आशादत्त गोशाळा येथे चारा वाटप


अंबाजोगाई शहरातील आशादत्त गोशाळा येथे मानवतावादी संत सेवालाल महाराज व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी टायगर ग्रुप मराठवाडाचे अध्यक्ष गोरक्षक उमेशभाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.संत सेवालाल महाराज जयंतीचे प्रमुख पै.तिरूपती जयपाल राठोड यांनी हे उपक्रम राबविले, यावेळेस आशादत्त गोशाळा येथे चारा वाटप तसेच वृक्षारोपण करून अन्नदान असे सामाजिक उपक्रम आयोजित करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी एॅड.सचिन हुर्दळे, बालाजी पिंपळे, दीपक लामतुरे, स्वप्नील सोनवणे, राया धारेकर, बालाजी रुद्राक्ष, करण जोगदंड, कृष्णा नरसिंगे, आदित्य देशमुख, दीपक पवार, संतोष उजगरे, शिवप्रसाद स्वामी, विश्वजित कोरडे, प्रदीप राठोड, आकाश राठोड, सचिन जाधव, प्रवीण चव्हाण, आकाश लोदगे, ओमकार घोडके, ओम रूद्राक्ष यांच्यासह टायगर ग्रुपचे सदस्य आणि समस्त बंजारा बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिशा दिली :
संत सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक थोर समाज सुधारक होते. संपुर्ण बंजारा समाज त्यांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. महाराजांनी गौर बंजारा समाजात नवसुधारणेचे विचार मांडले, त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला, संत सेवालाल महाराज यांनी आध्यात्मिक व समाजप्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. असे उमेश पोखरकर (अध्यक्ष,टायगर ग्रुप मराठवाडा.) यांनी सांगितले.
संत सेवालाल महाराजांनी मानवी कल्याणाचा संदेश दिला :
महान संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता, जंगल, पर्यावरण रक्षण, गोरक्षणाचा संदेश दिला. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरूद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारणांसाठी आग्रही भूमिका घेतली होती. कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका, सन्मानाने आयुष्य जगा, इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करू नका, स्त्रियांचा सन्मान करा, संकटाला निर्भयपणे तोंड दया, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा, पाण्याचे रक्षण करा, तहानलेल्यांना पाणी द्या, वडीलधारी माणसांचा आदर करा, प्राण्यांवर दया करा, चिंतन व मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल, अभ्यास करा, ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा, माणुसकीवर प्रेम करा, तर्क करा आणि अंधश्रद्धा टाळा, कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करू नका, धैर्य, मानवता, शिस्त असे चिंतनशील विचार मंडणारे संत सेवालाल महाराज हे एक बुद्धीप्रामाण्यवादी संत होते. अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदाता म्हणून ही महाराजांनी आजीवन भूमिका बजावली.असे तिरूपती राठोड (सामाजिक कार्यकर्ते) यांनी सांगितले.