वरपगावच्या मुक्ता देशमुख यांचा मृत्युपूर्व क्रांतिकारी निर्णय कुटुंबाने प्रत्यक्षात अंमलात आणला!
केज तालुक्यातील वरपगाव येथील मुक्ताबाई अच्युतरावं देशमुख यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यूपूर्व इच्छेत त्यांनी आपल्या मृत्यूनंतर पाच दिवसात सर्व मृत्युनंतरचे विधी पूर्ण करावेत अशी कुटुंबाकडे इच्छा व्यक्त केल्याने त्याच्यावर पाच दिवसाच्या आत मृत्युनंतरचे सर्व क्रियाकर्म पूर्ण करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला.
मृत्यू पुर्वीच व्यक्त केली इच्छा
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो कुटुंबातील व्यक्ती अथवा नातेवाईक अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमाचा निर्णय घेऊन घोषणा करतात. मात्र मुक्ता देशमुख यांनी आपल्या मृत्यूनंतर आपले सर्व विधी पाच दिवसाच्या आत पूर्ण करावेत अशी इच्छा व्यक्त केल्याने पाच दिवसाच्या आत सर्व विधी पूर्ण केले जात आहेत. सोमवारी सर्व विधी पूर्ण केले जात आहेत.
वरपगाव व केज तालुक्यासाठी क्रांतिकारी निर्णय – बदलत्या काळात मृत्युनंतरच्या विधी कालावधीत बदल होणे अपेक्षित आहे. समाजातील कांही लोक यासाठी प्रयत्नशिलही आहेत. अनेक ठिकाणी हा विधिकालावधी तीन दिवसावर आणला आहे.
एखाद्या व्यक्तीने मृत्युपूर्वी अशी इच्छा व्यक्त करणे व ती पूर्ण करणे अशा घटना खूप तूरळक घडतात. मुक्ताबाई देशमुख यांची इच्छा पूर्ण होत आहे.
अंत्यविधीनंतर पाच दिवसांत सर्व कार्यक्रम उरकावेत; नंतर कोणताही कार्यक्रम नको
मुक्ता देशमुख यांच्या नव्वद वर्षाच्या अनुभवातून व नव्या पिढीच्या अडचणी समोर ठेऊन मांडलेला हा विचार आहे, असे दिसते. भावकी मोठी असली की, अनेक सणवार सुतक पडले म्हणून साजरे करता येत नाहीत. आपण अनेक रूढी परंपरामध्ये गुरफटलेले आहोत की काळानुरूप त्यात बदल करण्यास मन तयार होत नाही. पण देशमुख कुटुंबाने मुक्ताबाई देशमुख यांची इच्छापूर्ती करण्याचा घेतलेला निर्णय व त्याला गावकऱ्यांनी दिलेली साथ वाखाणण्याजोगी आहे.
नवीन सुतकामुळे पुढे ढकलावा लागत होता कार्यक्रम
काहीवेळा तर एखाद्या व्यक्तीचा ‘दिवसाचा’ वा तेराव्याचा किंवा श्राद्धाचा कार्यक्रम भावकीतील दुसरं कोणी वारलं की पुढे ढकलावा लागतो. आपल्या गावात असाच एका कार्यक्रमाच्या वेळी अर्धा स्वयंपाक तयार असताना याच कारणामुळे कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचे आपण ऐकले आहे. यात पैसा, वेळ वाया जातो, हे अनेकांच्या दृष्टीने नात्यांपुढे नगण्य समजले तरी केवळ शेतीवर तीही कोरडवाहू आणि एक – दोन एकरवर कुटुंब चालवणाऱ्यांसाठी क्लेशदायक ठरते. ही मंडळी सामाजिक दबावापोटी विरोध तर सोडा तोंडातून शब्दही काढू शकत नाहीत.
मुक्ताबाई ची बदलत्या काळानुसार सुसंगत इच्छा
या पार्श्वभूमीवर मुक्ताबाई देशमुख यांची ही इच्छा बदलत्या काळानुरूप सुसंगत वाटते. आपला अंत्यविधी आपल्या गावच्या भूमीतच व्हावा ही त्यांची इच्छाही गावाबद्दल प्रेम व संलग्नता दर्शवणारी आहे.त्यामुळे गावकऱ्यांनी यापुढे गावात कोणाचे निधन झाले तर पाच दिवसांत सर्व विधी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला तर ही देशमुख परिवाराच्या मुक्ताबाई देशमुख यांना खरी श्रद्धांजली तर ठरेलच पण पुढील पिढीसाठी आदर्श निर्णयही ठरेल. त्यातही बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांसाठी तर भावना आणि नोकरी या गुंत्यातून सुटण्यासाठी सुसह्य ठरेल.
कारण खाजगी क्षेत्रात सलग १५ दिवस सुट्या मिळणे तसे सोपे नाही. वाढती स्पर्धा आणि बेरोजगारीचा लोंढा नाही तर आता पूरं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या परिस्थितीत नोकरी मिळणं कठीण झालं आहे. त्याहून जास्त मिळालेली नोकरी टिकवणं अवघड आहे.
