पद्मश्री शंकरबापू सांगितीक गौरव पुरस्काराने होणार ख्यातनाम रूद्रवीणा वादक उस्ताद बहाउद्दीन डागर यांचा सन्मान
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230117_174629-300x273.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230117_174629-300x273.jpg)
तपस्वी पखावज साधक पद्मश्री शंकररावबापू आपेगावकर यांना अंबाजोगाई करांकडून सांगितीक मानवंदना देण्यात येत आहे. यावर्षी ख्यातनाम रूद्रवीणा वादक उस्ताद बहाउद्दीन डागर यांचा “पद्मश्री शंकरबापू सांगितीक गौरव पुरस्कारा”ने सन्मान करण्यात येणार आहे. बुधवार, दिनांक 18 जानेवारी रोजी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अंबाजोगाई शहरात करण्यात आले आहे.
मागील 17 वर्षांपासून अंबाजोगाई शहरात तपस्वी पखावज साधक पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांना अंबाजोगाईकर सांगितीक मानवंदना देत आहेत. त्यानिमित्त दरवर्षी “पद्मश्री शंकरबापू सांगितीक गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. यावर्षी पुरस्काराचे मानकरी सुप्रसिद्ध रूद्रवीणा वादक उस्ताद बहाउद्दीन डागर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा संगीत सोहळा बुधवार, दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता,
हॉटेल ईट अॅण्ड स्टे, बडोदा बँकेजवळ, मोंढा रोड, अंबाजोगाई (जि.बीड) येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण समारंभानंतर उस्ताद बहाउद्दीन डागर (रूद्रवीणा वादन) आणि उद्धवराव आपेगावकर (पखावज संगत) यांच्या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगितीक सोहळ्यास रसिक, श्रोते, जाणकार आणि अंबाजोगाईकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन सांगितीक गौरव पुरस्कार समिती आणि पद्मश्री शंकरबापू आपेगावकर परिवार, अंबाजोगाईच्या वतीने करण्यात येत आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230117_174654-300x260.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230117_174654-300x260.jpg)
ख्यातनाम रूद्रवीणा वादक उस्ताद बहाउद्दीन डागर व रूद्रवीणा यांचा परीचय :
याबाबत अधिक माहिती देताना पंडीत उध्दवराव आपेगावकर यांनी सांगितले की, पद्मश्री शंकरबापूंच्या वैकुंठगमनाला 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. पुज्य बापूंच्या स्मृतीप्रित्यार्थ त्यांना तिथीप्रमाणे भजन व कीर्तनाच्या माध्यमातून व तारखेप्रमाणे अभिजात शास्त्रीय संगीताच्या मैफिलीच्या माध्यमातून आपण प्रतिवर्षी श्रद्धांजली अर्पण करतो. यावर्षी ज्येष्ठ रूद्रवीणा वादक व डागरवाणी घराण्याच्या 21 व्या पिढीचे वंशज उस्ताद बहाउद्दिन डागर यांना निमंत्रित केले आहे. त्यांचे वडील उस्ताद जिया मोहिनुद्दीन डागर व पद्मश्री शंकरबापू या दोघांनी अनेक अविस्मरणीय मैफिली रूद्रवीणा व पखावजच्या साथीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षितीजावर गाजविल्या आहेत. डागरवाणीची ध्रुपद परंपरा सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पद्मश्री शंकरबापूंनी केले आहे. रूद्रवीणा हे एक अत्यंत पवित्र व वैदिक परंपरेतील सर्वात प्राचीन व दुर्मिळ वाद्य आहे. रूद्र वीणा एक तंतुवाद्य आहे. हे वाद्य सहसा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात वापरले जाते. रूद्र वीणा ही तंतुवाद्यांची जननी आहे असे समजल्या जाते. रूद्र म्हणजे भगवान शंकर. या वाद्यास भगवान शंकराचे वाद्य म्हणून ही ओळखल्या जाते. हे वाद्य सतत ऐकल्याने माणसाच्या हिंसक प्रवृत्तीत बदल होतो असा समज आहे. या वाद्याची रचना मोरासारखी असते. मोराच्या केकारवा वरून या वाद्याची रचना स्फुरली असावी असे सांगण्यात येते. या वाद्याच्या सात तारांना ‘मोरपिस’ व खुंट्यांना ‘डोलो’ असे म्हणण्यात येते. हे, खांद्यावर एक भाग ठेवून सहसा वाजविण्यात येते. याच्या खांद्यावर घेतलेल्या भोपळ्यातून अत्यंत कमी क्षमतेचे ध्वनी ऐकता येतात. अशी माहिती देवून तब्बल 35 वर्षांनंतर उस्ताद बहाउद्दिन डागर यांना ऐकण्याची पर्वणी अंबाजोगाईकरांना लाभणार आहे. तेव्हा सर्व संगीतप्रेमींना विनंती की, या पुरस्कार वितरण सोहळ्या बरोबरच रूद्रवीणा आणि पखवाज वादनाच्या अनोख्या मैफिलीचा ही लाभ आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती पंडीत उद्धवराव आपेगावकर यांनी केली आहे.