३८ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे २५ नोव्हेंबर रोजी उद्घाटन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221116-WA0210.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221116-WA0210.jpg)
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी २५,२६ आणि २७ नोव्हेंबर रोजी आयोजित केल्या जाणार्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ३८ वे वर्ष असून तीन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, बालआनंद मेळावा, शास्त्रीय संगीत कार्यक्रमात शास्त्रीय गायन ‘जुगलबंदी’, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण, समारोप समारंभ संपन्न होणार आहे.
अंबाजोगाईत गेल्या ३७ वर्षांपासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने वैविध्यपुर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यकम आयोजित केले जातात. अंबाजोगाई व मराठवाड्याचा सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वैचारिक वारसा जोपासण्याचा व दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी ३८ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह दि.२५, २६ व २७ नोव्हेंबर २०२२ शुक्रवार, शनिवार व रविवार असा संपन्न होणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
उद्घाटन व कवी संमेलन!
शुक्रवार, दि.२५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वा. या समारोहाचे उद्घाटन मुंबई येथील प्रख्यात लेखक व माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
रात्रौ ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील ज्येष्ठ कवी श्रीधर नांदेडकर हे राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध कवी निलेश चव्हाण हे करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी सर्वश्री रवींद्र महल्ले – अकोला, मालती सेमले – गडचिरोली, डॉ. अनिता खेबुडकर – निपाणी (कर्नाटक), इरफान शेख – चंद्रपूर, राजेंद्र वाघ – पुणे, धम्मपाल जाधव – हिंगोली व गुंजन पाटील – सोयगाव यांचा सहभाग राहणार आहे.
शनीवार, दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वा. बालआनंद मेळावा आयोजित केला असून सुप्रसिद्ध बालसहित्यकार प्रा. विनय आर. आर. पुणे हे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व शालेय चित्रकला स्पर्धेचे विजेते यांना परितोषिके प्रदान करतील. पाहुणे म्हणून जागतिक कीर्तीचे शिल्पकार प्रदीप जोगदंड व रजनी वर्मा असतील. यावेळी सेलू येथील शिक्षक युवराज माने गुरुजी यांच्या ‘गुरुजी, तु मला आवडतोस’ या बाल साहित्य असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल. या वर्षी महाविद्यालयीन परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शालेय चित्रकला स्पर्धा त्या त्या शाळेत घेतल्या जात आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. सायं. ७.३० वा. सुगम संगीताचे आयोजन केले आहे. औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध गायक राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध केलेला ‘मराठवाड्याचे काव्य वैभव’ ही संगीत रजनी सादर करतील. त्यात राजेश सरकटे, पायल सरकटे आणि संगीता भावसार हे गीत सादर करतील. प्रा. समाधान इंगळे यांचे निवेदक असतील. साथसंगत – कीबोर्ड – राजेश देहाडे, तबला – जगदीश व्यवहारे, ऑक्टोपॅड – राजेश भावसार, गिटार – संकेत देहाडे, ढोलक ढोलकी – अंकुश बोर्डे,मनोज गुरव – बासरी अशी असेल.
शेतकरी परीक्षेत पीक विमा वर चर्चा!
२७ नोव्हेबर रविवार रोजी सकाळी १०.३० वा.शेतकरी परिषदेचे आयोजन केले असून प्रयोगशील शेतकरी व प्रसिद्ध कृषी कार्यकर्ते पंजाबराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी परिषद होणार असून ते “माझी शेती कांहीं अनुंभव” या विषयावर मार्गदर्शन करतील तर अंबाजोगाई कृषी महाविद्यालय येथील सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड हे “कीड व्यवस्थापन – सद्यस्थिती’ तर या विषयावर मार्गदर्शन करतील तर अंबाजोगाई येथील तरुण अभ्यासक वकील ऍड. अजय बुरांडे हे ‘शेती, शेतकरी व पीक विमा’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
समारोप व पुरस्कार वितरण!
याच दिवशी समारोप समारंभ होत असून चाकण येथील खेडचे माजी आमदार, लेखक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राम कांडगे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ संपन्न होणार आहे.या समारंभात मराठवाड्यातील कृषी,साहित्य,संगीत व युवा (युवा व्याख्याता) या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सन्मान करण्यात येणार असून त्यात लोखंडी सावरगाव येथील प्रयोगशील शेतकरी, शेतकर्यांचे प्रेरणास्थान, पंजाबराव देशमुख यांना कृषी, मूळच्या अंबाजोगाईच्या पण आता पुणे येथील ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांना साहित्य, लातूर येथील सुरमणी बाबूराव बोरगावकर यांना संगीत तर अंबाजोगाईचेच जागतिक कीर्तीचे तरुण शिल्पकार प्रदीप जोगदंड व रजनी वर्मा – जोगदंड यांना युवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह,रोख पाच हजार रूपये,शाल, पुष्पगुच्छ असे आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221116-WA0209.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221116-WA0209.jpg)
रजनीश व रीतेश मिश्रा यांची जुगलबंदी!
रात्रौ ठिक ८.३० वा. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत सरस्वती बोरगावकर यांचे गायन होईल त्यांना तबल्यावर अंबरीश शिलवंत तर संवादिनीवर बाबूराव बोरगावकर हे साथ करतील. त्यानंतर दिल्ली येथील प्रतिभावान शास्त्रीय संगीत गायक रजनीश व रितेश राजन मिश्रा यांचे जुगलबंदी गायन होईल. त्यांना पणजी येथील प्रसिद्ध तबलावादक मयंक बेडेकर व संवादिनीवर राया कोरगावकर गोवा हे साथ करतील.
कला दालन व ग्रंथ प्रदर्शन!
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ग्रंथ प्रदर्शन व विक्री, चित्र व फोटो प्रदर्शन आयोजित केले आहे. अंबाजोगाई येथील तरुण कलावंत, चित्रकार व शिल्पकार प्रदीप जोगदंड व रजनी वर्मा जोगदंड यांच्या चित्रांचे व शिल्पांचे प्रदर्शन, चित्रकला व ग्रंथ प्रदर्शने हे तिन्ही दिवस रसिक व प्रेक्षकांना पाहता येतील.
कै.भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या समारोहाचे महाराष्ट्रभर कौतुक झालेले आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचलेल्या या समारोहास रसिक श्रोत्यांनी तिन्ही दिवस उपस्थित राहुन सहकार्य करावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा.सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतिश लोमटे, सदस्य,प्राचार्य प्रकाश प्रयाग,प्रा. शर्मिष्ठा लोमटे, प्रा.भगवान शिंदे, प्रा.सागर मुंडे यांनी व इतर पदाधिकारी तसेच सल्लागार भगवानराव शिंदे बप्पा व राजपाल लोमटे यांनी केले आहे.