महाराष्ट्र

४ दशकांपासून रेंगाळलेला अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेली तीन दशकांपासून प्रशासकीय पातळीवर निर्णया अभावी प्रलंबित असून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती सह आता राज्यातील २२ नव्या जिल्हा निर्मितीचा प्रश्न प्रशासनासमोर आहे . अशी स्थिती असतांनाच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची घोषणा करावी यासाठी पुन्हा एकदा रणकंदन सुरु झाले आहे.
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी ही तशी तीन दशकांपुर्वी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली होती. १९८७-८८ च्या सुमारास अंबाजोगाई नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण पुजारी यांच्या पुढाकाराने तत्कालीन भाजपाचे नेते आ. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची भेट घेऊन अधिकृतरित्या अंबाजोगाई जिल्हा निर्मिती बाबतचे निवेदन देण्यात आले होते. तेंव्हापासून सातत्याने अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी सातत्याने शासनाकडे करण्यात येत आहे.
यानंतर बराच कालावधी उलटुन गेला. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीचे नेतृत्व करणारे गोपीनाथराव मुंडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तरी त्यांना अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भातील शासकीय आदेश काढता आला नाही. एवढेच काय अंबाजोगाई पंचक्रोशीतील ग्रामदेवता आणि दस्तुरखुद्द तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची कुलदेवता असलेल्या योगेश्वरी मातेच निवास असलेल्या अंबाजोगाई शहराला जिल्ह्याचा दर्जा दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना देता आला नाही. गेली चार दशकात महाराष्ट्रातील सहा मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात आश्वासने दिली, मात्र त्यांना अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भातील आदेश काढता आले नाहीत.

अंबाजोगाई तालुक्यालगत असलेले मराठवाड्यातील प्रभावी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तर “अंबाजोगाई जिल्हा झालाच” अशी घोषणा करुन ही त्यांना त्यासंबंधीचा शासकीय आदेश काढता आला नाही.
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी जन आंदोलनाचा रेटा तीव्र करण्यात ही अंबाजोगाई शहरातील लोकप्रतिनिधी कधी कमी पडले नाहीत. केज विधानसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. सौ. विमल मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०१८ शहरातील अनेक मान्यवरांनी सलग ४० दिवस उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करुन आ. डॉ . सौ. विमल मुंदडा यांच्या सह अनेकांची प्रकृती खालावली, अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तरीही अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न सुटला नाही.

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर शासकीय वाहनातील हवा छोडा आंदोलनाला हिंसक वळण मिळाले, शहरात जाळपोळ झाली, संचारबंदी लागू करण्यात आली, पन्नास एक प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन जिल्हा कारागृहात डांबून ठेवले, त्यांच्यावर खटले दाखल केले तरीही अजून पर्यंत अंबाजोगाई जिल्हा झाला नाही.
एवढेच काय अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भातील विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने उच्चस्तरीय अधिका-यांच्या मार्फत राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात शिफारस केली तरीही अंबाजोगाई जिल्हा निर्मिती झाली नाही. डिसेंबर २०११ मध्ये तत्कालीन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठवाड्यात नांदेड आणि लातूर हे दोन महसूल आयुक्तालय निर्माण करुन अंबाजोगाई, उदगीर आणि कान्ट या तीन नवीन जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनास समोर ठेवला तरीही अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात राज्य शासनाला आदेश काढता आला नाही.

अंबाजोगाई जिल्हा निर्मिती मागणी जवळपास तीन दशकांपुर्वी राज्यशासनाकडे करण्यात आली आहे. या तीन दशकांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता अंबाजोगाई सह महाराष्ट्रातील २२ जिल्हा निर्मितीचा प्रश्न राज्य शासनाच्या समोर आहे. गेली अनेक वर्षापुर्वी एका दैनिकात प्रकाशित झालेली “राज्यातील २२ जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेला वेग” असा मथळा असलेली बातमी अधुनमधून वेगवेगळ्या दैनिकामध्ये प्रकाशित होते आणि त्या त्या विभागात पुन्हा जिल्हा निर्मितीची मागणी कांहीं काळ जोर धरते, असे सर्व साधारण चित्र अलिकडे दिसुन येते आहे.
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणी संदर्भात ही अलिकडे असेच झालेले दिसते. महाराष्ट्रातील राजकारणात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एका गटाचा राज्यमंत्री मंडळात समावेश झाला. या मंत्रीमंडळात ना. धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदांची शपथ घेतली. ना. धनंजय मुंडे यांचे अतिशय जोरदार स्वागत बीड जिल्ह्यात झाले. आणि दुसरेच दिवशी ना. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष ऍड. कवडे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई वकील संघाने शहरातील प्रमुख मार्गावरून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी करणारा एक मोर्चा काढला. “अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे”, “अंबाजोगाई जिल्हा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा” अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले.

या मोर्चाचे नेतृत्व करणारे अंबाजोगाई वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अशोक कवडे हे ना. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे या मोर्चाकडे वेगळ्या नजरेने पाहीले पाहिजे. वकील संघाने अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात शहरातुन मोर्चा काढण्यात आल्या नंतर शहरातील विविध संघटना आणि विशेषतः अंबाजोगाई जिल्हा निर्मिती युवा कृती समितीने तातडीने या संदर्भात सर्वपक्षीय बैठक घेऊन अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भातील लढा सतत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.

अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भातील घोंगडे राज्यशासनाकडे गेली तीन दशकांपासून प्रलंबित आहे. आता अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात युवा कृती समितीने सुरु केलेल्या या लढ्यात या विभागातील लोकप्रतिनिधींनी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा कृती समितीला आहे. या कृती समितीच्या अहवानाला शहरातील विविध पक्षांचे मान्यवर नेते व या संभाव्य जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कसा प्रतिसाद देतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker