50 वर्षीय महिलेच्या मृत्यू प्रकरणी वकील जावायाला अटक


शवविच्छेदन अहवालावरून अंबाजोगाई पोलीसांनी केली कारवाई
२१ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० वाजता शहरातील अजमेर नगर भागात राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेच्या मृत्यू प्रकरणी अखेर शहर पोलिसांनी सदरील महिलेच्या शवविच्छेदन अहवालावरुन तिच्या जावायाला काल ४ नोव्हेंबर रोजी रात्री अटक केली. या प्रकरणीच्या अधिक तपासात इतर आरोपी निष्पन्न होतील असा विश्वास तपासी अधिका-यांना आहे.
शहरातील अजमेर नगर विभागात राहणा-या ऍड. शेख अलीम शेख लाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयां समवेत त्यांच्या ५० वर्षीय सासू जिया समशोद्दीन काझी या राहत होत्या. जिया समशोद्दीन काझी यांचा २१ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० चे सुमारास मृत्यू झाला. ही घटना मयत जिया यांचे शहरातील महसुल कॉलनी विभागात राहणारे त्यांचे भाऊ अनिसोद्दीन खतीब यांना ऍड. शेख अलीम यांनी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:०० वाजता सांगितली. सदरील मृत्यू हा -हदयविकाराच्या झटक्याने झाला असे ऍड. अलीम यांनी सांगितले असल्याचे अनिसोद्दीन खतीब यांचे म्हणणे होते. सदरील घटनेची माहिती मिळताच अनिसोद्दीन खतीब यांनी आपल्या बहिणीचा मृतदेह आपल्या महसूल कॉलनी विभागातील निवासस्थानी आणून मृत्यूनंतरचे धार्मिक सोपस्कार करुन त्यांचेवर किरमानी दर्गा परिसरातील कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.


सदरील दफनविधी नंतर मयत जिया समशोद्दीन काझी यांचा मृत्यू -हदयविकाराने नाही तर इतर कारणांमुळे झाला असल्याची चर्चा अनिसोद्दीन खतीब व त्यांच्या इतर भावांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी २४ ऑक्टोबर रोजी पोलीसात रीतसर तक्रार देवून जिया समशोद्दीन काझी यांचा दफनविधी केलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्याची मागणी केली. सदरील मागणीची गांभिर्याने दखल घेऊन शहर पोलिसांनी तहसीलदार, वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित अधिकारी, नगर परिषदेचे कर्मचारी व तक्रारदार यांच्या उपस्थितीत दफनविधी केलेले पार्थिव बाहेर काढून वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदन विभागात नेवून इन कॅमेरा शवविच्छेदन केले.
सदरील शवविच्छेद अहवालात मयत जिया समशोद्दीन काझी यांचा मृत्यू -हदयविकाराने नाही तर तिच्या डोक्याला मार लागल्याने झाला असे नोंदवले आहे. सदरील मयत महिलेच्या डोक्याच्या कवटीला क्रॅक गेला असल्याचे एक्स रे अहवालाच्या रिपोर्ट मध्ये नोंदवले असल्याचे म्हटले आहे.
सदरील मयत जिया समशोद्दीन काझी यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात या नोंदी असून तिच्या व्हिसरा तपासणी अहवालात अधिकची कारणे स्पष्ट होतील असे तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी मयत जिया समशोद्दीन काझी यांचा शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून शहर पोलिस स्टेशनला दि. ४ नोव्हेंबर रोजी रात्री गुरनं.४१३ दाखल केला असून या प्रकरणी मयत महिलेचा जावाई ऍड. शेख अलीम शेख लाल यास ताब्यात घेऊन त्याचेवर भादविचे कलम ३०२, १२० ब, २०१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
२१ ऑक्टोबर रोजी जिया समशोद्दीन काझी या महिलेच्या मृत्यू नंतर या प्रकरणी तिच्या भावाने संशय व्यक्त करुन तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अधिक सखोल तपास सुरु केला होता. या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन पो.नि. विनोद घोळवे यांनी तपास स्वतः कडे घेत मयत महिलेचे पार्थिव कब्रस्तानातुन काढून त्याचे शवविच्छेदन होईपर्यंत व शवविच्छेदनाचा अहवाल येई पर्यंत अत्यंत संयमाने आणि बारकाईने तपास करीत शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच ऍड. शेख अलीम शेख लाल यास ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. पोलीस तपासात मयत जिया समशोद्दीन काझी यांच्या मृत्यूची अधिकची कारणे पुढे निष्पन्न होतील. तसेच या मृत्यू प्रकरणाच्या कारणांचा उलगडा ही निश्चितपणे होईल असा विश्वास तपास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.