आता दहा दिवस सुतक का पाळावे?
पूर्वीच्या काही रूढी – परंपरा या त्यावेळच्या परिस्थितीतून तयार झालेल्या आहेत. सुतक, तिसरा, दहावा तेरावा का पाळला जात असे, त्याची कारणमिमंसा अशी असू शकते…
पूर्वी संपर्काची तसेच वाहतुकीची साधने नव्हती, एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की, अंत्यविधीला गावातील लोकच उपस्थित राहू शकत असत. पंचक्रोशीतील आप्तांना हते-परहाते निरोप पोचला जाई. मग पंचक्रोशीतील नातेवाईक, आप्तेष्ट तिसऱ्याला (सावडायला) येत. तिसऱ्या दिवशी सावडण्यामागेही तसेच कारण होते. पूर्वी मुबलक लाकडं वापरली जात, परिणामी राख थंड होण्यासाठी किमान तीन दिवस लागत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असे. पंचक्रोशीबाहेरील नातेवाईकांना खास माणसे पाठऊन निरोप दिला जाई. त्यासाठी घोडे, बैलगाडीचा वापर करावा लागत असे. निरोप मिळेल तसे इतर नातेवाईक येत. त्यात प्रामुख्याने मुली व त्यांच्याकडील नातेवाईक असत. त्यामुळे किमान दहा दिवस घरातील मंडळींनी बाहेर जाऊ नये, म्हणून दहा दिवस सुतक पाळले जाई. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती तर होतीच पण भावकितही एकोपा होता. त्यामुळे दुःखत घटना घडलेल्या कुटुंबाच्या बैठकीत भावकितील तसेच गावातील मंडळींची दहा दिवस उठबस असे. त्यामागचे आणखी एक कारण म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांच्या भेटीगाठी होत. अनेक गावांत तर या दहा दिवसांत दुःखी कुटुंबाच्या घरातील चुलही पेटत नव्हती, कारण भवाकितील महिला, रोज जेवण पाठवत असत. तसेच याकाळात भावकित कोणताही आनंदाचा कार्यक्रम किंवा गोडधोड होत नसे. गावातही असे कार्यक्रम टाळले जात असत. दुःखात खऱ्या अर्थाने साथ देण्याची ती पद्धत मानली जात होती. दहाव्या दिवशी अस्थिविसर्जन करून सुतक संपवले जायचे व भावकीतील तसेच गावातील लोक आपल्या नियमित कामाला लागायचे. अनेक गावात मोठ्या नद्या नसल्याने अस्थिविसर्जनसाठी बाहेरगावी जावे लागत असे. (पूर्वी नद्या बारमाही वाहत असत, त्यामुळे विसर्जित केलेल्या अस्थि वाहून जात. त्यामुळे प्रदूषणाचा संबंध येत नसे.) तेथून परतण्यासाठी किमान दोन दिवस जात. तेथून आल्यानंतर गोडाजेवणाचा कार्यक्रम करत व दुःखातून बाहेर पडून पुन्हा कामाला लागत. पुढे त्या रूढी परंपरा झाल्या. ज्या आजही पाळल्या जातात.
साधने उपलब्ध असल्याने उशीर नको
आता एखादी दुःखद घटना घडली तर काही मिनिटांत पंचक्रोशीत काय देशात, परदेशात त्याची माहिती पोचते. वाहतुकीची साधनेही उपलब्ध असल्याने जवळचे नातेवाईक शक्यतो अंत्यविधीलाच पोचण्याचा प्रयत्न करतात किंवा पुढील दोन दिवसांत येऊन जातात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तसेच खानदेशातील अनेक गावांमध्ये तीन दिवसांत दुखवटा संपवून सर्व कार्यक्रम तिसऱ्या दिवशीच उरकतात. काही गावांत तसे ठराव घेतले गेले आहेत.
धाडसी निर्णय; तरीही अनेकांनी केले स्वागत !
उद्योग, व्यापार करणाऱ्या अल्प संख्यांक असलेल्या अनेक समाजात तर खूप पूर्वीपासून तीन दिवसांत सर्व कार्यक्रम आटोपण्याची प्रथा आहे. कारण कोणताही व्यवसाय दहा – पंधरा दिवस बंद ठेवणे किती नुकसानदायक ठरू शकतं हे त्यांना माहीत होते.
त्यामुळे आपणही पुढच्या पिढीच्या नोकरी नव्या भाषेत ‘करिअर’, व्यवसायाचा विचार करून त्यांच्यासाठी हा तसा सोपा दिसत असला तरी धाडसी त्यातही जुन्यावपिढीचं मन वळवणे अवघड आहे, हे माहीत आहे. असं असलं तरी आपण तीन नाही तरी किमान पाच दिवसाचा निर्णय घ्यावा असे वाटते.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.